Thu, Jul 18, 2019 21:22होमपेज › Kolhapur › जनतेच्या जिव्हाळ्याचा आनंद सोहळा

जनतेच्या जिव्हाळ्याचा आनंद सोहळा

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:17PMकोल्हापूर : प्रतिनिधी

झांज पथकाचा दणदणाट, धनगरी ढोलांचा गगनभेदी नाद, अधूनमधून होणारा तुतारीचा निनाद, शाहिरांची डफावरील थाप आणि त्यांच्या खड्या आवाजात गायिलेले पोवाडे, या जोडीला अधूनमधून बरसणार्‍या पावसाच्या हलक्या सरी अशा वातावरणात तुडुंब भरलेले सभागृह, असे चित्र शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृहाने अनुभवले. निमित्त होते उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाचे. जनतेच्या जिव्हाळ्याचा आनंद सोहळा असेच स्वरूप या कार्यक्रमाला प्राप्‍त झाले. 

महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिक्‍कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यापार, कृषी, सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्वच स्तरांतील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. 

कार्यक्रमाची वेळ सकाळी साडेदहाची; पण नऊ वाजल्यापासून लोकांची पावले केशवराव भोसले नाट्यगृहाकडे वळत होती. पावसाच्या अधूनमधून बरसणार्‍या पाऊस धारा झेलत लोक सभागृहात येत होते. सभागृहाबाहेर प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी येवती (ता. करवीर) येथील श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या झांज पथकाचा दणदणाट, तर त्याच्या जोडीला धनगरी ढोलांचा टिपेला पोहोचलेला कडकडाट सुरू होता. 

प्रत्यक्ष कार्यक्रमाला साडेअकरा वाजता सुरुवात झाली. तोपर्यंत सभागृह तर खचाखच भरले होते; पण सभागृहाबाहेरील मंडपातही तुडुंब गर्दी झाली होती. मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीरविशारद आझाद नायकवडी व त्यांच्या सहकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील पोवाडे सादर केले. पोवाड्यांची सुरुवात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताने झाली. त्यांना शाहीर पापालाल नायकवडी, अरुण शिंदे, युवराज पुजारी, शिवाजी लांडगे, बालशाहीर स्वराज नायकवडी, ढोलकीवादक अजित पाटील, हार्मोनियमवादक ओंकार सुतार यांनी साथ दिली.  

मुख्य प्रवेशद्वारावर येणार्‍यांच्या स्वागताला होणारा तुतारीचा निनाद वातावरणातील उत्साह दाखवून देत होता. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणावेळी व्यासपीठावर पगडी व बाराबंदी अशा ऐतिहासिक वेशातील कलाकारांकडून निनादणार्‍या तुतारीने वातावरणात एक वेगळाच रंग भरला. किणी (ता. हातकणंगले) चे नारायण शिवाजी गुरव, फुलेवाडीचे श्रीकांत बाळासोा चौगले, उचगाव (ता. करवीर) चे महेश सुबराव यादव व निखिल महेश यादव यांनी तुतारीचा निनाद केला. 

सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाला सर्वच स्तरांतील आबालवृद्धांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना कोल्हापुरी फेटे बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम आयोजनापासून ते पूर्ण करण्यापर्यंत महापौरांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीने अतिशय चांगले काम केले. 

 शुभेच्छांचा वर्षाव

समारंभानंतर डॉ. योगेश जाधव यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच मोठी गर्दी केली होती. यावेळी डॉ. जाधव यांच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या. पुष्पगुच्छ, पुस्तकरूपी भेटींनी 
डॉ. जाधव भारावून गेले. 

कार्यक्रमानंतर शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी व्यासपीठावर एकच गर्दी केली. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, पुणे येथील डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुषमा देसाई, विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयकुमार साळोखे, उद्योगपती व्ही. बी. पाटील, इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, हुपरीच्या सौ. अलका गाठ, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरे, बाळ पाटणकर, डॉ. सूरज पवार, डॉ. सौ. रेश्मा पवार, बाबासाहेब पाटील-भुयेकर, माजी आमदार सुरेश साळोखे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील, माजी जि.प. सदस्य बापू कोंडेकर, चाटे शिक्षण समूहाचे प्रा. भारत खराटे, महाराष्ट्र कन्झ्युमर प्रॉडक्टस् डिस्ट्रिब्युटर फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, विजय नारायणपुरे, दीपक शहा, मंगेश लिंग्रस, प्रमोद पाटील, नंदू मराठे, टी.एस. कांबळे, बापू साहेब कांबळे, भरत लठ्टे, अमेय जाधव, गणेश वाईंगडे, रफिक मुल्‍ला, मुबारक शेख, राजेंद्र पिंपळगांवकर,  मनसेचे प्रसाद पाटील, राजू जाधव, तसेच नागरी सत्कार समितीचे सहनिमंत्रक आर.के.पोवार, बाबा पार्टे,राजू लाटकर, सचिन चव्हाण,आदील फरास, प्रसाद पाटील,त   संदीप देसाई,  उत्तम कांबळे, गणी आजरेकर, रघुनाथ कांबळे, किशोर घाटगे,चंद्रकांत यादव, अनिल कदम, बाबा महाडीक,अशोक भंडारे, विजय वणकुद्रे, प्रा.विश्‍वास देशमुख, लालासाहेब गायकवाड, चंद्रकांत बराले, बबन रानगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर,  राजू लिंग्रस, पारस ओसवाल, अशोक पोवार, राजू साळोखे,त   दादू चौगुले, दिनानाथ सिंग, विनायक फाळके, अविनाश भिडे, बहुजन परिवर्तन संघटनेचे बाजीराव नाईक, विक्रम जरग, अरूण चोपदार, अर्जून नलवडे, मिलींद अष्टेकर  जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत, नगरपंचायत,पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांचा यात सहभाग मोठा होता. शहरातील तरूण मंडळे, तालीम संस्थांचे पदाधिकारी व सदस्य यांचा समावेश होता.   

पावसातही कार्यक्रमाला गर्दी

गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर व परिसरात धुवाँधार पाऊस सुरू आहे. आज सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली; पण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुन्हा धो धो पाऊस सुरू झाला. अशा पावसातही लोकांचे लोंढेच्या लोंढे कार्यक्रमस्थळी येत होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पावसाची संततधार कायम होती.

मोठा पोलिस बंदोबस्त 

कार्यक्रमासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून वाहतूक व पार्किंगचे चांगले नियोजन करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमानंतरही या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली नाही.