होमपेज › Kolhapur › कर्तृत्ववान महिलांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडणार

कर्तृत्ववान महिलांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडणार

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 08 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या भारत सरकारच्या पोलिस संशोधन व विकास संस्थेच्या अध्यक्षा, मीरा बोरवणकर, राज्याच्या ग्राम आणि महिला विकासमंत्री पंकजा मुंडे आणि प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे यांचा जीवनपट उलगडणार आहे. दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुक्रवार, दि. 9 व शनिवार, दि. 10 रोजी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ महिलांसाठी होणार्‍या या कार्यक्रमासाठी मोफत पास उपलब्ध करण्यात आले आहेत.

कस्तुरी क्लबच्या वतीने जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने आणि तितकाच संस्मरणीय रीतीने साजरा केला जाणार आहे. कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समाजासमोर मांडले जाणार आहेत. आपल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या या महिलांच्या यशाची गाथा, त्यांच्या मुलाखतीतून अनुभवण्याची संधी या निमित्ताने महिलांना मिळणार आहे. केवळ प्रोत्साहनच नव्हे, तर कोणत्याही क्षेत्रात सक्षमपणे उभे राहण्यासाठी सदैव मार्गदर्शक ठरणार्‍या अशा या व्यक्तिमत्त्वांचा जीवनपटच या निमित्ताने उलगडणार आहे. महिला म्हणून येणार्‍या अडचणी, त्यावर महिला म्हणूनच धाडसाने केलेली मात, त्यातून आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्याद्वारे खंबीर आणि तितकाच समृद्ध झालेला जीवनप्रवास या व्यक्तिमत्त्वांच्याच शब्दांत ऐकता येणार आहे.

मेघना एरंडे यांच्याशी संवाद
आपला ‘आवाज’सुद्धा यशस्वी जीवनाचा कणा ठरू शकतो, हे दाखवून देणार्‍या मेघना एरंडेंचाही रोमांचकारी प्रवास आहे. माहितीपट, अ‍ॅनिमेशन, कार्टून आदींसाठी वेेगवेगळे आवाज देत, त्या आवाजाद्वारे त्यांनी चक्क पात्रांना वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. आवाजाच्या जोरावरच एक-दोन वर्षांच्या चिमुरड्यांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत अनेकांच्या गळ्यांतील त्या ताईतच बनल्या आहेत. प्रचंड मेहनत, चिकाटी, अभ्यास याच्या जोरावर मिळालेल्या या यशाबाबत त्या शुक्रवार, दि. 9 रोजी सायं. 5 वा. मनमोकळा संवाद साधणार आहेत.

बोरवणकर यांच्या पुस्तकाचे डॉ. जाधव यांच्या हस्ते होणार प्रकाशन
आयपीएस अधिकारी म्हणून कोल्हापुरातून कारकिर्दीला सुरुवात केलल्या बोरवणकर यांनी अप्पर पोलिस अधीक्षक ते पोलिस महासंचालक अशा अनेक पदांवर काम केले. या कालावधीत, त्यांना आलेले अनुभव मोठे आहेत. या अनुभवावर आधारित ‘माझ्या आयुष्याची पानं’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचेही या कार्यक्रमाचे औचित्य साधत प्रकाशन होणार आहे. दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा होणार आहे. 

बोरवणकर : कर्तव्यदक्ष शिस्तबद्ध अधिकारी
महाराष्ट्र पोलिस दलात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळा ठसा निर्माण करणार्‍या, शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या मीरा बोरवणकर यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील मुलाखत घेणार आहेत. शुक्रवार,  दि. 9 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता हॉटेल सयाजीच्या ‘मेघ मल्हार’ सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. 
याचवेळी अभिनयाबरोबर लहानांपासून थोरामोठ्यापर्यंत आपल्या ‘आवाजा’ची ओळख निर्माण करणार्‍या मेघना एरंडेंचाही जीवनपट उपस्थितांसमोर मांडला जाणार आहे. 

पंकजा मुंडे यांचा जीवनपट उलगडणार मुलाखतीतून
राजकीय क्षेत्रात दमदारपणे वाटचाल करणार्‍या, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची शनिवार, दि. 10 रोजी सकाळी 10.30 वाजता मुलाखत होणार आहे.  माजी उपमुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रदेश महिला अध्यक्षा सौ. चित्रा वाघ आणि प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे त्यांची मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीतून ते पंकजा मुंडे यांचा राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक प्रवास प्रश्‍नोत्तराद्वारे उलगडला जाणार आहे. हा कार्यक्रमही हॉटेल सयाजीच्या ‘मेघ मल्हार’मध्येच होणार आहे.

वेगळी अनुभूती देणार्‍या मुलाखती
संसार आणि काम याची सांगड घालत, सामाजिक भान जपत, पोलिस, मनोरंजन आणि राजकारण अशा क्षेत्रांत, महिला असूनही केवळ कामगिरीच्या जोरावर दिग्गज ठरलेल्या या महिलांचे अनुभव सर्वांसाठीच वेगळी अनुभूती देणारे ठरणार आहेत. 

महिलांना मोफत पास
महिलांसाठी खास आयोजित या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक झी युवा चॅनेल आहे. सहयोगी प्रायोजक म्हणून ‘तनिष्क टाटाची पेशकश’, हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून हॉटेल सयाजी, तर रेडिओ पार्टनर म्हणून टोमॅटो एफ.एम.94.3 आहेत. या कार्यक्रमाला अधिकाधिक महिलांना उपस्थित राहता यावे, याकरिता मोफत पास देण्यात येणार आहेत. हे पास दैनिक ‘पुढारी’च्या भाऊसिंगजी रोडवरील मुख्य कार्यालयात तसेच टोमॅटो एफ.एम.94.3 च्या बागल चौक येथील कार्यालयात उपलब्ध होणार आहे. या संधीचा महिलांनी फायदा घ्यावा, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’, टोमॅटो एफ. एम. व कस्तुरी क्लब यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात ‘झी युवा’ च्या ऋता दुर्गुळे, पूजा पवार, श्रुती अत्रे, पल्लवी पाटील या कलाकार शुक्रवारी, तर सुरुची अडारकर व  अश्‍विनी कासार शनिवारी सहभागी होणार आहेत.