Mon, Apr 22, 2019 02:34होमपेज › Kolhapur › राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडतात तरी कसे?

राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडतात तरी कसे?

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 22 2018 11:04PMकौलव : राजेंद्र दा. पाटील

यावर्षीच्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण गेल्या पाच वर्षांपेक्षा लवकर भरले असून सात स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा सर्वांच्या उत्सुकता आणि जिज्ञासेचे केंद्रबिंदू बनले आहेत. अतिरिक्त पाण्याच्या विसर्गासाठी स्वयंचलित दरवाजे असणारे राधानगरी हे देशातील एकमेव धरण आहे. हे दरवाजे म्हणजे शाहू राजांच्या दूरदृष्टीचे आणि जुन्या स्थापत्य अभियांत्रिकी धोरणाचे प्रतीकच आहे. 
राजर्षी शाहू महाराजांनी कृषी सिंचन व्यवस्थेला प्राधान्य दिले होते. कोल्हापूर संस्थानात 1896 साली पडलेल्या दुष्काळामुळे शाहू राजांनी युरोपचा दौरा करून कोल्हापूरचे स्वतंत्र सिंचन धोरण राबवले होते. या धोरणांतर्गत सिंचनासाठी 1908-09 साली राधानगरी धरणाची पायाभरणी केली होती. या धरणाचा स्थापत्य आराखडा जगप्रसिद्ध स्थापत्य अभियंता सर एम. विश्‍वेश्‍वरय्या यांनी तयार केला होता. मात्र, पैशाची कमतरता, शाहू राजांचे निधन आणि दोन महायुद्धे यामुळे धरण पूर्ण होण्यास स्वातंत्र्योत्तर काळ उजाडला. 1949 साली धरणात सर्वप्रथम 0.600 टी. एम. सी. पाणीसाठा करण्यात आला. 1952 साली धरणाच्या पायथ्याला राज्यातील पहिले व देशातील दुसरे जलविद्युत निर्मिती केंद्र उभारल्यानंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यास सुरुवात करण्यात आली.

धरणाच्या भिंतीतून एकूण पाच दरवाजे आहेत. त्यापैकी खासगी वीजकेंद्राला एक व दोन क्रमांकाच्या दरवाजातून पाणी दिले आहे. त्यातून प्रत्येकी 800 क्युसेस प्रमाणे प्रतिसेकंद 1600 क्युसेस पाण्याचा विसर्ग होतो. तर जुन्या वीजगृहाला चार दरवाजांतून प्रत्येकी 400 क्युसेस प्रमाणे 1600 क्युसेस पाण्याचा विसर्ग होतो. मात्र, सध्या हे वीज केंद्र व विसर्गही बंदच आहे. या विसर्गाव्यतिकरिक्त धरण भरल्यानंतर जादा होणारे पाणी बाहेर काढण्यासाठी धरणाच्या उत्तरेकडे सात स्वयंचलित दरवाजांची व्यवस्था केली आहे. यातील प्रत्येक दरवाजातून 1428 प्रमाणे सात दरवाजातून प्रतिसेकंद 9996 क्युसेस पाण्याचा विसर्ग होतो. त्यामुळे आणीबाणीच्या काळात धरणातून एकाचवेळी प्रतिसेकंद 36400 क्युसेस पाण्याचा विसर्ग करता येईल. अशी व्यवस्था केलेली आहे.

अशा प्रकारच्या स्वयंचलित दरवाजांची व्यवस्था देशातील कोणत्याच धरणाला नाही. त्यामुळे हे धरण संपूर्ण देशातील सिंचन प्रकल्पातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक दरवाजाचा आकार 14.48 बाय 1.48 मीटर एवढा आहे. या दरवाजांसाठी कोणत्याही प्रकारची यांत्रिक ऊर्जा वापरावी लागत नाही ही बाब वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक दरवाजाच्या आतील भागात प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंटचे मजबुत ब्लॉक्स बसवलेले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा दाब लोखंडी दरवाजांवर पडताच हे ब्लॉक्स वर उचलले जातात व पाणी बाहेर फेकले जाते. ब्लॉकवरती दाब 35 टनापेक्षा खाली आला असता दरवाजे पुन्हा पूर्ववत बसतात व विसर्ग थांबतो.

या दरवाजांना 66 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, त्या काळात अत्युत्तम दर्जाचे साहित्य वापरल्याने दरवाजे आजही सुस्थितीत आहेत. दरवर्षी केवळ ग्रीसिंग व ओव्हर ऑईलिंग केले जाते. एखादे प्रसंगी सिमेंट ब्लॉकची झिज झाली तर स्थानिक पातळीवरच डागडुजी केली जाते. दरवाजे जुन्या काळातील असूनही येथील कर्मचार्‍यांनी त्यांची डागडुजी चांगल्या पद्धतीने केली आहे. इतक्या वर्षांनंतरही हे दरवाजे सुस्थितीत व सक्षम आहेत. देशातील एकमेव स्वयंचलित दरवाजे असल्याने नव्या युगातील स्थापत्य अभियांत्रिकीलाही हे दरवाजे आव्हान व अभ्यासाचा विषय ठरणार आहेत.