होमपेज › Kolhapur › राईनपाडा हत्याकांडातील दोषींना फाशी द्या

राईनपाडा हत्याकांडातील दोषींना फाशी द्या

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 24 2018 11:58PMकोल्हापूर: प्रतिनिधी

राईनपाडा हत्याकांडप्रकरणी त्वरित आरोपपत्र दाखल करा आणि दोषींना फाशी द्या, अशी मागणी करत नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी काढण्यात आलेल्या या मोर्चाला समाजबांधवाची मोठी गर्दी होती. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. येत्या क्रांतीदिनापर्यंत कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

विविध लोककलांची उपासना करत, भिक्षा मागत गेली अनेक वर्षे उदरनिर्वाह करत आलो आहे, मारामारी, भांडण-तंटा, गुन्हेगारी, चोर्‍या असा डाग आमच्या समाजावर नाही. प्रामाणिकपणे जगणार्‍या आमच्या समाजावर हा अन्याय का, असा सवाल करत समाजावर होणार्‍या अत्याचाराविरोधातला हा समाजाच्या एकजूटीचा मोर्चा असल्याच्या भावना समाजबांधवांनी व्यक्त केल्या. 
दसरा चौकात जिल्ह्यासह परजिल्ह्यातून आलेल्या समाजबांधव जमले होते. दुपारी 2 वाजता लोकराजा राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. शिव-शाहूंचे पोवाडे, बहुरूपीसह विविध पारंपरिक वेशभूषेतील समाजबांधव मोर्चाच्या अग्रभागी होते. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार चित्रपटगृह मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. राईनपाडा घटनेचा निषेध करत समाजबांधवांनी शंखध्वनी करत परिसर दणाणून सोडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला.

भिक्षा मागून उदरनिर्वाह करणार्‍या पाच जणांची अमानूष हत्या करण्यात आली. वेदनेने तडफडणार्‍यांची त्या राक्षसीवृत्तीला दया आली नाही.अत्यंत क्रूरपणे या पाचही जणांची हत्या करण्यात आली. या प्रकारचा निषेध करावा तितका थोडाच आहे. याविरोधात झालेली ही समाजबांधवाची एकजूट अशीच अभेद्य राहू द्या, असे आवाहन जे.के.माळी यांनी केले. यावेळी अनेकांनी भावना व्यक्त केल्या.
राईनपाडा हत्याकांडाचा हा खटला जलदगती न्यायालयाकडे द्यावा, सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, हत्याकांडातील व्यक्तींच्या वारसांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 25 लाख रुपये द्या, वारसांना तत्काळ सरकारी नोकरीत सामावून घ्या, फरारी संशयितांना अटक करा, समाजातील लोकांना जिल्हा व तालुकास्तरावर ओळखपत्रे द्या,  समाजाची भटकंती थांबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घर, नोकरी द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

या मोर्चाचे नेतृत्व अनिल शिंदे, अर्जुन लगंस, काशिनाथ चौगुले, दादा जगताप, सुभाष शिंदे, उत्तम शेळके, राम साळूंखे, प्रकाश शिंदे, बाजीराव नाईक, सुभाष देसाई, जगन्नाथ माळवे, आण्णा शिंदे, आदिनाथ शिंदे,एकनाथ शिंदे, सखाराम चव्हाण, डॉ. डी.आर. भोसले, निवृत्ती शिंदे, नाथ शिंदे आदींनी केले.