Tue, Jul 23, 2019 01:54होमपेज › Kolhapur › समतोल विकासासाठी शाहूंचा विचारच प्रेरणादायी : श्रीनिवास पाटील

समतोल विकासासाठी शाहूंचा विचारच प्रेरणादायी : श्रीनिवास पाटील

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 15 2018 1:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजर्षी शाहूंचा समतेचा वारसा घेऊन कोल्हापूरच्या संपन्‍न आणि समृद्ध भूमीतून समतोल विकास साधण्याचा विश्‍वास निर्माण करा, असे आवाहन सिक्‍कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचा कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शानदार नागरी सत्काराला उत्तर देताना डॉ. योगेश जाधव यांनी, विकासाला चालना देण्यासाठी वचनबद्ध राहू, अशी ग्वाही दिली. अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. 

केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला शाहू महाराज, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील यांच्यासह खा. धनंजय महाडिक, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, आ. सत्यजित पाटील, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. प्रकाश आबिटकर, आ. उल्हास पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या खुमासदार शैलीत भाषणाची सुरुवात करताना श्रीनिवास पाटील म्हणाले की, योगेश जाधव यांचा सत्कार हा एक योगायोगच आहे. प्रतापसिंह जाधव आणि माझे बंधू हे मित्र. त्यामुळे आमच्या नात्याला  वेगळी किनार आहे. एक बंधुप्रेम आहे. ज्या ठिकाणी हा सत्कार सोहळा होत आहे, त्याचे जुने नाव पॅलेस थिएटर. शेजारीच खासबाग मैदान ही नावेही खास आहेत. अशा ठिकाणी होणार्‍या सत्काराचे वेगळेच महत्त्व आहे.

उर्वरित महाराष्ट्र नव्हे तरपुरून उरणारे मंडळ

खरे तर या सर्व सोहळ्याला आणखी एक वेगळेपण आहे, ते म्हणजे हे मंडळ. 17 जिल्हे, 67 टक्के लोकसंख्या, मुंबई आणि उपनगर आणि उर्वरित हे नाव. खरे तर गावाकडे वाटण्या होतात, तेव्हा थोरला भाऊ शिकलेला नसतो. 

त्याच्या वाटणीला जमीन जाते. मधल्याकडे दागदागिने जातात आणि धाकट्याकडे गावची पाटीलकी जाते. पहिली दोन दिल्यानंतर राहिली ती पाटीलकी, हे म्हणजेच उर्वरित. त्यामुळे चंद्रकांतदादा आता या मंडळाचे नाव बदला आणि उर्वरित मंडळ असे न म्हणता पुरून उरणारे मंडळ, असे याला म्हणा. अशा मंडळाचे अध्यक्षपद ज्यांना देण्यात आले, ते योगेश जाधव यांची वाटचाल वार्ताहर ते संपादक अशी आहे. त्यात ते पीएच.डी.ही आहेत. त्यामुळे लोकांच्या गरजा ते अभ्यास करून पूर्ण करतील, अशी आपल्याला खात्री आहे.

‘पुढारी’चे आमचे जुने ऋणानुबंध

ते म्हणाले, आम्ही ग. गो. जाधव यांची आतुरतेने वाट पहात असायचो. कारण ते आले की, काहीतरी आम्हाला बातमी कळायची. कारण त्या काळात आतासारखे फोन नव्हते. पोस्टातून फोन लावायचे. तो कधी तरी तासाने लागायचा. त्यातही पीपी कॉल असायचा, म्हणजे पर्टिक्युलर पर्सन अशी सोय असायची. अशा परिस्थितीत आमची आणि ‘पुढारी’ची नाळ जोडली, ती आजही कायम आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे झेप

‘पुढारी’ म्हणजे लीडर; पण ‘पुढारी’ म्हणजे पुढं आणि आरी. आरी म्हणजे सूत्र आणि त्या आरीला आडवं करी तो संपादक. आज तंत्र बदललं. प्रतापसिंह जाधव यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे झेप घेतली आहे, असे ते म्हणाले.

लोकांची नाडी ओळखा

पत्रकार आणि डॉक्टरेट असलेले योगेश जाधव तज्ज्ञ आहेत. ते दक्ष राहून आपला कारभार करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

समतेचा विचार पुढे न्या

मुले शिकली पाहिजेत, तर त्यांच्या जेवणाची सोय असली पाहिजे. यातूनच कोल्हापुरात बोर्डिंगची रचना झाली. ही बोर्डिंग वेगवेगळ्या जातीची असली, तरी त्यातून समाजाला एकत्र आणण्याचे काम राजर्षी शाहूंनी केले. याच भूमीतून 1902 साली आरक्षण लागू करून समतेचा विचार दिला गेला. आताच येथे जो पोवाडा सादर केला, त्यातून हा विचार मांडला गेला. तोच समतेचा विचार घेऊन योगेश जाधव तुम्हाला पुढे जायचे आहे. कोणाकडे काय आहे आणि कोणाकडे काय नाही, याचा अभ्यास करून लोकांचा विश्‍वास निर्माण करून वाटचाल करा, असा वडीलकीचा सल्‍लाही त्यांनी दिला. कोल्हापूरच्या संपन्‍नतेचा वारसा तुमच्या मागे आहे, असेही ते म्हणाले.

अभ्यास आणि मांडणी योग्यच

संपादक म्हणून अभ्यास करताना जे म्हणणे तुम्ही मांडले, तेच आमचेही म्हणणे असल्याचे सांगताना श्रीनिवास पाटील म्हणाले की, एकटी मुंबई देशाच्या खजिन्यात चाळीस टक्के भार घालते, मग आमच्या वाट्याला कमी पैसे का, हे तुमचे मागणे हे सगळ्यांचेच आहे. आज या सर्व 17 जिल्ह्यांच्या विकासासाठी तुम्हाला निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार नाही.

जनतेचा विश्‍वास मिळवा

हे सगळे करताना तुम्हाला जनतेला विश्‍वास द्यावा लागेल. हा विश्‍वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुमच्यात असलेली अभ्यासू वृत्ती निश्‍चितपणे तुम्हाला उपयोगी पडेल.  तुम्ही अभ्यासू आहात. ज्या भागात जाणार, तिथला योग्य अभ्यास करा, तिथली वैशिष्ट्ये नेमकेपणाने जाणून घ्या, लोकांच्या भाषेत बोला आणि लोकांना विश्‍वास द्या, हा विश्‍वासच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. लोकांची श्रद्धा आपल्यावर बसली पाहिजे. त्यासाठी त्यांची गरज ओळखून नेमकेपणाने ते दिले पाहिजे. त्यादृष्टीने तुम्हाला वाटचाल करावी लागेल, असेही श्रीनिवास पाटील म्हणाले.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शुभेच्छा

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश जाधव यांची निवड झाली, ते या पदावर चांगले काम करतील. त्यांना माझ्या शुभेच्छा, असे डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले.

ऐतिहासिक महत्त्व असणारा समारंभ : शाहू महाराज

सत्कार समारंभात बोलताना शाहू छत्रपती महाराज म्हणाले, आजचा सत्कार सोहळा कोल्हापुरातील एक ऐतिहासिक महत्त्व असणारा समारंभ आहे. कोल्हापूरचा एक युवक डॉ. योगेश जाधव यांची नियुक्‍ती उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी झाली आहे. त्यांच्यावरील ही जबाबदारी लहान-सहान नसून, अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य शासन आणि लोकांनी डॉ. योगेश जाधव यांच्यावर विश्‍वासाने सोपविलेली ही जबाबदारी आहे. जेथे शासनाच्या कारभारात काही कमतरता राहील, ती भरून काढायचे काम डॉ. योगेश जाधव यांना करायचे आहे.

तीन पिढ्यांचा वारसा

दै.‘पुढारी’ ने आपल्या तीन पिढ्यांचा वारसा सामाजिक कार्यात अखंड राखला आहे. ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव, आमचे मित्र मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचे कार्य डॉ. योगेश जाधव करत आहेत. त्यांच्या समाजकार्याला राजकारण व राजसत्तेचे बळ मिळाल्याने दोन्हींचा चांगल्याप्रकारे समन्वय साधता येणार आहे. यामुळे डॉ. योगेश जाधव यांचे कार्य उर्वरित महाराष्ट्रापुरते न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्‍त केल्या.

करवीरनगरीचा सन्मान : महापौर

स्वागतपर भाषणात महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी, ‘पुढारी’ हा कोल्हापूरचा मानबिंदू असल्याचे सांगून, डॉ. योगेश जाधव यांचा सत्कार म्हणजे करवीनगरीचा सन्मान असल्याचे सांगितले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आपल्या माणसाची निवड झाली, हे अभिमानास्पद असल्याचेही त्या म्हणाल्या.

विकासाला गती मिळेल

कोल्हापूरच्या सुपुत्राची महत्त्वाच्या पदावर निवड झाली म्हणून सर्वपक्षीयांनी हा सत्कार आयोजित केल्याचे सांगून महापौर सौ. बोंद्रे यांनी, योगेश जाधव यांच्या निवडीचा कोल्हापूरला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. तरुण, तडफदार व आश्‍वासक व्यक्‍तिमत्त्व आपल्याला विकास कार्यासाठी लाभले आहेेे. त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.

डॉ. योगेश जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी व हा गौरवशाली सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी संपूर्ण जाधव परिवार आणि पाटील परिवाराची यावेळी उपस्थिती होती. डॉ. योगेश यांच्या मातोश्री सौ. गीतादेवी, पत्नी डॉ. सौ. स्मितादेवी, भगिनी सौ. शीतल पाटील, मेहुणे मंदार पाटील, डॉ. योगेश यांचे सासरे व पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्रीताई पाटील, डॉ. सोमनाथ पाटील, ऋतुराज मंदार पाटील व ऋतुराज संजय पाटील यांच्यासह सर्व परिवाराची आवर्जून उपस्थित होती. 

आर. के. पोवार यांनी आभार मानले

नागरी सत्काराचा हा सोहळा दिमाखदार झाला. सिक्‍कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे कोल्हापूरशी असलेले ऋणानुबंध आणि ‘पुढारी’ परिवाराशी त्यांचा असलेला अकृत्रिम जिव्हाळा यांचा सुरेख संगम झाल्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली. राज्यपालांच्या उपस्थितीत कार्यक्रम असल्याने समारंभाच्या ठिकाणी रेडकार्पेट अंथरण्यात आले होते. त्याचबरोबर पोलिस बँडने राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. 

आझाद नायकवडी यांचा पोवाडा

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू छत्रपतींचा स्फूर्तिदायक पोवाडा सादर केला. तसेच सत्कारमूर्ती डॉ. योगेश जाधव यांच्यासह जाधव घराण्याचा वारसा सांगणारा पोवाडाही सादर केला.