Tue, Apr 23, 2019 21:35होमपेज › Kolhapur › जल्लोषात ‘रंग बरसे’

जल्लोषात ‘रंग बरसे’

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 07 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

रंगांची उधळण करत आबालवृद्ध, महिला, तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. रंगपंचमीच्या निमित्ताने स्नेहाचे बंध आणखीन घट्ट विणले गेले. मंगळवारी सायंकाळपर्यंत रंगपंचमीचा उत्साह टिकून होता. रंगांच्या उधळणीसह सामाजिक भान जोपासत अनेकांनी समाजोपयोगी उपक्रम राबविले.

सकाळपासूनच गल्ली-बोळांत बालचमूने रंग व पिचकार्‍यांसह किलबिलाट सुरू केला. दहानंतर तरुण-तरुणींचे जथ्थे दुचाकींवरून बाहेर पडले. राजारामपुरी, शाहूपुरी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, उत्तरेश्‍वर पेठेसह शहराच्या मुख्य रस्त्यांवर तरुणांची मोठी गर्दी होती. गुलाल, पिवडी, फुलांपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगांची उधळण करत तरुणाईने सामाजिक भान राखले.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
महिला मंडळ, बचतगटांतील महिलांनी दुपारनंतर परिसरातील महिलांना एकत्रित करून रंगांची उधळण करत रंगपंचमीचा आनंद लुटला. काही ठिकाणी साऊंड सिस्टिमवर महिलांनी ठेका धरल्याने उत्साहाला उधाण आले होते. 

रेन डान्सची क्रेझ
शहरातील अनेक भागांत शॉवरच्या सहाय्याने रेन डान्सची व्यवस्था करण्यात आली होती. रंग खेळल्यानंतर साऊंड सिस्टिमवरील गाण्यांवर तरुणांनी ठेका धरला. टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करून रेन डान्सची व्यवस्था करण्यात आली होती.

सामाजिक बांधिलकी
रंगपंचमी दिवशी अनेकांनी सहलीचे आयोजन केले होते. गगनबावडा, राधानगरीतील डॅम, बॅक वॉटरसह गड-किल्ल्यांवर जाऊन तरुणांनी सहलीचा आनंद घेतला. कसबा बावड्यातील पिंजार गल्ली मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. सायबर महाविद्यालयाचे विद्यार्थी सकाळी नऊ वाजता एकत्रित जमले. नैसर्गिक रंग वापरा, त्वचारोग टाळा, पाणी बचायेंगे, सुखी होली मनायेंगे, पाण्याचे संरक्षण, धरतीचे रक्षण अशा घोषणा देत रॅली काढली. सायबर चौक, माऊलीचा पुतळा, जनता बझार, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक मार्गावरून रॅली काढण्यात आली.

बालकल्याण संकुलात रंगपंचमी
सायबर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलातील मुलांसोबत रंगपंचमी साजरी केली. यामध्ये किरण चौगुले, स्नेहा रूईकर, सविता कांबळे, उमाकांत कांबळे, निरंजन साळवी, नितीन साठे, सूरज कांबळे, मेघा लोंढे, रेखा डावरे, डॉ. प्रकाश रणदिवे, डॉ. एस. एम. अली, डॉ. एस. व्ही. शिरोळ यांनी सहभाग घेतला.

950 किलो नैसर्गिक रंगांची विक्री
निसर्ग मित्र संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक रंगांना यंदा मोठी मागणी होती. हिरडा, बेहडा, शेंद्री, पळस, काटेसावर, पाना-फुलांपासून बनविण्यात आलेल्या रंगांची विक्री संस्थेतर्फे करण्यात आली. तब्बल साडेनऊशे किलो रंगांची विक्री झाल्याचे संस्थेचे प्रमुख अनिल चौगुले यांनी सांगितले. शाळेतील मुलांनीही संस्थेच्या मदतीने फुलांपासून स्वत: रंग बनविला होता.

अग्निशमन दलाची पथके तैनात
रंगपंचमीनंतर अनेकांनी पंचगंगा नदीघाट, राजाराम बंधारा, रंकाळा तलाव, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव येथे पोहण्याचा आनंद घेतला. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अग्निशमन दलाची पथके तैनात करणयात आली होती.

कडेकोट पोलिस बंदोबस्त
शहरासह इचलकरंजी, जयसिंगपूर, तसेच तालुक्यांच्या ठिकाणी रंगपंचमीनिमित्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सणाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिस चौका-चौकांत थांबून लक्ष ठेवून होते. ट्रिपल सीटसह भरधाव वाहने चालविणार्‍यांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. कर्णकर्कश आवाजातील साऊंड सिस्टिमही लक्ष्मीपुरी पोलिसांनी जप्त केली.

बाजारपेठ बंद
शहरात दुपारपर्यंत मुख्य मार्गांसह अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. केवळ खाद्यपदार्थांच्या गाड्यांव्यतिरिक्त बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. दुपारी चारपर्यंत शहरात बंदसदृश वातावरण होते. सायंकाळनंतर दुकाने उघडण्यात आली.

सोशल मीडियावरही उधळण
रंगीबेरंगी चेहर्‍यांच्या सेल्फींनी सोशल मीडियाही न्हाऊन निघाला. रंगपंचमी साजरे करतानाचे फोटो तरुणांनी लगेच फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपवर अपलोड केले. नेहमीपेक्षा रंगांमुळे चेहर्‍याच्या वेगळ्या छटा पाहून अनेकांना सेल्फीचा मोह आवरला नाही.