Thu, Jun 27, 2019 02:09होमपेज › Kolhapur › दूध संकलनासाठी जबरदस्‍ती केली तर गाठ आमच्याशी : राजू शेट्टी

दूध संकलनासाठी जबरदस्‍ती केली तर गाठ आमच्याशी : राजू शेट्टी

Published On: Jul 07 2018 2:05AM | Last Updated: Jul 07 2018 2:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत, त्यामुळे संघांनी शेतक़र्‍यांच्या भानगडीत पडू नये. गायी घ्यायला पैसे दिले म्हणून दूध संघांकडून उत्पादकांवर संकलनाची सक्ती कराल तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दूध संघांना दिला. दूध दरासाठीची आमची ही लढाई आरपारची आहे, तुम्ही दर वाढवून द्या नाही तर आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, असे आवाहनही त्यांनी संघांना केले. 

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या नावावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे सर्व दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या मेळाव्यात शेट्टी बोलत होते. 

शेट्टी म्हणाले, दूध पावडरचे दर कोसळणार, याची जाणीव मी दीड वर्षापूर्वीच सरकारला करून दिली होती. पण त्यांनी लक्ष दिले नाही. पावडरला थेट अनुदान देता येत नसेल तर उत्पादकाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्या, अशी आमची मागणी आहे. कर्नाटक प्रतिलिटर चार रुपये, गोवा, केरळ राज्य आठ रुपये देत आहे, आम्ही फक्त पाच रुपये मागतो आणि ते देणेही शक्य आहे. 

शेट्टी म्हणाले, आम्ही 25 हजार शेतक़र्‍यांचा मोर्चा काढला तर कोणी ढुंकूनही बघत नाही. म्हणूनच आम्ही आता दूध विकायचे नाही, असा निर्णय घेतलाय. कुणाला पाहिजे त्यांनी आमच्या घरी येऊन ते फुकट न्यावे. पावडर तयार करणार्‍या कंपन्यांना सरकारने 53 कोटी रुपये अनुदानापोटी दिले; पण हा प्रयोगही फसला. या पावडरवरील नुसता जीएसटी रद्द केला तरी लिटरला अडीच रुपये अनुदान देणे शक्य आहे. सरकारने निदान हा तरी निर्णय घ्यावा. 

दूध उत्पादक हा भूमिहीन आहे, त्याला कर्जमाफी मिळालेली नाही, त्याला सरकारने मदत करण्याची गरज आहे. यासाठी तीन महिन्यांत 600 ते 700 कोटी रुपये लागतील. उत्पादक हा रोजगारच करतो. ‘मनरेगा’साठी सरकार वर्षाला 40 हजार कोटींची तरतूद करते, त्यातून या पैशाची व्यवस्था करा. मुंबईचे दूध रोखले की तोंडाला फेस येतो, हा यापूर्वीचा अनुभव आहे, म्हणूनच आम्ही हे हत्यार उपसले आहे, असे शेट्टी यावेळी म्हणाले. 

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, आंदोलन कोणतेही असो ते तोडा आणि फोडा ही सरकारची नीती आहे. एखाद्या विषयावर आंदोलन पुकारले तर त्याच विषयावरील एखाद्या आंदोलकाला उभा करण्याची सरकारची रणनीती यापूर्वी झाली आहे. तसाच प्रकार आताही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गनिमी काव्याप्रमाणे युद्ध जिंकले त्याच पद्धतीने आपल्याला आंदोलन करावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा कोल्हापूर जिल्हा आहे. स्वाभिमानीने ज्या ज्यावेळी आंदोलन केले, त्यावेळी शेतकर्‍यांच्या पदरात काही ना काही पडले आहे. म्हणूनच हे आंदोलनही अधिक तीव्र होईल, याची दक्षता घ्या. ज्यावेळी या आंदोलनाचा इतिहास लिहला जाईल, त्यात या आंदोलनाची नोंद सुवर्णक्षरांनी केलेली असेल.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, सांगलीचे सयाजीराव मोरे, निवृत्त पोलिस उपायुक्त पंढरीनाथ मांडरे, आण्णासो चौगुले, राजेंद्र गड्ड्यान्नावर यांची भाषणे झाली. स्वागत प्रास्ताविक वैभव कांबळे यांनी केले तर आभार चंदगडचे सभापती जगन्नाथ हुलजे यांनी मानले. 

प्रचंड पोलिस बंदोबस्त
स्वाभिमानीने 16 जुलैपासून आंदोलन पुकारले आहे; पण त्याच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या आजच्या बैठकीलाच प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. साध्या वेशातील काही पोलिसही सभागृहात बसले होते. शेट्टी यांनी याचा उल्लेख आपल्या भाषणात करताना पोलिस हे आपलेच आहेत; पण त्यांना वरून आदेश आल्याने ते आंदोलनाला विरोध करतील; पण ओळख नसलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दूध मुंबईला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सांगितले. 

गावठी निरव मोदी व्हा
दूध संघांनी गायी, म्हशी घ्यायला अनुदान दिले आहे, त्यामुळे त्यांच्याकडून संकलनाची सक्ती होईल. अ‍ॅडव्हान्स दिला म्हणून सांगून ते हे काम करतील. सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करा, त्यातूनही जबरदस्ती झालीच तर अ‍ॅडव्हान्स बुडला म्हणून सांगा काय होतय ते होऊ दे, त्या दिवसापुरते तरी गावठी निरव मोदी व्हा, असे शेट्टी म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

पंढरीच्या वारीला दूध द्या
काढलेले दूध करायचे काय, हा तुमच्यासमोर प्रश्‍न असेल. एक थेंबही दूध संघाला जाणार नाही याची खबरदारी कार्यकर्त्यांनी घ्या, त्यातूनही दुधाचे काय करायचे, असा प्रश्‍न पडला असेल तर कालपासून पंढरीची वारी सुरू झाली आहे, त्या वारीकडे हे दूध पाठवा. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 16 जुलैला पंढरीच्या विठुरायाला आम्ही दुधाचा अभिषेक घालणारच आहोत, वारकरीही यानिमित्ताने या दुधाचा लाभ घेतील, असे शेट्टी म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांनी दुग्ध विकास मंत्री प्रा. महादेव जानकर यांनाही हे दूध पाठवा, अशी आरोळी दिली. 

लेखी आदेशाशिवाय आंदोलन मागे नाही : खा. शेट्टी

दूध पावडर निर्यातीला प्रती किलो 50 रुपये व पावडर निर्यात करणा़र्‍या दूध संघांना दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा शासनाचा लेखी आदेश आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. 

शेट्टी म्हणाले, असा निर्णय झाला असेल तर त्याचे स्वागतच आहे; पण ही चर्चा अधिवेशन सुरू असताना सभागृहाबाहेर होऊ शकत नाही. यावर चर्चा होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाची घोषणा सभागृहातच व्हायला हवी, त्यानंतर तसा लेखी आदेश काढला पाहिजे तर त्याला महत्त्व आहे. हा आदेश निघत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. आमची मागणीच मान्य होत असेल तर काय हरकत नाही मग आंदोलनाची गरज काय, आंदोलनाचा निर्णय आदेश आल्यावरच घेणार. 

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान कोणत्या किमतीवर देणार हे स्पष्ट नाही. आता असलेल्या दरावर देणार की 27 रुपयांवर देणार हे पहावे लागेल. हा शेतक़र्‍यांना फसवण्याचा धंदा आहे. अजून खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलनही सुरू नाही तोपर्यंत सरकार निर्णय कसा घेते.

यातून शेट्टी यांनाच हे क्रेडिट देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. कुणाचे दूध किती आले हे कोण ठरवणार, दर वाढवून मागणारे आणि देणारेही संगनमताने फसवणूक करत आहेत. भ्रष्ट लोकांनाच हा पैसा वाटण्याचा धंदा आहे.