Thu, Jun 27, 2019 12:20होमपेज › Kolhapur › सोनू कुमारकडून नरसिंग चितपट

सोनू कुमारकडून नरसिंग चितपट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

रणहालगी, घुमके-कैचाळाचा पारंपरिक बाज, लाल मातीच्या आखाड्यात सुरू असणार्‍या तुल्यबळ लढती आणि शेकडो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या कुस्ती मैदानात पंजाब केसरी पै. सोनू कुमार याने ऑलिम्पिकवीर नरसिंग यादव याच्यावर एकलंगी गदालोट या डावावर मात करून त्यास अस्मान दाखविले. सुमारे पंधरा मिनिटे रंगलेल्या कुस्तीत सोनू कुमारने चटकदार कुस्ती करून शौकिनांची मने जिंकली. पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीगिरांनी मात्र रटाळ खेळ करत कुस्तीशौकिनांची निराशा केली. 

लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या 83 व्या जयंतीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रविवारी राजर्षी शाहू खासबाग मैदानात झाले. सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, अ‍ॅग्रीकल्चर, एज्युकेशनल अँड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशनतर्फे आणि कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ व कोल्हापूर महानगरपालिकेच्या  सहकार्याने मैदानाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातून कुस्ती शौकिनांनी मैदानात हजेरी लावली होती. स्पर्धेचे उद्घाटन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते झाले. मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. वीरेंद्र संजय मंडलिक यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले. 

दुपारी दोन वाजल्यापासून लहान-मोठ्या गटातील सुमारे 250 कुस्त्या झाल्या. सायंकाळी पाचनंतर मुख्य कुस्त्यांना प्रारंभ झाला. पहिल्या व दुसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीचा प्रारंभ आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, प्रा. संजय मंडलिक, वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, शाहू महाराज व दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कुस्तीनंतर मानाचा फेटा, गदा व किताब देऊन मल्लांचा सन्मान मान्यवरांनी केला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

द्वितीय क्रमांकाची कुस्ती पंजाब केसरी पै. सोनू कुमार याने  ऑलिम्पिकवीर नरसिंग यादव  यांच्यात झाली. या कुस्तीत नरसिंग यादव याने प्रथमपासूनच मच्छीगोता पुट्टीपट काढून सोनू कुमारवर कब्जा करण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याचवेळी नरसिंग यादवने एकलंगी डाव घालण्याचा प्रयत्न करीत सोनू कुमारला जखडून ठेवले. 22 मिनिटांच्या झटापटीत यादव याने सोनू कुमारवर चांगली पकड ठेवली. मात्र, सोनू कुमार याने एकलंगी गदालोट डावावर यादव यास चितपट करून अस्मान दाखविले.

प्रथम क्रमांकाची रटाळ कुस्ती खेळणार्‍या मल्लांना आखाड्याबाहेर काढले

प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी पंजाब केसरी प्रदीप चिक्‍का आणि हिंदकेसरी सुमित मलिक या मल्लांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. या कुस्तीकडे तमाम कुस्ती शौकिनांच्या नजरा लागल्या होत्या. 
मात्र, या मल्‍लांनी रटाळ खेळाचे दर्शन घडविल्याने कुस्ती शौकिनांची प्रचंड निराशा झाली. सुमारे एक तास रटाळ खडाखडी सुरू असल्याने अखेर ही कुस्ती बरोबरीत सोडवून दोन्ही मल्‍लांना आखाड्याबाहेर काढण्यात आले.