Thu, Apr 25, 2019 18:36होमपेज › Kolhapur › कर्जमाफीत प. महाराष्ट्रावर अन्याय

कर्जमाफीत प. महाराष्ट्रावर अन्याय

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 15 2018 10:33PM

बुकमार्क करा
जयसिंगपूर : प्रतिनिधी

34 हजार कोटी कर्जमाफीच्या घोळात शेतकरी अडचणीत आला.   शेतकर्‍यांचा काहीही फायदा झाला नाही. राष्ट्रीयीकृत बँकांनी व्याज वसुलीचा तगादा लावला आहे. जूननंतर व्याज भरायचे कोणी हा प्रश्‍न आहे. जुन्या थकबाकीमुळे नवे कर्ज प्रकरण करता येत नसल्याने त्रांगडे निर्माण झाले आहे. कर्जफेडीमुळे सगळ्यात जास्त तोटा पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा झाला. फायदा राहो शेतकर्‍यांना मन:स्तापच  अधिक झाला, अशी टीका खा.राजू शेट्टी यांनी येथे केली. जयसिंगपुरात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएम सुविधा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

जिल्हा बँकेने अल्पावधीतच प्रगती साधली आहे, असेही ते म्हणाले.  अध्यक्षस्थानी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील होते. यावेळी बँकेचे संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर, संचालिका निवेदिता माने, उपनगराध्यक्ष संजय यड्रावकर यांच्यासह बँक संबंधित विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जी. एम. शिंदे यांनी केले. 

खा. शेट्टी म्हणाले, शासनाने मार्च 2016 पर्यंतचे कर्ज पात्र ठरविले. शेतकर्‍यांना वाटले. आता मार्च 2017 पर्यंतचे कर्जही भरायला लागणार नाही. मात्र, ही अडचण झाली. वेळीच कर्जमाफी न मिळाल्याने केंद्र शासनाच्या पंजाबराव देशमुख योजनेचे 4 टक्के आणि राज्यशासनाचे 2 टक्के असे 6 टक्के शेतकर्‍यांचे नुकसान झाले. यावेळी राजेंद्र यड्रावकर, गणपतराव पाटील, निवेदिता माने यांचीही भाषणे झाली.

...म्हणूनच बाहेर पडलो
महिला सक्षमीकरणात सरकारने कशी हातचलाकी केली हे सांगताना ते म्हणाले, सरकार सांगते एक कुटुंब एक लाभधारक. पती-पत्नी दोघेच राहत असतील तर बायकोला मिळणार, नवर्‍याला मिळणार नाही ही हातचलाकी आहे. महिलांच्या नावावर जमीन कमी असते. त्यामुळे कर्जवगैरे काही नसते. महिला सक्षमीकरण वगैरे काही नाही, असे सांगत निवेदिता माने यांना संबोधित केले. त्यावेळी तुम्ही सरकारात होता, तुम्हालाच सगळे माहीत आहे, असे श्रीमती माने म्हणाल्या. त्यावर म्हणूनच बाहेर पडलो, असे खा. शेट्टी म्हणताच सभेत हशा पिकला.

विकासकामासाठी...
कार्यक्रमाला खा. राजू शेट्टी, माजी खा. निवेदिता माने, राजेंद्र यड्रावकर व गणपतराव पाटील हे आज एकत्रित आल्याने तालुक्यात हा विषय चर्चेचा ठरला. तो धागा पकडून राजेंद्र यड्रावकर म्हणाले, आम्ही सर्वजण एकत्रित आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र शेतकरी केंद्रबिंदू मानून यापुढेही विकासकामासाठी एकत्र येऊ असे ते ठामपणे म्हणाले. 

रक्कम खात्यावर जमा न होण्याचे कारण...
पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता डिजिटल इंडियाचा ढोल पिटणार्‍यांना मला सांगायचे आहे असे सांगून खा.शेट्टी म्हणाले, कर्जमाफीत इन्कमटॅक्स भरणार्‍यांना कर्जमाफी मिळणार नाही असे सांगण्यात आले. मात्र, माझ्या माहितीनुसार सेवानिवृत्त डीवायएसपींचे नाव कर्जमाफीत आहे. केवळ आ.आबीटकरांचेच नाही असे म्हणताच सभेत हशा पिकला. यासाठी जी कंपनी केंद्र शासनाने नेमली होती त्यांना पीककर्ज आणि मध्यम कर्ज ही भानगडच माहीत नव्हती. त्यामुळे कशाचा मेळ कशाला लागला नाही. कंपनीने कामच सोडून दिले. त्यामुळे पैसे खात्यावर जमा न होण्याचे हे प्रमुख कारण आहे, असे ते म्हणाले.