Sat, Nov 17, 2018 12:04होमपेज › Kolhapur › महिनाभर रेल्वे ‘फुल्ल’च

महिनाभर रेल्वे ‘फुल्ल’च

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 06 2018 12:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरातून सुटणार्‍या रेल्वे गाड्या फुल्लच आहेत. मे अखेरपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. रेल्वेसाठी प्रवाशांची गर्दी वाढत असून स्थानकावर गजबज वाढली आहे. 
लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी आणि कमी पैशात व्हावा याकरिता प्रवासी रेल्वेला सर्वाधिक पसंती देतात. यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे मे महिन्यात कोल्हापूर स्थानकातून सुटणार्‍या बहुतांशी लांब पल्ल्याच्या गाड्यांना गर्दी वाढत असून मे अखेरपर्यंतची तिकिटे संपल्याचे चित्र आहे.

उन्हाळी सुट्टीनिमित्त स्थानकावरील गर्दीतही वाढ होत आहे. एरव्ही होणार्‍या गर्दीच्या तुुलनेत गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकावरील गर्दीत तिपटीने वाढ झाली आहे. वाढत्या गर्दीने रेल्वे स्थानकावर यापूर्वी केवळ गाडीच्या येण्या जाण्याच्या वेळेपुरती दिसणारी गजबज सध्या दिवसभर दिसत आहे.

गर्दीमुळे अपघाताची भीती

कोल्हापुरातून सुटणार्‍या बहुतांशी सर्वच गाड्यांना मोठी गर्दी होऊ लागली आहे. सर्वसाधारण (जनरल) डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांचीही संख्या अधिक आहे. या डब्यात जागा धरण्यासाठी प्लॅटफार्मवर येत असलेल्या धावत्या गाडीतच चढण्याचा काहींचा प्रयत्न असतो, त्यातून ढकलाढकलीसारखेही प्रकार होत असतात. यातून अपघात होण्याची भीती आहे. प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

‘तत्काळ’ तिकिटासाठी रांगा

लांब पल्ल्याच्या गाड्या मे अखेरपर्यंत फुल्ल आहेत. यामुळे ‘तत्काळ’ तिकिटांसाठी मोठी गर्दी होत आहे. सकाळी ‘तत्काळ’ तिकिटासाठी प्रवाशांच्या रांगा लागत असल्याचे चित्र रेल्वे स्थानकावर आहे. रेल्वे प्रशासनानेही याकरिता स्वतंत्र तिकीट विक्री खिडकीची व्यवस्था केली आहे.