होमपेज › Kolhapur › डॉ. योगेश जाधव यांची अभ्यासपूर्ण मांडणी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

डॉ. योगेश जाधव यांची अभ्यासपूर्ण मांडणी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 15 2018 12:49AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

मी डॉ. योगेश जाधव यांचे भाषण अतिशय शांतपणे ऐकले आणि मी भाषण करण्यापूर्वी त्यांचे अभिनंदन करूनच मी भाषणाला आलो. अतिशय अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी केले आणि मला असे वाटते की, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सूचना करून डॉ. जाधव यांची जी या पदावर निवड केली, ती योग्य आहे, हे त्यांच्या भाषणावरून सिद्ध झाल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची

डॉ. योगेश जाधव यांची या पदावरील निवड योग्य ठरली आहे. अतिशय चांगले काम ते करतील. ज्या समस्या डॉ. जाधव यांनी मांडल्या, त्या सर्वांनी मिळून सोडवायच्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे की, अर्थसंकल्पात या महामंडळासाठी निधीची व्यवस्था झाली नाही, तरी त्यांच्या अखत्यारीत असलेला निधी या कामाला ते देणार आहेत. ज्या समस्या डॉ. जाधव यांनी मांडल्या, त्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री प्रचंड बळ देणार आहेत. ज्या समस्या मांडल्या, त्याचा प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. त्यात प्रामुख्याने नद्यांच्या प्रदूषणाला महत्त्व द्यावे लागेल. त्याचबरोबर रोजगार उपलब्ध होईल, त्यातही ग्रामीण रोजगाराबरोबरच शहरी रोजगार उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मी त्यांना आग्रहाने असे म्हणेन की, डॉ. जाधव हे उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष झाले, त्यातून त्यांची सगळ्यांशी उठबस वाढेल; पण त्याच्या आधी त्यांच्या मागे ‘पुढारी’चे मोठे पाठबळ आहे, ते वापरून कोल्हापुरात एखादा चांगला उद्योग कसा येईल, तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळेल, पेठापेठांत बेरोजगार तरुणांच्या हाताला काम कसे मिळेल, याचा विचार त्यांनी केला पाहिजे.

मोठा प्रकल्प गरजेचा

केंद्र सरकार आगामी काळात देशात काही मोठे प्रकल्प देणार आहे. त्याचा अभ्यास मी व डॉ. जाधव यांनी केला पाहिजे. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे असलेले वजन व त्यांचे पुत्र म्हणून कॅबिनेट दर्जाच्या या पदाचा उपयोग करून चांगला उद्योग कसा येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. पेट्रोलियम उद्योगांकडून देशात सहा ठिकाणी प्रकल्प दिले जाणार आहेत. गावागावांतील पालापोचाळ्यापासून इथेनॉल निर्मिती व हे इथेनॉल इंधन म्हणून वापर करता येईल, हे दोन्ही प्रश्‍न यातून सुटणार आहेत. अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती आहे. घरात सगळ्या प्रकारची संपन्‍नता असली की मुले शिकत नाहीत; पण डॉ. जाधव हे उत्तम विद्याविभूषित आहेत. स्वतःच्या कष्टाने आपण मोठे झाले पाहिजे, आपली म्हणून बुद्धिमता विकसित केली पाहिजे, असा प्रयत्न डॉ. जाधव यांनी सातत्याने केला. मग ते खेळातील प्रावीण्य असेल किंवा शिक्षणातील, अशा अभ्यासूवृत्तीने ते त्यांच्याकडील जबाबदारी पार पाडतील, असेही पाटील म्हणाले.

सरकारचे संपूर्ण सहकार्य

17 जिल्हे व 40 ‘क’ वर्ग नगरपालिका त्यांच्या कार्यक्षेत्रात येतात. त्याचा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा मी व्यक्‍त करतो. यासाठी त्यांना सगळ्या प्रकारचे सहकार्य हे महाराष्ट्र शासन देईल, मुख्यमंत्री देतील. थेट राज्यपालांना त्यांचे रिपोर्टिंग असल्याने, त्यांचेही त्यांना सहकार्य मिळेल, असा विश्‍वासही पाटील यांनी व्यक्‍त केला.