Wed, Jan 29, 2020 22:18होमपेज › Kolhapur › रेल्वे पोलिसांकडून साडेपाच लाखांची रक्कम परत

रेल्वे पोलिसांकडून साडेपाच लाखांची रक्कम परत

Published On: Dec 08 2017 10:27PM | Last Updated: Dec 08 2017 10:13PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

रेल्वेत विसरलेली साडे पाच लाख रकमेची बॅग पोलिसांकडून प्रवाशाला परत करण्यात आली. रेल्वेचे कॉन्स्टेबल विशाल माने (रा. सोलापूर) यांना पहाटे सहाच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये ही बॅग मिळाली. कोल्हापूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन जिनालय ट्रस्टच्या विश्‍वस्तांशी संपर्क साधून ही बॅग परत केली. 

जबलपूर येथील 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन जिनालय ट्रस्टचे दोन साधक गुरुवारी रात्री सात वाजता मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसने निघाले. पहाटे साडे पाचच्या सुमारास दोघे हातकणंगले स्थानकावर उतरले. त्यांच्याजवळील बॅग रेल्वेतच राहिल्याचे त्यांना लक्षात आले नाही. सहाच्या सुमारास गस्तीवर असणारे कॉन्स्टेबल विशाल माने यांना बेवारस बॅग मिळून आली. त्यांनी बॅगेविषयी प्रवाशांकडे चौकशी केली पण बॅग कोणाची आहे समजू शकले नाही. रेल्वे कोल्हापूर स्थानकावर आल्यानंतर त्यांनी बॅगेत पाहिले असता त्यात रोख रक्कम असल्याचे दिसले. याची माहिती माने यांनी वरिष्ठांना दिली. मिरजेहून पोलिस निरीक्षक ए. के. मिश्रा कोल्हापुरात आले. बॅगेची तपासणी केली असता एक डायरी मिळाली. मुंबईत कार्यालयाच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधून बॅगेची माहिती दिली. यानंतर सुरेंद्रकुमार जैन (वय 48) हे बॅग घेऊन गेल्याचे त्यांना सांगितले. मुंबई कार्यालयाने सुरेंद्र कुमार जैन यांना माहिती देवून  रेल्वे स्थानकावर जाण्याची सूचना केली. अकराच्या सुमारास ही रक्कम ट्रस्टच्या सदस्यांकडे परत करण्यात आली. मूळचे सोलापूरचे असणारे विशाल माने यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.