Tue, Apr 23, 2019 01:54होमपेज › Kolhapur › कोल्हापूरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

कोल्हापूरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 22 2018 1:32AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

इचलकरंजी -कोल्हापूर रस्त्यावरील कबनूरजवळील हॉटेल न्यू सोनाली इरॉस अँड लॉजिंग, बोर्डिंग या हॉटेलवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. याबाबतची तक्रार पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांना मिळाली होती. त्यानुसार  बनावट गिर्‍हाईक पाठवून ही कारवाई करण्यात आली.

मुस्कान मुबारक शेख (वय 45, रा. सांगली नाका), मुमताज हेमंत शिंदे (वय 47, रा. ब्रह्मपुरी मिरज) या महिला एजंटसह लॉजचा मॅनेजर जावेद सलीम सय्यदमुल्ला (वय 27, रा. रूई), रिक्षाचालक अनमोल गुलाब पठाण (वय 45, रा. नदीवेस नाका) या चौघांना अटक केली तर पीडित दोन युवतींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. पोलिसांनी रोख रक्‍कम, मोबाईल हँडसेट व लॉजची कागदपत्रे जप्‍त केली आहेत. 

राजकीय नेत्याच्या भावाचे हे हॉटेल आहे. गतवर्षी महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर येथील दारू विक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास चार महिने हॉटेल बंदच होते. हॉटेल मालकाने पूर्वीपासूनच दारू विक्री आणि लॉजिंग व्यवसाय चालवण्यासाठी हॉटेल भाड्याने दिले आहे. जावेद मुल्ला हा  व्यवस्थापन पाहत आहे. कर्नाटकातील इंडियन रेस्क्यू मिशन या एनजीओकडे याठिकाणी वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी उपअधीक्षक नरळे यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन नरळे व निर्भया पथकाने बनावट गिर्‍हाईक पाठवले. यावेळी मुस्कान शेख व मुमताज शिंदे यांनी त्या गिर्‍हाईकाला हॉटेल इरॉस येथे बोलावून घेतले.

वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी बनावट गिर्‍हाईकाच्या आधारे छापा टाकला. यावेळी मुस्कान व मुमताज यांच्यासह लॉजचा व्यवस्थापक जावेद सय्यदमुल्ला यांना अटक केली. यावेळी लॉजवरच वेश्या पुरवणारा रिक्षाचालक अनमोल पठाण यालाही रंगेहाथ पकडले. पोलिसांनी यावेळी संपूर्ण हॉटेलची तपासणी केली. यामध्ये रजिस्टर, रूम बुक करताना ग्राहकांनी दिलेली कागदपत्रे ताब्यात घेतली. मात्र, या महिलांच्या कोणत्याच नोंदी रजिस्टरमध्ये मिळून आल्या नाहीत. लॉजवरून ताब्यात घेतलेल्या महिलांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्याकडून जबाब नोंदवून घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पीडित युवतींमध्ये एक इचलकरंजी तर एक कर्नाटकातील बोरगावमधील असल्याचे समोर येत आहे तर मुमताज शिंदे ही एजंट महिला मिरज येथील आहे. त्यामुळे आंतरराज्य वेश्या व्यवसाय सुरू असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

हॉटेल चालकाचा भाऊ वजनदार राजकीय नेता असल्यामुळे पोलिसांची कारवाई झाल्यानंतर राजकीय नेत्यांनी कारवाई थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कोणाचीही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली. .

Tags : Kolhapur, Kolhapur News, raid, Kolhapur Ichalkaranji road, hotels, prostitution, business exposed, police