Thu, Jul 18, 2019 20:42होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात उद्या रंगणार 'मैफल रंगसुरांची'

कोल्‍हापुरात उद्या रंगणार 'मैफल रंगसुरांची'

Published On: Jan 19 2018 9:57PM | Last Updated: Jan 19 2018 10:03PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

कलारसिकांच्या साक्षीने कोल्हापुरात दर वर्षी जानेवारी महिन्यात 'रंगबहार' संस्थे तर्फे  'मैफल रंगसुरांची' हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमात भारतातील प्रख्यात चित्रकार, शिल्पकार, रंगावलीकार, हस्तकला विशारद आणि गायक हे सहभाग नोंदवून आपली प्रात्यक्षिके सादर करतात. या व्यासपीठावरून नावारूपाला आलेले अनेक कलावंत आता देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले असून, काहीजण परदेशीही गेले आहेत. संगीताच्या हिंदोळ्यावर अनेक झोके घेणारी ही मैफल रसिकांच्या मनात दीर्घकाळ जागत राहते. या वर्षीची ही मैफल उद्या (रविवार, २१ जानेवारी) रंगणार आहे. दर वर्षी टाऊन हॉलमध्येच याचे आयोजन केले जाते. 

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची 'महाराष्ट्र फिल्म कंपनी' ही चित्रकारांचे गुरुकुल होते. या व्यासपीठावरून शेकडो कलावंत निर्माण झाले. यामध्ये चित्रकारांची संख्या लक्षणीय होती. त्यांना पुढे राजाराम आर्ट सोसायटीने अनेक वर्षे व्यासपीठ दिले; पण कालांतराने या संस्थेत कलाबाह्य शक्तींचा प्रवेश होऊन त्या व्यासपीठाची वाताहत झाली. अशा अवस्थेत १८ जून १९७८ रोजी कोल्हापूरचे ज्येष्ठ चित्रकार व कुशल संघटक श्यामकांत जाधव यांनी 'रंगबहार' या संस्थेची स्थापना केली. 

जयप्रभा स्टुडिओ येथे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या हस्ते आणि चित्रकार, शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांच्या प्रेरणेने हे व्यासपीठ अस्तित्वात आले. आज त्याला ३९ वर्षे झाली आहेत. या संस्थेला श्यामकांत जाधव यांच्या नेतृत्वाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ झाला आहे; पण शेकडो कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही संस्था सार्‍या महाराष्ट्रभर आणि कर्नाटकमध्येही लौकिक मिळवून आहे. 

कोल्हापूरची चित्रे, शिल्पे, चित्रपट हे सार्‍या जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांना दीडशे वर्षांची परंपरा आहे. आबालाल रेहमान, बाबूराव पेंटर यांच्या कलाकर्तृत्वाने ती समृद्ध झाली आहे. शेकडो कलारत्नांनी तिला उजाळा दिला. ही परंपरा जपण्याचे महत्त्वाचे कार्य 'रंगबहार' या संस्थेने गेली तीन तपे सातत्याने पार पाडले आहे. हा जागर या संस्थेने एक चळवळ म्हणून आजपर्यंत जपला आहे. दृश्यकलेच्या क्षेत्रात व्याख्यान, प्रात्यक्षिके, संमेलने, कार्यशाळा, प्रदर्शने अशा उपक्रमांतून 'रंगबहार'ने लोकजागरणही केले आहे. 

गेली ३९ वर्षे 'मैफल रंगसुरांची' या उपक्रमाद्वारे नव्या-जुन्या कलारत्नांना आपल्या मंचावर आणून त्यांना रसिकांसमोर त्याचे सादरीकरण करण्याचं हक्‍काच व्यासपीठ उपलब्‍ध करून दिला आहे. प्रत्येक वर्षी १६ जानेवारीनंतर पहिल्या रविवारी बाबूराव पेंटर यांच्या स्मृतिदिनी टाऊन हॉलच्या हिरवळीवर 'मैफल रंगसुरांची' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. असे शेकडो कलाकार रंगबहार आणि कोल्हापूरचे नाव सांगत देशभर पसरले आहेत. रंगबहार ही एक चळवळ म्हणूनच उभी आहे. नवी तरुणाई यासाठी आता कार्यरत झाली आहे. ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 'रंगबहार'चे नूतन कार्यकारिणी प्राचार्य अजेय दळवी हे अध्यक्ष आहेत. तसेच उपाध्यक्ष अमृत पाटील, सचिव धनंजय जाधव, सहसचिव अशोक पालकर, व सदस्य म्हणून विजय टिपुगडे, सागर बगाडे, संजीव संकपाळ, अतुल डाके, सज्रेराव निगवेकर, किशोर पुरेकर, राहुल रेपे. समन्वयक रियाज शेख आणि उज्ज्वल दिवाण. हे सक्रिय आहेत. व्ही. बी. पाटील हे मार्गदर्शक आहेत 

'रंगबहार' ही संस्था सातत्याने गेली ३९ वर्षे कोणतेही स्वत:चे आर्थिक बळ नसताना लोकाश्रयावर चालणारी कोल्हापुरातील एकमेव संस्था आहे. रसिकांचा विश्‍वास आणि प्रेमामुळे हा जागर चालू ठेवणे शक्य झाले आहे. तो तसाच चालू राहावा यासाठी संस्थेला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. संस्थेच्या कार्यसिद्धीसाठी अनेक नामवंतांनी यामध्ये भाग घेतला असून, भारतरत्न लता मंगेशकर यांनीही या संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व स्वीकारले आहे. 

कोल्हापूरचे रसिक आणि प्रख्यात दंतवैद्य डॉ. आनंदराव काटे हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यानंतर (कै.) गोपीनाथभाई धारिया, श्यामकांत जाधव यांनीही अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यानंतर श्रीकांत डिग्रजकर, निर्मला कुलकर्णी, आदींनी संस्थेची कार्ये पुढे नेली. रंगबहार संस्था रंगबहार संस्थेने आजपर्यंत कविसंमेलने, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, शिबिरे, सहली, प्रदर्शने, व्याख्याने, परिसंवाद, परिषदा या सर्वांतून कला जागरणासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. 

या सर्व उपक्रमांमध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक मान्यवर कलावंतांनी भाग घेतला. 'रंगबहार' या संस्थेच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्त्यांच्या सक्रियतेमुळे ही संस्था सार्‍या महाराष्ट्रभर आणि कर्नाटकाच्या मोठय़ा भागात लौकिक मिळवून आहे. आता युवा पिढीकडे सूत्रे सोपविली आहेत. ही युवा पिढीही जिद्दीने व तितक्याच ताकदीने ही 'रंगबहार'ची चित्रमय चळवळ पुढे नेत आहे. 

मैफिल रंगसुरांची मध्ये सहभागी कलावंत

तबलावादन

 प्रशांत देसाई : स्वतंत्र तबलावादन

कोल्हापुरातील मान्यताप्राप्त तबलावादक. तबल्याचे प्राथमिक शिक्षण केशवराव धर्माधिकारी यांच्याकडे. त्यानंतर आमोद दंडगे यांच्याकडून विशेष मार्गदर्शन. सध्या पं. विभव नागेशकर यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे. शिवाजी विद्यापीठाचे संगीतशास्त्र या विषयातील एम.ए., अ.भा.गंधर्व महाविद्यालय मंडळाची ‘संगीत अलंकार’ या पदव्या प्राप्त. अनेक मान्यताप्राप्त कलाकरांना तबल्याची साथसंगत.

हार्मोनियमवर साथसंगत करणारे अमित साळोखे यांचे हार्मोनियम वादनाचे शिक्षण श्री.आर.एस.सबनीस व संदीप ताबरे यांच्याकडे. एम.ए. (संगीतशास्त्र) ही पदवी.
शास्त्रीय गायन

गौरी पाध्ये (शास्त्रीय गायन)

कोल्हापुरातील उद्योन्मुख शास्त्रीय संगीत गायिका. संगीताचे प्राथमिक शिक्षण सौ.वंदना आठल्ये व डॉ. विनोद ठाकूर देसाई यांच्याकडे. गेली आठ आठ वर्षे जयपूर घराण्याच्या ख्यातकिर्त कलाकार पंडिता डॉ. अलका देव मारलकर यांच्याकडून मार्गदर्शन. संगीतशास्त्र या विषयातील पदव्युत्तर शिक्षण विशेष प्राविण्यासह शिवाजी विद्यापीठातून. त्याचप्रमाणे अ. भा. गंधर्व महाविद्यालय मंडळाची ‘संगीत विशारद’ ही पदवी. अनेक प्रतिष्ठेच्या व्यासपीठांवरून गायनाविष्कार.

चित्रकार

नेहा बन्सल, मुंबई

जी.डी.आर्ट (पेंटीग) नेहरु सेंटर, मुंबई, शाहू स्मारक भवन कोल्हापूर, इंडियन ऑईल आर्ट कॉम्पिटेशनच्या शो मध्ये सहभाग. काही ठिकाणी प्रात्यक्षिक, महाराष्ट्र ‘लोकमत’ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, वुमेन लोटस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक.

अरिफ तांबोळी, खटाव-सातारा

जी.डी.आर्ट, पेंटींग २०१६ च्या बाँबे आर्ट सोसायटीच्या मान्सून शोसाठी चित्राची निवड.  २०१८ च्या आर्ट सोसायटीच्या प्रोफेशनल कॅटॅगरीजमधून प्रदर्शनासाठी निवड. २०१७ मध्ये शाहू स्मारक भवन कोल्हापूरच्या कला-दालनात चित्रप्रदर्शन. सतत चित्रनिर्मितीचा सराव.

आदिती कांबळे, गडहिंग्लज

जी. डी. आर्ट (पेंटींग) शाहू स्मारक भवनच्या प्रदर्शनात सहभाग. राज्य कला-प्रदर्शनामध्ये सहभाग. अनेक चित्रांची निर्मिती. रचना चित्रामध्ये प्राविण्य. 

प्रीतम चिवटे, इचलकरंजी

जी. डी. आर्ट (डिप्लोमा ए.ई.डी.) बेस्ट पेंटींग ॲवॉर्ड के.बी.कुलकर्णी, बेळगांव. निसर्ग चित्र पारितोषिक ललितकला महाविद्यालय, इचलकरंजी. उत्तम रचनाचित्र पारितोषिक व्ही.व्ही.ओक आर्ट फौंडेशन पारितोषिक. राज्य कला प्रदर्शनात चित्र निवड.

सत्यजीत पाटील, नांदणी

ए.टी.डी., जी.डी.आर्ट, आर्ट मास्टर या पदविका प्राप्त. चित्रकला मंदिर, गोवा, कलासंती- बेंगलोर या प्रदर्शनामध्ये सहभाग. . कलापुष्प, सांगली प्रथम क्रमांक. सह्याद्री कला शिक्षण संस्था-सावर्डे, साऊथ सेंट्रल-नागपूर या संस्थांची प्रथम व द्वितीय पारितोषिक. बेस्ट वॉटर कलर ॲवॉर्ड. 

स्वरूप कुडाळकर, पेठवडगाव

जी.डी.आर्ट, कमर्शिअल. अनेक चित्रांची निर्मिती. अखिल भारतीय कॅमल स्पर्धेत सहभाग. कांही चित्रस्पर्धेत पारितोषिक.

आकाश गाडे, म्हसवड

ए.टी.डी, जी.डी.आर्ट, पेंटींग. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट आणि रंगबहार या संस्थांची पारितोषिके. महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन, बाँबे आर्ट सोसायटी, कलासंगम-महाराष्ट्र टाईम्स, कोल्हापूर. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट प्रदर्शनामध्ये सहभाग.

समाधान हेंदाळकर, मुरगुड

ए.डी.डी., जी.डी.आर्ट. महाराष्ट्र — कला  राज्य कला प्रदर्शनात पारितोषिक  प्राप्त. रा . शी . गोसावी कलानिकेतन आणि महाराष्ट्र — कला  राज्य कला प्रदर्शनात. अनेक ठिकाणी कला प्रात्यक्षिक. 

भाऊसाहेब पाटील, कोल्हापूर 

जी.डी.आर्ट., पेंटींग, अनेक एकल व सामुदायिक चित्रप्रदर्शनामध्ये सहभाग. कला महोत्सव - मिरज  २००५. ललितकला महाविद्यालय इचलकरंजी,  सह्याद्री कला शिक्षण संस्था-सावर्डे ,कलापुष्प आदी संस्थांकडून सन्मान. सध्या मुंबई येथे अनिमेशन क्षेत्रामध्ये नामवंत संस्थेत  कार्यरत.

 स्वप्नील पाटील, कोल्हापूर 

श्लोक लोकमत, चंद्रकांत मांडरे कला  अकादमी, साऊथ सेंट्रल-नागपूर, पी .डी.धुंदरे फौंडशन यांची पारितोषिक प्राप्त. कांही ठीकाणी चित्रप्रदर्शन व सांघिक प्रदर्शनात सहभाग.

शिल्पकार 

अजित चौधरी, पिंपळवाडी-बार्शी 

शिल्पकला पदविका पास. व्यक्ती शिल्पांमध्ये अधिक रस. काही  व्यक्तीशिल्पांची निर्मिती. मान्यवर संस्थांचे ठिकाणी प्रात्यक्षिके 

अभिलाष भालेराव, बीड 

 कलामंदिर कोल्हापूर येथे शिल्पकलेचे शिक्षण. शिल्पांमध्ये अधिक रस. आजवर कांही विषय शिल्प आणि व्यक्तीशिल्पांची निर्मिती. 

सागर सुतार, कोल्हापूर 

जी.डी.आर्ट पेंटींग, जी.डी.आर्ट शिल्पकला . राज्य कला  प्रदर्शन,बाँबे आर्ट सोसायटी,आर्ट सोसायटी ऑफ इंडिया  यांच्या शिल्प  प्रदर्शनात सहभाग. साऊथ सेंट्रल-नागपूर या प्रदर्शनात शिल्पाकृतीस पारितोषिक.. कांही ग्रुप शो मध्ये सहभाग.

किरण कुंभार, इचलकरंजी

जी.डी.आर्ट शिल्पकला,बाँबे आर्ट सोसायटी,रौप्य पदक . कांही प्रदर्शनात सहभाग. कांही शिल्पांची स्वतंत्र निर्मिती. 

विजय कुंभार, सडोली खालसा 

शिल्पकला पदविका. रचना शिल्प हा आवडीचा विषय. कांही शिल्पांची स्वतंत्र निर्मिती.

अभिजित  कुंभार, वाठार

शिल्पकला विभाग कलामंदिर महाविद्यालय येथे सध्या शिक्षण घेत आहे. 

मांडणी शिल्प 

दीपक भुईंगडे - परिते, भोगावती 

जी.डी.आर्ट,पेंटिंगचे दळवीज आर्ट मधून शिक्षण घेतल्यानंतर सध्याशिल्पकला कलामंदिर महाविद्यालय येथे शिकत आहे. नाविन्यपूर्ण मांडणी हे वैशिष्ट आहे 

रंगावली 

सूर्यकांत पाटील, इचलकरंजी 

अनेक  रंगावली  प्रदर्शनामधून सहभाग.पारितोषिके मान्यवर स्पर्धांचे परिक्षक म्हणून काम.

अमृत रासम, इचलकरंजी 

ललितकला महविद्यालय -इचलकरंजी येथे ऍडव्हान्स पेंटिंग चे शिक्षण घेत आहे. अनेक  रंगावली  प्रदर्शनात सहभाग. ५६वे  महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात पारितोषिक. 

ओरोगामी 

मंदार वैद्य, कोल्हापूर 

ओरोगामी या प्राचीन जपानी कला प्रकारात तीस वर्षे कार्यरत. ओरोगामीतून गणित -भूमिती इ. विषय  सोप्या पद्धतीने समजावून देण्याचा  प्रयत्न. अनेक महाविद्यालये, आर्किटेक्चर कॉलेज इ. ठिकाणी प्रात्यक्षिके.