Fri, Apr 26, 2019 09:38होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 04 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून तीन दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत गगनबावड्यात 21 मि.मी. पावसाची नोंद झाली.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. ढगाळ वातावरण, हवेतील गारवा यामुळे जिल्ह्यात मान्सूनसदृश वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यात मंगळवार, बुधवारपर्यंत मान्सून दाखल होईल, अशी शक्यता आहे. याच दरम्यान मंगळवारपासून तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 4.24 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावड्यात 21 मि.मी. इतका नोंदवला गेला. राधानगरीत 13 मि.मी., तर भुदरगडमध्ये 11 मि.मी. पावसाची नोंद झाली. करवीरमध्ये दोन मि.मी., तर आजर्‍यात एक मि.मी. पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्याने धरणातील पाणी पातळी संथ गतीने वाढण्यास सुरुवात झाली आहे.