Tue, Apr 23, 2019 23:37होमपेज › Kolhapur › विकासाला चालना देण्यासाठी वचनबद्ध : डॉ. योगेश जाधव(व्हिडिओ)

विकासाला चालना देण्यासाठी वचनबद्ध : डॉ. योगेश जाधव(व्हिडिओ)

Published On: Jul 16 2018 2:41PM | Last Updated: Jul 16 2018 2:41PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचा कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सिक्कीमचे राज्यपाल डॉ.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शानदार नागरी सत्काराला उत्तर देताना डॉ. योगेश जाधव यांनी, विकासाला चालना देण्यासाठी वचनबद्ध राहू, अशी ग्वाही दिली. अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. 

केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला शाहू महाराज, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील यांच्यासह खा. धनंजय महाडिक, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, आ. सत्यजित पाटील, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. प्रकाश आबिटकर, आ. उल्हास पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उर्वरित महाराष्ट्राच्या विकासकामांना चालना देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष व दै.‘पुढारी’चे  व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. डॉ. योगेश जाधव यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना डॉ. जाधव बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर जी जबाबदारी सोपविली आहे, ती आपण समर्थपणे पार पाडू, असेही ते म्हणाले.

सर्व महापुरुषांना वंदन करून  बोलताना डॉ. जाधव म्हणाले की, या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत. आपल्याला हा सन्मान मिळवून देणार्‍या कोल्हापूरच्या जनतेचाच हा सन्मान आहे. या सन्मानाबरोबरच हे आव्हान आहे, संधी आहे आणि जबाबदारीही आहे. 17 जिल्ह्यांत विकास कामांसाठीचे नियोजन आपल्याला करावे लागणार आहे. त्यासाठी जनतेची साथ खूप महत्त्वाची आहे.

व्यवस्थापकीय संपादक म्हणून  दै.‘पुढारी’ची जबाबदारी पार पाडताना आता ही नवी जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे. ‘पुढारी’ हे समाजाचे व्यासपीठ आहे व त्या नात्याने ‘पुढारी’ने समाजाची सेवा केली आहे. आपले आजोबा कै. ग. गो. जाधव व वडील  डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा समाजसेवेचा वारसा घेऊनच आपण वाटचाल करीत असल्याचेही डॉ. योगेश जाधव म्हणाले. 

व्यापक कार्यक्षेत्र

राजधानी मुंबईसह 17 जिल्हे व 161 तालुके कार्यक्षेत्र असणार्‍या या मंडळाच्या कार्यक्षेत्रात राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 63 टक्के लोकसंख्या येते व 50 टक्के भूभाग येतो. सहा महसुली विभागांपैकी पुणे, कोकण व नाशिक हे तीन महसुली विभाग या मंडळाच्या कार्यक्षेत्रात येतात. या विभागाचा जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास केला, तेव्हा ज्या प्रमाणात या भागातून कर सरकारच्या तिजोरीत जमा होतो, त्याच्या कितीतरी कमी प्रमाणात या भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत असल्याचे लक्षात आल्याचेही डॉ. जाधव म्हणाले. 

आपण जर तुलनात्मक अभ्यास केला, तर असे दिसून येते की, या मंडळाच्या कार्यक्षेत्रात आजही भरपूर समस्या आहेत. तसे म्हटले तर या उर्वरित महाराष्ट्रासाठी फार कमी निधी आलेला आहे. आपण एक संपादक या नात्याने अभ्यास करतो, त्यावेळी आपल्याला हे जाणवते, असेही ते म्हणाले.

उर्वरित महाराष्ट्रातही अनेक प्रश्‍न

उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता ठाणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांत आदिवासी विकासासाठी लक्ष दिले पाहिजे. तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत नदी प्रदूषण समस्येकडे गांभीर्याने पाहिले पहिजे. तर सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात जलसंधारण व नद्या प्रवाहित ठेवण्याची गरज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांत मच्छिमारी, पर्यटनास प्रोत्साहन देण्याची आवश्कता आहे. याचबरोबर स्वच्छता, कचरा निर्मूलन, स्त्रियांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा,  बालकांसाठी पोषण आहार आदी कामांची सर्वच भागात पूर्तता झाली पाहिजे. सर्व जिल्ह्यांतील युवकांना स्वयंरोजगार किंवा उत्तम नोकरीसाठी स्किल डेव्हलपमेंटची  गरज असल्याचे डॉ. योगेश जाधव म्हणाले. 

महसुलाच्या प्रमाणात निधी कमी

मुंबईसह उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्र केंद्राच्या व राज्याच्या तिजोरीत प्रचंड महसूल जमा करत आहे; पण त्याप्रमाणात आपल्याकडे या भागाच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले की, ज्यावेळी राज्यपालांनी या मंडळावर आपली नियुक्‍ती केली, त्यावेळी आपण राज्यपालांची भेट घेऊन भरघोस निधी मिळावा, अशी मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेसुद्धा निधीची मागणी केलेली आहे.

कोल्हापूरचा बाणा रोखठोकच

आपल्याला स्वतःला कोल्हापूरचा सार्थ अभिमान असल्याचे ठामपणे सांगून डॉ. जाधव म्हणाले की, कोल्हापूरच्या लाल मातीचा एक गुणधर्म आहे, तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे ‘भले तरी देऊ, कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी, हाणू काठी।’ हा कोल्हापुरी माणसाचा स्वभाव आहे. कोल्हापुरात सद‍्गुणांचा गौरव केला जातो. कोल्हापुरी माणूस चुकीचे काम करणार्‍याला त्याची योग्य जागा दाखवतो व चांगले काम करणार्‍याला खांद्यावर घेतो. कोल्हापूरचा बाणा रोखठोक आहे. कोल्हापूरच्या माणसाला कुणी ‘अरे’ म्हटले तर तो त्याला ‘का रे’ म्हणतो. कोल्हापुरात अनोखा संगम झालेला आहे. या ठिकाणी गुळाची गोडी आहे आणि मिरचीचा झटकाही आहे. कोल्हापूर प्रसिद्ध आहे ते कोल्हापूरची मिरची, कोल्हापूरचा गूळ, कोल्हापुरी पायताण आणि कोल्हापुरी फेटा यासाठी.

सर्व क्षेत्रात कोल्हापुरी ठसा

गडकरींनी ‘राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा’ असे जे म्हटले आहे, ते तंतोतंत कोल्हापूरसाठीच आहे. कोल्हापूर म्हणजे खर्‍या अर्थाने कलापूर आहे. प्राचीन काळी थेट रोमशी व्यापारी संबंध असणार्‍या कोल्हापूरने 21 व्या शतकातसुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहण्याची परंपरा जपलेली आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा यांच्या वास्तव्यामुळे कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून नावारूपास आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराबाई आणि राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने कोल्हापूर पुनित  झालेले आहे. संगीत कलेपासून ते चित्रपट कलेपर्यंत. फक्‍त पैलवानकी नव्हे, तर शास्त्रज्ञांपर्यंत मजल मारलेल्या कोल्हापूरने स्वतःचा ठसा जगात उमटवलेला आहे. ज्यात कोल्हापूरचा माणूस नाही, असे एकही क्षेत्र नाही. 

कोल्हापूरचेही प्रश्‍न प्रलंबित

स्वबळावर कोल्हापूर उभे असले तरी, याही कोल्हापूरचे काही प्रश्‍न आहेत. पंचगंगा नदीचे प्रदूषण असो, रंकाळा तलाव प्रदूषणमुक्‍त करणे असो, संध्यामठ व रंकाळा टॉवरचे गतवैभव जतन करणे असो, कोल्हापूरच्या खंडपीठाची मागणी असो, कोल्हापूर तीर्थक्षेत्राचा विकास असो की, शाहूमिलचा विषय असो, थेट पाईपलाईन योजना असो, शिरोळ तालुक्याचा कॅन्सरचा प्रश्‍न, असे कोल्हापूरचे विविध प्रश्‍न आहेत. यासंदर्भात आपण नुकतीच  कोल्हापूरच्या अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी भरीव योगदान दिलेलेच आहे. त्यांच्यासह कोल्हापुरातील तीन खासदार आणि सर्व आमदार यांना घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून डॉ. योगेश जाधव यांनी यापुढे सत्कार समारंभात न अडकता कार्यमग्‍न राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

या मंडळाच्या कामाचा भाग म्हणून सर्व्हे करण्यासाठी आपण सर्व जिल्ह्यांचा दौरा करून स्थानिक अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन विकासाचा सविस्तर आराखडा तयार करणार आहोत. हा अहवाल राज्यपालांना सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सामान्य नागरिकांच्या विकासाचे प्रश्‍न डोळ्यासमोर ठेवूनच कार्य करण्याची आपली तळमळ असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.