Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Kolhapur › कणभर विकासाच्या बदल्यात मणभर ‘विनाश’!

कणभर विकासाच्या बदल्यात मणभर ‘विनाश’!

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:39PMकोल्हापूर : सुनील कदम

हिंडाल्को कंपनीने राधानगरी तालुक्यात काही फुटकळ स्वरूपाची विकासकामे करून स्थानिक लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या ‘कणभर विकासाच्या बदल्यात अभयारण्य परिसराचा मणभर विनाश’ सुरू असल्याची या भागातील पर्यावरणप्रेमी लोकांची भावना आहे. त्यामुळे हिंडाल्कोच्या या प्रकल्पाला आता स्थानिक लोकांमधून वाढता विरोध होताना दिसत आहे.

हिंडाल्को कंपनीची वार्षिक उलाढाल ही काही हजार कोटी रुपयांची असून त्याच पटीत कंपनीचा फायदाही होत आहे. मात्र, या बदल्यात कंपनीने या भागात केलेली काही विकासकामे ही फुटकळ म्हणता येतील अशा स्वरूपाची आहेत. एखाद्या शाळेला कंपाऊंड घालणे, एखाद्या वाडी-वस्तीसाठी छोटासा रस्ता बांधून देणे अशा स्वरूपाची ही कामे आहेत. मात्र, येथील बॉक्साईटचा वापर करून कंपनी करीत असलेली वार्षिक उलाढाल ही कित्येक पटीने मोठी आहे. कंपनी इथल्या बॉक्साईटच्या माध्यमातून मिळवीत असलेल्या फायद्याच्या तुलनेत ही विकासकामे म्हणजे ‘दर्या में खसखस’ अशा स्वरूपाची असल्याचा या भागातील पर्यावरणप्रेमी लोकांचा दावा आहे.

अभयारण्य परिसरात होत असलेल्या बॉक्साईट खुदाईमुळे कशा स्वरूपाचा विनाश ओढवू शकतो, ते बघायचे असेल तर चंदगड तालुक्यातील कासारखडा आणि आजरा तालुक्यातील नांगरतासवाडी ही डोळ्यात अंजन घालणारी उदाहरणे आहेत. पूर्वी इंडाल नावाच्या कंपनीने या ठिकाणी बॉक्साईट खुदाई केलेली आहे. सध्या अभयारण्यातील हा भाग जणू काही उजाड आणि वैराण बनलेला आहे. बॉक्साईट उत्खननासाठी खोदण्यात आलेले भलेमोठे खड्डे या ठिकाणी आ वासून उभे आहेत. या जंगल परिसरात अनेक ठिकाणी दगडांचे भलेमोठे ढीगच्या ढीग पडलेले आहेत. या परिसरातील नैसर्गिक डोंगर-टेकड्या भुईसपाट झालेल्या आहेत आणि हजारोंच्या संख्येने वृक्षसंपदा नष्ट झालेली आहे. बॉक्साईट खुदाईनंतर या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचे अजिबात पुनर्भरण करण्यात आलेले नाही.

नियमानुसार तोडलेल्या वृक्षांच्या पटीत वृक्षारोपण करण्यात आलेले नाही. खुदाईतून निघालेला निरुपयोगी मलबा डोंगर उतारावरून ढकलून देण्यात आल्यामुळे हजारो वृक्ष गाडले गेले आहेत, वनसंपदेचा सत्यानाश झालेला आहे. विशेष म्हणजे या भागातील वन्य पशुपक्ष्यांनी केव्हाच या भागातून पोबारा केला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात आढळून येणारे पशुपक्षी आता या भागात अगदी अभावानेच दिसून येतात. शिवाय, या भागातून वाहणार्‍या नैसर्गिक नदीनाल्यांचे प्रदूषण होत आहे ते वेगळेच. एवढा सगळा विनाश या भागातील बॉक्साईट खुदाईमुळे झालेला आहे. हिंडाल्कोच्या बॉक्साईट खुदाईमुळे राधानगरी अभयारण्यात भविष्यात अशाच स्वरूपाचा वनसंहार बघायला मिळाला तर आश्‍चर्य वाटायला नको.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेला इजा!

जमिनीतून बॉक्साईट मिळविण्यासाठी किमान दहा ते बारा फूट खोल खणावे लागते. राधानगरी अभयारण्य परिसर म्हणजे सह्याद्रीचाच घाटमाथा आहे. सह्याद्रीच्या या घाटमाथ्याला या बॉक्साईट खुदाईमुळे इजा पोहोचू लागलेली आहे. जागतिक आणि स्थानिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही बाब न परवडणारी आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून आता या बॉक्साईट खुदाईला विरोध होऊ लागला आहे.