Mon, Aug 19, 2019 11:55होमपेज › Kolhapur › राधानगरी अभयारण्यात आजपासून काजवा महोत्सव

राधानगरी अभयारण्यात आजपासून काजवा महोत्सव

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 19 2018 1:01AMराधानगरी : वार्ताहर

विविधतेने नटलेल्या आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेष नैसर्गिक वारसा लाभलेल्या राधानगरी अभयारण्यात ग्रामपंचायत व बायसन नेचर क्लबच्या वतीने शनिवार (दि. 19) पासून काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अंधार्‍या रात्री प्रकाश सोडून सर्वांना मोहीत करणारा काजवा पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून जीवशास्त्राच्या अभ्यासकां बरोबरच पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणीच असणार आहे. 

सायंकाळी 6 वाजता महोत्सव सुरू होणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या मध्यानंतर ते पाऊस सुरू होईपर्यंत राधानगरी-दाजीपूर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. हिरडा, बेहडा, अंजनी, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा बसेरा असतो.  झाडांच्या खोडांवर, फांद्यांवर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरू असतोे. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप डोळ्यांना सुखाऊन जाते.  सभोतालच्या काजव्यांच्या विराट पसार्‍यात पर्यटक स्वत:ला हरवून बसतात. काजव्यांनी निसर्गप्रेमी, लेखक, कवी, पर्यटक अशा सर्वच घटकांना भुरळ घातली आहे. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा, असाच हा राधानगरीचा प्रकाशउत्सव राधानगरी फराळे जंगल परिसरात 19 मे पासून होणार आहे.