Wed, Apr 24, 2019 07:39होमपेज › Kolhapur › ‘पाटाकडील’ला पराभवाचा धक्‍का

‘पाटाकडील’ला पराभवाचा धक्‍का

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 12:20AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

गतवर्षीच्या हंगामापासून आजपर्यंत 2 लीग आणि 5 नाकाऊट स्पर्धेत तब्बल 40 सामन्यांतील विजय घोडदोड आणि 4 सामन्यांतील बरोबरी अशा 43 सामन्यांनंतर बलाढ्य पाटाकडीलला शनिवारी पराभवाची चव चाखावी लागली. दरम्यान, ‘सतेज चषक’ फुटबॉल साखळी सामन्यात सर्वाधिक 7 गुणांसह दिलबहारने तर 6 गुणांसह यजमान पाटाकडील तालीम मंडळाने अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी दि. 20 मे रोजी दुपारी साडेतीन वाजल्यापासून छत्रपती शाहू स्टेडियमवर अंतिम लढत होणार आहे.

पाटाकडील तालीम मंडळ व डी.वाय. पाटील ग्रुप आयोजित ‘सतेज चषक’ स्पर्धेतील गुरुवार व शुक्रवारी होणारे साखळी सामने वळवाच्या पावसामुळे रद्द झाले होते. शनिवारी दोन्ही सामने खेळविण्यात आले. 

निखील जाधवचा विजयी गोल...

पहिला सामना पाटाकडील ‘अ’ विरुद्ध दिलबहार ‘अ’ यांच्यात झाला. सामना दोन्ही संघांकरिता महत्त्वपूर्ण असल्याने सुरुवातीपासूनच दोन्हीकडून जलद व आक्रमक खेळाचा अवलंब करण्यात आला. दोन्हीकडून बचावावर भर देण्यात आल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात सामन्याची चुरस अधिकच वाढली. 70 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत निखील जाधवने मारलेला फटका पाटाकडीलचा गोलरक्षक विशाल नारायणपुरे याने रोखला. मात्र, तो पूर्णपणे नियंत्रणात न आल्याने चेंडू गोलपोस्टमध्ये शिरला. यामुळे दिलबहारला 1-0 आघाडी मिळाली.   

बालगोपाल तिसर्‍या स्थानी...

दुसर्‍या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने प्रॅक्टिस क्‍लबचा 2-1 असा पराभव करून तिसरे स्थान पटकाविले. सामन्याच्या पूर्वार्धात प्रॅक्टिसच्या प्रथमेश यादव याने 42 व्या मिनिटाला गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात 58 व्या मिनिटाला बालगोपालच्या ऋतुराज पाटीलने या गोलची परतफेड करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. बालगोपालच्या श्रीधर परबने 67 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवत 2-1 अशी आघाडी मिळविली.