Wed, Apr 24, 2019 20:13होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूरच्या विमानसेवेचे शिल्‍पकार छत्रपती राजाराम महाराज(व्हिडिओ)

१९३९ मध्ये ३२ रुपयांत होता कोल्हापूर-मुंबई विमान प्रवास(व्हिडिओ)

Published On: Jan 18 2018 1:58PM | Last Updated: Jan 18 2018 6:53PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

'विमान सेवेमुळे कोल्‍हापूर-मुंबई हे हवाई अंतर घटले असून जनतेची अत्यंत चांगली सोय झाली आहे. जनतेच्या सुखसोयी वाढविण्याकरिता मी नेहमी प्रयत्‍न करीतच आहे आणि त्यासाठी केवढाही त्याग करावा लागला तरी तो करण्याची माझी तयारी आहे,' हे उद् गार आहेत करवीर संस्‍थानचे छत्रपती राजाराम महाराज यांचे. ५ जानेवारी १९३९ रोजी कोल्‍हापुरातील विमानतळाचे उद् घाटन केल्यानंतर त्यांनी जनतेला उद्देशून भाषण केले होते. आज कोल्‍हापूर विमानतळाचा रेंगाळता प्रश्‍नाच्या पार्श्‍वभूमीवर राजाराम महाराजांचे हे उद्गार हे एका प्रजाहितदक्ष राज्यकर्त्याच्या तोंडीच शोभून दिसतात याचा प्रत्यय येतो. त्यामुळेच कोल्‍हापूर विमानतळाला राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा आग्रह होता. राज्य सरकारने ही मागणी मान्य केल्याने सध्या कोल्हापुरात आनंदाचे वातावरण आहे. 

करवीर संस्‍थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य हे करवीरच्या विकासासाठी अतुलनीय होते. त्यामुळेच देशभर त्यांच्या कतृत्‍वाचा गवगवा झाला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करणारे त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज (तिसरे) यांनीही करवीर संस्‍थानला आधुनिक युगात घेऊन जाणारे कार्य केले. राजर्षी शाहू महाराजांनी करवीरला रेल्‍वे आणली तर त्यापुढे एक पाऊल टाकत राजाराम महाराजांनी कोल्‍हापूरला विमानसेवेने जोडले. स्वतः लक्ष घालून त्यांनी १९३९ मध्येच करवीरमधून विमानाचे उड्‍डाण घडविले. सध्या विमानतळाचा चिघळत असणारा प्रश्न विचारात घेता तत्‍कालीन प्रतिकूल परिस्थितीत असणार्‍या महाराजांच्या दूरदृष्‍टीचा प्रत्यय येतो.

कोण होते छत्रपती राजाराम महाराज?

छत्रपती राजाराम महाराज (तिसरे) हे शाहू महाराजांचे ज्येष्‍ठ चिरंजीव होते. ३१ जुलै १८९७ रोजी त्यांचा जन्‍म झाला. १८९७ पासून ते राजर्षी शाहू महाराजांच्या मृत्यूपर्यंत (१९२२) ते करवीर संस्‍थानचे युवराज होते. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर करवीर संस्‍थानच्या गादीवर त्यांचा राज्याभिषेक झाला. शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा वसा पुढे चालवण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. 

ब्रिटिश सरकारनेही राजाराम महाराजांच्या कामगिरीची दखल घेतली. त्यांना १९२४ मध्ये 'नाईट ग्रॅण्‍ड कमिशनर ऑफ दि ऑर्डर ऑफ दि इंडियन एंपायर (जीसीआयई)', १९३१ मध्ये 'नाईट ग्रॅण्‍ड ऑफ दि ऑर्डर ऑफ दि स्‍टार ऑफ इंडिया (जीसीएसआय)', कर्नल, ब्रिगेडियर यासारख्या पदव्यांनी गौरव केला. 

करवीर संस्‍थानच्या विकासासाठी हयातभर झगडणार्‍या या छत्रपतींचे निधन २६ नोव्‍हेंबर १९४० रोजी झाले. 

वाचा : विमानतळास राजाराम महाराजांचे नाव देऊन वचनपूर्ती : चंद्रकांत पाटील

आपल्या कामगिरीमुळे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्‍थानात विकासाचा पाया रचला. सरकारी मालकीचा पहिला उद्योग राजर्षी शाहू छत्रपती मिल्‍सची उभारणी केली. उद्योजकांना प्रोत्‍साहन दिले. गुळाची बाजारपेठ वसवली. उद्योग व्यवसायात आधुनिकता आणत असतानाच समाज सुधारणांचा ध्यास घेतला. संस्‍थानला मुंबई सारख्या शहराशी जोडण्याकरीता मर्यादित उत्‍पन्‍न असतानाही मिरजेहून कोल्‍हापूरला रेल्‍वे आणली. या दूरदृष्‍टीमुळे करवीर संस्थान देशाच्या इतर भागाशी जोडले गेले, त्याचबरोबर त्याचा उद्योग विकासातही मोठा फायदा झाला.

विमानसेवेचा ध्यास व विमानाचे उड्‍डाण

राजर्षी शाहू महाराजांच्यानंतर त्यांचे थोरले चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज करवीर संस्‍थानच्या गादीवर आले. शाहू महाराजांचेच धोरण पुढे चालवताना त्यांनी कोल्‍हापूरला आधुनिक युगात आणण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी कोल्‍हापूर बेळगाव रस्‍त्यावर कोल्‍हापुरातून चार ते साडेचार मैलावर उजळाईवाडीच्या माळावर विमानतळाची उभारणी केली. त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारच्या त्यागाची तयारी ठेवली. 

वाचा विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव

५ जानेवारी १९३९ रोजी कोल्‍हापूर विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराजांनी उद् घाटन केले. त्यावेळच्या भाषणात महाराजांनी विमानसेवेचे महत्त्‍व आपल्या जनतेपुढे सांगितले. विमानसेवेमुळे कोल्‍हापूर-मुंबई हे हवाई अंतर घटले असून, जनतेची अत्यंत चांगली सोय झाली आहे. जनतेच्या सुखसोयी वाढविण्यासाठी मी नेहमी प्रयत्‍न करीतच आहे आणि त्यासाठी केवढाही त्याग करावा लागला तरी तो करण्याची माझी तयारी आहे. आज सुरू होणार्‍या विमान सेवेला मी सुयश चिंतीतो, असे राजाराम महाराज म्‍हणाले. त्यानंतर त्यांनी विमानातून फेरफटका मारला व विमानात बसून फिरण्यात आनंद वाटत असून, यापुढे विमानातून मी कोठेही जाऊ शकेन, असेही उद्गार काढले.

अशी होती विमान सेवा

राजाराम महाराजांच्या प्रयत्‍नातून सुरू झालेल्या या विमानसेवेमुळे कोल्‍हापूर थेट विमान सेवेद्वारे मुंबई, पुणे या शहरांशी जोडले गेले. सोमवार, बुधवार व शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस कोल्‍हापुरातून विमान मुंबईसाठी रवाना होत होते. कोल्‍हापूर-मुंबई विमानसेवेचे भाडे ३२ रुपये होते तर परतीच्या प्रवासासह भाडे ५८ रुपये एवढे होते. तसेच कोल्‍हापूरहून पुण्यासाठी २० रुपये भाडे होते. मुंबईहून सकाळी ७.१५ ला सुटणारे विमान पुण्यात २० मिनिटे थांबून ९.१५ वाजता कोल्‍हापुरात येत असे. तर येथे अर्धा तास थांबून विमान परत ९.४५ वाजता परत निघून पुण्यात २० मिनिटे थांबून ११.४५ वाजता ते मुंबईत पोहोचत असे.

या विमान सेवेसाठी महाराजांनी सर्व्हिस एजन्‍सीही नेमली होती. त्यासाठी मेसर्स चिमासाहेब बागल व दादासाहेब कोळे यांची नेमणूक झाली होती. राजाराम महाराजांच्या या कार्याचा विचार करता ते कोल्‍हापुरातील विमान सेवेचे शिल्‍पकार ठरतात.