Mon, May 20, 2019 08:52होमपेज › Kolhapur › कार्बन क्रेडिटचा लाभ शेतकर्‍यांना द्यायला हवा

कार्बन क्रेडिटचा लाभ शेतकर्‍यांना द्यायला हवा

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 03 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भारतात विशेषत: महाराष्ट्रात शेतकर्‍यांची स्थिती विदारक आहे. शेती प्रतिकूल स्थितीत करावी लागत आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकर्‍यांचा सक्षम करण्यासाठी विविध क्षेत्रांतील ज्ञानवंतांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकर्‍यांसाठी करायला हवा. कार्बन क्रेडिटचा लाभ शेतकर्‍यांना थेट द्यायला हवा, असे मत गुरुवारी झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत मान्यवरांनी मांडले.
शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग आणि शेतकरी संघटनेच्या वतीने विद्यापीठाच्या भाषा भवन सभागृहामध्ये  झालेल्या  ‘कार्बन क्रेडिट्स आणि जल व्यवस्थापन’ या  कार्यशाळेचे उद्घाटन  कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष  रघुनाथदादा पाटील उपस्थित होते. 

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, भारत हा शेतीप्रधान देश असून, शेतीच्या बळावर देशाला मोठ्या प्रमाणावर कार्बन क्रेडिट्स मिळविणे शक्य आहे. एक लिटर पाणी वापरत असताना त्यातून चार ते पाच लिटर सांडपाणी आपण तयार करतो. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. 

रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकरी हा खरा संशोधक आहे. शेतीच्या माध्यमातून अन्नधान्यांच्या विविध वाणांचा प्रयोगांती शोध लावून पिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो. शेतकर्‍यांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्तच ठरेल. 

पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख  डॉ. पी. डी. राऊत यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. डी.आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील आदींसह सोलापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, बीड आदी जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेतकर्‍यांना विकासाचे भागीदार करावे
 शेतकरी संघटनेचे पाटील म्हणाले, पिकांमुळे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड नष्ट केला जातो आणि ऑक्सिजन निर्माण केला जातो. कार्बन आणि पाण्यामुळे साखर बनते. त्यामुळे शेतकरी हाच प्रदूषणमुक्तीसाठी प्रमुख पर्याय आहे. त्यामुळे त्यांना विकासाचे भागीदार करून लाभ द्या.