Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › काँग्रेसप्रणीत महाआघाडीत खा. शेट्टीही येणार

काँग्रेसप्रणीत महाआघाडीत खा. शेट्टीही येणार

Published On: Feb 07 2018 1:56AM | Last Updated: Feb 07 2018 1:46AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने देशभरातील समविचारी पक्षांना एकाच छताखाली आणण्यास सुरुवात केली आहे. महाआघाडीच्या माध्यमातून भाजपला समर्थ पर्याय व कडवे आव्हान देण्याचे धोरण ठरले आहे. या महाआघाडीत खा. राजू शेट्टी हेदेखील सहभागी होणार आहेत. येत्या काळात परिवर्तनाची नांदी होेणार असून, दिल्‍ली व मुंबईत आश्‍वासक चित्र उभे राहील, अशी माहिती आ. अमित विलासराव देशमुख यांनी दिली. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या निमंत्रणावरून करवीरमधील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या आ. देशमुख यांनी काँग्रेस कमिटीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री प्रतीक पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्यासह ‘गोकुळ’चे संचालक, जि.प.चे आजी-माजी सदस्य उपस्थित होते. 

आ. देशमुख म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात जनतेत रोष वाढला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गल्‍लीपासून दिल्‍लीपर्यंतचा रोष एकत्रित करून भाजपला समर्थ पर्याय देण्यासाठी महाआघाडी आक्रमक होणार आहे. राज्य व देशातील समविचारी पक्षांना एकत्रित करून रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली जाणार आहे. त्याची सुरुवात संविधान बचाव रॅलीद्वारे झाली असून, हाच फॉर्म्युला लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठीही वापरला जाणार आहे. 

आ. देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारांच्या धोरणांवर टीका करताना या दोन्ही सरकारांनी जनतेचा अपेक्षाभंग केला असून, सध्या देशाची परिस्थिती चिंताजनक असल्याचा आरोप केला.  अर्थसंकल्पावरून देशभर नैराश्याची भावना आहे. सारेच घटक रस्त्यावर येऊन आंदोलने, उपोषणे, मोर्चाच्या माध्यमातून रोष व्यक्‍त करत आहेत. एफआरपी, सूतगिरण्यांचे प्रश्‍न जटिल झाले असताना सरकार उदासीन असून प्रश्‍न सोडवण्यासाठी कोणताही हस्तक्षेप करताना दिसत नाही. सरकार नुसतेच भूमिपूजन करत सुटले आहे, एकही नवीन कारखाना सुरू झालेला नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालल्याने या सरकारकडून जनतेने अपेक्षा तरी ठेवायची की नाही, हाच प्रश्‍न पडत असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.

सरकारकडून कुठला कर कधी आकारला जाईल, याचा काही नेम राहिलेला नाही. लोक करावरून घाबरले असून देशभरात कराचा दहशतवाद असल्यासारखे वातावरण आहे.

गटबाजी नव्हे, ही तर सकारात्मक स्पर्धा

काँग्रेस सत्तेपासून दूर जाण्यामागे पक्षांतर्गत गटबाजी कारणीभूत ठरल्याबाबतचा प्रश्‍न विचारला असता आ. देशमुख यांनी ही गटबाजी नव्हती, तर पक्षांतर्गत नेत्यांमधली सकारात्मक स्पर्धा होती, अशी टिप्पणी केली. पण, आता मागील चुका टाळून सर्व जण एकत्र आलो असून, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आश्‍चर्यकारक व सुखद निकालाची चित्रे जिल्ह्यात, राज्यात व देशातही दिसतील. भाजप सरकारने जनतेचा तर भ्रमनिरास केला आहेच, शिवाय ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केले त्यांच्यावरही पश्‍चात्ताप करण्याची वेळ आणली आहे. देशभरात काँग्रेससाठी असलेले अनुकूल वातावरण पाहता येत्या काळात अनेक पक्षांतरे झालेली, घरवापसी झालेली दिसेल. एकनाथ खडसेंचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे आ. देशमुख यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूरचा विकास फक्‍त पोस्टरवरच

राज्यात कोल्हापूरचे दांडगे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत; पण तरीही प्रश्‍न कायम असून विकास फक्‍त पोस्टरवरच दिसत आहे. आराखडा मंजूर झाल्याचे पोस्टर शहरात आपण पाहिले; पण या विकासाचा सामान्य माणसाला स्पर्श झाल्याचे कुठे दिसले नाही. असे असेल तर याला विकास झाला म्हणणे  दिशाभूल करण्यासारखेच आहे, असा टोला आ. देशमुख यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता  लगावला.