Tue, Aug 20, 2019 04:25होमपेज › Kolhapur › कोणाचीही हरकत नसताना मराठा आरक्षणाला विलंब का?

कोणाचीही हरकत नसताना मराठा आरक्षणाला विलंब का?

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 31 2018 12:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी सर्व जाती-धर्मीयांच्या विकासासाठी आरक्षणाचे पाठबळ दिले होते. स्वातंत्र्यानंतर या आरक्षणापासून बहुसंख्येने असणारा मराठा समाज दुरावला. यामुळे मराठा समाजाची अवस्था अत्यंत मागासली आहे. यामुळे या समाजाला तातडीने आरक्षण मिळणे गरजेचे आहे. इतर सर्व जाती-धर्मांचाही मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. कोणाचीही हरकत नसताना मराठा आरक्षणाला विलंब का, असा सवाल खा. राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारला केला. 

सोमवारी त्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असणार्‍या ‘सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा’च्या ठिय्या आंदोलनात सहभाग घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. खा. शेट्टी म्हणाले, मराठा आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. आपण याबाबत लोकसभेत अनेकवेळा-वेळोवळी प्रश्‍न लावून धरला आहे. मराठा समाजाबरोबरच इतर बहुजन समाजांच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी, असेही सांगितले.

मराठा समाजाला आरक्षणाची किती नितांत आणि तातडीची गरज आहे याबद्दल बोलताना खा. शेट्टी म्हणाले, शेतीला मर्यादा आहेत. कालोघात शेतीवर अवलंबून असणार्‍या कुटुंबांची संख्या सातत्याने वाढली आहे. मराठा-कुणबी शेतकरी स्वत:बरोबरच बारा बलुतेदार समाजालाही आपल्या लहान भावांप्रमाणे मदत करत आला आहे. मात्र, आज अत्यंत तुटपुंज्या शेतीवरच त्याला अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे त्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. दूध, ऊस यासह इतर शेती उत्पन्नांना हमीभाव मिळत नसल्याने यात भरच पडत आहे. शेती उत्पादनांना योग्य हमीभाव आणि शेतकर्‍यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकर्‍याचा मुलगा म्हणून मी आजपर्यंत रस्त्यावर उतरून ऊस, दुध, कांदा यासह विविध प्रकारची आंदोलने हाती घेतली. ही आंदोलने उभारण्यापासून ते यशस्वी करण्यापर्यंत मराठा समाज माझ्या पाठीशी एखाद्या पर्वतासारखा भक्कमपणे उभा असल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले. 

आरक्षणाचा हक्क मिळविताना आंदोलकांनी डोक्यात राख घालूण आत्महत्ये सारखे अनुचीत प्रकार न करता शांतपणे आणि विचाराने वाटचाल करणे गरजेचे आहे. आंदोलनाला यश निश्‍चित आहे. मराठा क्रांती मुकमोर्चाने संपूर्ण जगासमोर आदर्शन निर्माण करून दिला आहे. आपली बाजू सत्य आणि न्यायाची आहे. 

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, माजी जि.प.सदस्य बाबासाहेब देवकर, अ‍ॅड. माणिक शिंदे, प्रा. जालंधर पाटील, बाजीराव देवाळकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मुकबधीरांकडून हातवारे करत पाठींबा
गेला आठवडाभर राज्यव्यापी मराठा आंदोलन भडकले आहे. मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी सुरु असणार्‍या विविध प्रकारच्या आंदोलनांना इतर जाती-धर्मियांचा पाठींबा मिळत आहेच. त्याचबरोबरच विविध क्षेत्रातील संस्था-संघटना, उद्योजक-व्यावसायीक, कामगार, विद्यार्थी अशा प्रत्येक घटकाकडून यथाशक्ती पाठबळ आणि मदतीचे कार्य अखंड सुरु आहे. समाजातील मुकबधीरांनीही आपल्या वेदना बाजूला ठेवून मराठा समाजाला पाठींबा दिला. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ यासह ‘मुकबधीरांच्या’ विविध प्रश्‍नांचे फलक त्यांनी हातात घेतले होते. विविध प्रकारचे हातवरे करून ते घोषणाबाजीत सहभागी होत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठींबा देतानाही त्यांनी विविध प्रकारचे हातवारे आणि हवभाव करून आपल्या भावना लोकांसमोर मांडल्या. त्यांच्या या भावना दुभाषी तज्ज्ञाने लोकांपर्यंत जाहीर केल्या. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मुकबधीर बांधवांच्या भावनांचे स्वागत केले. मुकबधीरांच्या प्रलंबींत प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही खा. राजू शेट्टी यांनी दिली. 

 खा. शेट्टींना रोखल्याने तणाव
खासदार शेट्टींनी आपले भाषण सुरू केल्यानंतर काही वेळाने एका तरुणाने त्यांना मध्येच थांबवत, ‘लोकसभेत आपण मराठा आरक्षणाबाबत किती प्रश्‍न उपस्थित केले?’ असा सवाल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितांसह पोलिसांनी त्याला रोखले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.