Fri, May 24, 2019 06:55होमपेज › Kolhapur › शहरात उघडीप; धरण क्षेत्रात अतिवृष्टी

शहरात उघडीप; धरण क्षेत्रात अतिवृष्टी

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 12:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहर आणि परिसरात पावसाने उघडीप दिली असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला. दहा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. ‘राधानगरी’चे आणखी दोन स्वंयचलित दरवाजे खुले झाले आहेत. धरणातील विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पातळीत बुधवारी सकाळपासून पुन्हा वाढ सुरू झाली आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, मंगळवारी सायंकाळनंतर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात विशेषत: धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील प्रमुख 14 धरणांपैकी 10 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणातील विसर्ग आज पुन्हा वाढवण्यात आला.

राधानगरी धरण परिसरात 24 तासांत 118 मि.मी.पावसाची नोंद झाली. यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली. त्यामुळे धरणांचे चार आणि पाच क्रमांकाचे आणखी दोन स्वंयचलित दरवाजे खुले झाले. यामुळे धरणातून होणारा एकूण विसर्ग 3 हजार 756 क्युसेकपर्यंत वाढला आहे. राधानगरीसह कुंभी, कासारी, कोदे धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरू झाली आहे. पंचगंगेची पातळी बुधवारी सकाळी आठ वाजता 32.7 फुटांवर होती. सकाळी 11 वाजता ती 32.9 फुटांपर्यंत वाढली. दुपारी 3 वाजता ती 32.10 वर गेली. दुपारपासून स्थिर राहिली आहे. 

वारणा धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी धरणातून 4 हजार 716 क्युसेक विसर्ग सुरू होता. यानंतर धरणाचे चार दरवाजे 0.50 मीटरने वर उचलण्यात आले. त्यातून सध्या 7 हजार 997 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आला असून तो सध्या 57 हजार 377 क्युसेक करण्यात आला आहे.  यामुळे वारणेच्या पातळीत पुन्हा वाढ सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत सतत चढ-उतार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अद्याप 43 बंधारे पाण्याखाली आहेत. या बंधार्‍यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू असल्याने सुमारे 100 हून अधिक गावांचा थेट संपर्क  तुटलेलाच आहे. बंधार्‍यावर पाणी आल्याने बाचणीमार्गे कोल्हापूर-वाळवा, शिरगाव-तारळे आणि शिरढोण-कुरुंदवाड  या तीन मागार्र्ंवरील एस.टी.सेवा बंद आहे. 

शहर आणि परिसरात बुधवारी सकाळपासून कडकडीत ऊन पडले होेते. पावसाने काही काळ विश्रांती घेतली. अधूनमधून एकादी सर कोसळत होती. त्यानंतर पुन्हा कडकडीत ऊन पडत होते, असे चित्र शहरात दिवसभर होते. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 29.32 मि.मी.पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली. तिथे सर्वाधिक 68 मि.मी.पावसाची नोंद झाली. राधानगरीत 46.17 मि.मी., शाहूवाडीत 45.66 मि.मी., चंदगड व आजर्‍यात प्रत्येकी 38 मि.मी., कागलमध्ये 28 मि.मी., भुदरगडमध्ये 24.80 मि.मी., करवीरमध्ये 18.09 मि.मी., पन्हाळ्यात 14.43 मि.मी. तर हातकणंगलेत 9.88 मि.मी. व शिरोळमध्ये 6 मि.मी. पावसाची नोंद झाली.