Wed, May 22, 2019 07:24होमपेज › Kolhapur › ...अन्यथा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर फौजदारी दाखल करा

...अन्यथा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर फौजदारी दाखल करा

Published On: Aug 05 2018 1:29AM | Last Updated: Aug 05 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कारवाईची भीती दाखवून बी.एल.ओ. कामावर हजर राहण्याची सक्ती करण्यापेक्षा जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर फौजदारी दाखल करा, अशा संतप्त भावना व्यक्त करीत कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बी.एल.ओ.चा आदेश रद्द करा, अशी मागणी शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभासद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना बी.एल.ओ.कामाच्या नियुक्तीचे आदेश संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत लागू करण्यात आले आहेत. या आदेशात फौजदारी कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले असून कामावर हजर होण्याची सक्ती केली जात आहे. 
यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अंतरिम आदेशान्वये मुख्याध्यापक संघाच्या सभासद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना बी.एल.ओ.चे काम देण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे बी.एल.ओ. आदेश रद्द करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. आंदोलनात शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, बाबा पाटील, टीडीएफचे अध्यक्ष राजेश वरक, एस.एस.चव्हाण यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.