Wed, Jul 17, 2019 18:19होमपेज › Kolhapur › आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या सुरूच राहणार

आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या सुरूच राहणार

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 12:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन अखंड सुरूच राहील. क्रांतिदिनानिमित्त (9 ऑगस्ट) आयोजित महाराष्ट्र बंद यशस्वी केल्यानंतर दसरा चौकातील ठिय्या आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्धार 15 व्या दिवशी सकल मराठा आरक्षण क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या लोकांसमोर करण्यात आला. 

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय,’ या ध्येयाने मराठा समाजाने बहुजन समाजाचा मोठा भाऊ या नात्याने आपले कर्तव्य बजावत सर्व समाजांना न्याय दिला. आज मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या उद्देशाने गेली अनेक वर्षे आरक्षणाचा लढा सुरू आहे. लोकशाही मार्गाने गतवर्षी लाखोंच्या संख्येने सकल मराठा आरक्षण क्रांती मूक मोर्चे यशस्वी करण्यात आले. शांत आणि संयमानेे काढण्यात आलेल्या मोर्चांची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. 

तरीही राज्य शासनाकडून मराठा आरक्षणाबाबत चाल-ढकल आणि विलंब केला जात आहे. यामुळे आंदोलनाचा पुुढचा टप्पा म्हणून सकल मराठा आरक्षण क्रांती ठोक मोर्चा  राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूंच्या कोल्हापूरनगरीतही गेले 15 दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. याला सर्व जाती-धर्मीयांचे पाठबळ मिळत आहे. 

सर्व व्यवहार बंद करून दसरा चौकात या...

मराठा आरक्षणासाठी क्रांतिदिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असणार्‍या ठिय्या आंदोलनांतर्गत महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. यानिमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले सर्व व्यवहार बंद करून गुरुवार, दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता, जाहीर सभेसाठी उपस्थित राहावे. कोल्हापूर बंदची सुट्टी आहे, असे समजून कोणीही फिरायला जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

बचेंगे तो और लढेंगे...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील तब्बल 23 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. असे प्रकार होऊ नयेत, मराठा समाजाला आरक्षण लढून मिळवावे, यासाठी सोशल मीडियावरून जनजागृती सुरू आहे. ‘तुझा जीव रे मोलाचा, होईल हिशेब घामाचा... नको हतबल होऊ, नको जीव देऊ... ऊठ जाग रे मराठ्या, चल लढा देऊ...’ या अशा आशयाच्या पोस्टची देवाण-घेवाण सुरू आहे.