Tue, May 21, 2019 12:09होमपेज › Kolhapur › महिलांसाठी आजची सायंकाळ ठरणार संस्मरणीय

महिलांसाठी आजची सायंकाळ ठरणार संस्मरणीय

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महिला, युवतींसाठी शुक्रवारची सायंकाळ संस्मरणीय आणि तितकीच प्रेरणादायी ठरणार आहे. प्रसिद्ध  डबिंग आर्टिस्ट, अभिनेत्री मेघना एरंडे संवाद साधणार आहेत. भारत सरकारच्या पोलिस संशोधन व विकास संस्थेच्या अध्यक्षा मीरा बोरवणकर यांची मुलाखत होणार आहे. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवारी (दि. 10) राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा चित्रा वाघ मुलाखत घेणार आहेत. केवळ महिलांसाठी हॉटेल सयाजीच्या ‘मेघ मल्हार’ हॉलमध्ये आयोजित हा कार्यक्रम मोफत आहे. 

युवती, महिलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, त्यातून सक्षम आणि कर्तृत्ववान महिला निर्माण व्हावी, या उद्देशाने दैनिक ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्या वतीने महिला दिनानिमित्त शुक्रवार, दि. 9 व शनिवार, दि. 10 रोजी कर्तृत्ववान महिलांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

मेघना एरंडे साधणार मनमोकळा संवाद
आपल्या आवाजाने आपली ओळख निर्माण केलेल्या प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट, अभिनेत्री मेघना एरंडे उपस्थितांशी शुक्रवारी सांयकाळी 5 वाजता संवाद साधणार आहेत. माहितीपट, कार्टून आदीतील पात्रांना आवाजाने जिवंत करण्याची, आवाजाची ओळख देण्याची किमया त्यांनी साधली आहे. हा रोमांचकारी प्रवास त्या सादर करणार आहेत.

बोरवणकर यांच्या पुस्तकाचे डॉ. जाधव यांच्या हस्ते होणार प्रकाशन
मीरा बोरवणकर यांनी आपल्या आजवरच्या अनुभवावर ‘माझ्या आयुष्याची पानं’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. 

मुलाखतीतून उलगडणार बोरवणकरांचे जीवनचरित्र
भारत सरकारच्या पोलिस संशोधन व विकास संस्थेच्या अध्यक्षा म्हणून सध्या कार्यरत असलेल्या मीरा बोरवणकर यांची पोलिस दलात आजही वेगळी प्रतिमा आहे. महिला पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी केवळ प्रेरणा दिली नाही, तर कृतिशील आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा प्रवास मुलाखतीतून उलगडणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील त्यांची मुलाखत घेणार आहेत. पुस्तक प्रकाशनानंतर मुलाखत होणार आहे.

यावेळी झी युवा वाहिनीवरील ऋता दुर्गुळे, पूजा पवार, श्रुती अत्रे आणि पल्लवी पाटील या कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. 

आ. प्रणिती शिंदे, चित्रा वाघ घेणार ना. पकंजा मुंडे यांची मुलाखत
 राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची शनिवारी दि. 10 रोजी सकाळी 10.30 वाजता मुलाखत होणार आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा सौ. चित्रा वाघ या त्यांची मुलाखत घेणार आहेत.   पंकजा मुंडे यांचा राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक प्रवास या मुलाखतीतून उलगडणार आहे. या कार्यक्रमानंतर झी युवा दूरचित्रवाहिनीवरील सुरूची अडारकर व अश्‍विनी कासार या कलाकारांचाही कार्यक्रम होणार आहे.

महिलांसाठी खास आयोजित या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक झी युवा चॅनेल आहे. सहयोगी प्रायोजक म्हणून ‘तनिष्क टाटाची पेशकश’, हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून हॉटेल सयाजी, तर रेडिओ पार्टनर म्हणून टोमॅटो एफ.एम. 94.3 आहेत.