जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून चार जुगार्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई सायंकाळी पावणे सातच्या सुमारास करण्यात आली. मात्र, याबाबत फारच गोपनीयता पाळण्यात आली होती. ‘कलश’ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू होता.
कारवाईत 14 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये 4 हजार 730 रोकड, चार मोबाईल, पत्ते यासह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. जयसिंगपूर पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही कारवाई केली.
अनिल धर्मा लोंढे (वय 32, रा. 11वी गल्ली, जयसिंगपूर), संतोष भिमराव खोत (32, रा. कुपवाड), सत्यजीत उर्फ शेखर विजय माले (32, रा. 7वी. गल्ली, राजीव गांधीनगर, जयसिंगपूर) व इकबल उर्फ हापीज मेहबूब बारगीर (49, रा. भिलवडी) अशी ताब्यात घेतलेल्या जुगार्यांची नावे आहेत. कलश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली पैसे लावून जुगार खेळत होते. चंद्रहीरा कॉम्प्लेक्समध्ये हा अड्डा सुरू होता.