Thu, Jul 18, 2019 13:02होमपेज › Kolhapur › ‘राधानगरी’त विधानसभेलाही ‘बिद्री पॅटर्न’ !

‘राधानगरी’त विधानसभेलाही ‘बिद्री पॅटर्न’ !

Published On: Mar 12 2018 1:30AM | Last Updated: Mar 11 2018 9:52PMकोल्हापूर : रणधीर पाटील

विधानसभा निवडणुकीतही राधानगरी-भुदरगड मतदारसंघामध्ये ‘बिद्री पॅटर्न’ अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मेहुण्या-पाहुण्यांमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी पाहता विधानसभेच्या तोंडावर तिकीट वाटपावरून राष्ट्रवादीत फूट अटळ मानली जात आहे. त्यातून माजी आमदार के. पी. पाटील किंवा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या दोघांपैकी एकजण भाजपच्या गळाला लागण्याची चिन्हे आहेत. 

सद्यस्थितीला ‘राधानगरी-भुदरगड’मधून भाजपकडे एकही तगडा दावेदार नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा घरचा मतदारसंघ आणि त्यांना शिवसेनेचे आ. प्रकाश आबीटकर यांनी बिद्री साखर कारखाना निवडणुकीवेळी दिलेले खुले आव्हान या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 

पालकमंत्री पाटील-के.पी. यांच्यात मैत्रीपर्व

‘बिद्री’ निवडणुकीमध्ये आ. प्रकाश आबीटकर, दिनकरराव जाधव, प्रा. संजय मंडलिक यांनी कडवे आव्हान निर्माण केले असताना पालकमंत्री पाटील यांनी, ऐनवेळी राष्ट्रावादीशी समझोता करत ‘बिद्री’च्या सत्तेचे पारडे के. पी. पाटील यांच्या बाजूने फिरवले. राष्ट्रवादीने भाजपबरोबर युती केल्यानेच विरोधकांचा ‘बिद्री’वरील सत्तेचा डाव फसला. विधानसभा निवडणुकीतील पराभवाने मरगळ आलेल्या के. पी. पाटील गटालाही ‘बिद्री’च्या विजयाने उभारी मिळाली. तेव्हापासून के. पी. पाटील आणि पालकमंत्री पाटील यांच्यात मैत्रीचे पर्व सुरू झाले. ही मैत्री विधानसभा निवडणूकीतही दिसली तर आश्‍चर्य वाटू नये. 

के.पी.-ए.वाय. यांच्यात वाढला दुरावा 

एकीकडे पालकमंत्री व के. पी. पाटील यांच्यात राजकीय जवळीकता निर्माण होत असताना, दुसरीकडे के.पी. व ए.वाय. या मेहुण्या-पावण्यांमधील मतभेदाची दरी मात्र रुंदावत चालली होती, हा निव्वळ राजकीय योगायोग असण्याची शक्यता मुळीच नाही.  ‘भोगावती’ निवडणुकीतील जागा वाटप हे जरी त्यांच्या दुराव्याचे प्रमुख कारण असले, तरी ए. वाय. पाटील यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेली नाही. ए.वाय.पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, असा त्यांच्या गटाचा आग्राह आहे. आता तर ए.वाय.पाटील गटाने विधानसभा निवडणूकीसाठी बैठकाही सुरू केल्या आहेत. त्यामुळे यावेळी ए.वाय.पाटील विधानसभा निवडणूकीतून माघार घेण्याची शक्यता धूसर आहे. 

आ. प्रकाश आबीटकर यांचे पालकमंत्री पाटील यांना खुले आव्हान

‘बिद्री’ निवडणुकीसाठी आ. आबीटकर यांनी के. पी. पाटील यांच्याविरोधात दोन वर्षे रान तापविले होते. वाढीव सभासदांचा मुद्दा तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. के.पी. विरोधकांची मोट बांधण्यात आ. आबीटकर यशस्वी झाले होते; पण ऐनवेळी भाजपने राष्ट्रवादीशी युती केल्याने विरोधकांच्या मनसुब्यांना पहिला धक्‍का बसला होता. प्रचारादरम्यान शिवसेनेचे आ. प्रकाश आबीटकर व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. पालकमंत्र्यांनी आबीटकर यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ही निर्माण केले होते. तर आ. आबीटकर यांनी पालकमंत्री पाटील यांना ‘राधानगरी-भुदरगड’मधून लढण्याचे खुले आव्हान दिले होते. 

भांडण राष्ट्रवादीत, फायदा भाजपला?

सध्या राष्ट्रवादीत खा. धनंजय महाडिक-आ. हसन मुश्रीफ आणि के. पी. पाटील-ए. वाय. पाटील यांच्यात सुरू असलेले संघर्ष विकोपाला गेले आहेत. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या दोघांमध्ये कोण माघार घेईल, याची पुसटशीही शक्यता नाही. या संघर्षात जे नेते राष्ट्रवादीपासून फारकत घेतील, ते जिल्हा परिषदेपासून लोकसभेपर्यंत सत्तेवर असलेल्या भाजपचाच पर्याय निवडतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.  राष्ट्रवादीतील भाजपने अगोदरच खा. महाडिक यांना पक्षात येण्याचे जाहीर आवाहन केले आहे. आता के.पी. व ए.वाय. यांच्यापैकी  एकाने जर भाजपचा पर्याय स्विकारला तर नुकसान राष्ट्रवादीचे आणि फायदा भाजपला होणार, हे स्पष्ट आहे... 

भाजपकडून तगड्या उमेदवाराचा शोध

पालकमंत्र्यांनी आ. आबीटकर यांच्या आव्हानाला थेट उत्तर न देता सूचक  मौन पाळले; पण त्याचवेळी ‘राधानगरी-भुदरगड’मधून आबीटकरांविरोधात विधानसभेसाठी जुळवाजुळव सुरू केली. त्याचाच पहिला टप्पा म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. देसाई विधानसभेसाठी इच्छुक असले, तरी पालकमंत्री पाटील यांनी आतापर्यंत तरी देसाई यांच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. आ. आबीटकर यांचा पराभव करण्यासाठी तगडा उमेदवार देण्यावर पालकमंत्री पाटील यांचा भर असणार आहे.