Wed, Aug 21, 2019 15:23होमपेज › Kolhapur › शिक्षण वाचवा’साठी आज महामोर्चा; शाळा बंद

शिक्षण वाचवा’साठी आज महामोर्चा; शाळा बंद

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले शैक्षणिक धोरण, सर्वसामान्यांच्या शाळा वाचविण्यासाठी आणि राज्य सरकारच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समिती, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर जिल्हा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा ‘शिक्षण वाचवा’ महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चामुळे एक दिवस शाळा बंद राहणार आहेत.  

महामोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष डी. बी. पाटील, महापौर स्वाती यवलुजे करणार आहेत. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन दिले जाईल. महामोर्चात शहरासह जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील हजारो विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. 

मराठी शाळा वाचवा महामोर्चाकरिता ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर ‘शाळा वाचवा’ हॅशटॅग मोहीम राबविण्यात येणार आहे. महामोर्चातील सर्व घटकांनी ऑनलाईन राहून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत महामोर्चाची माहिती पाठविण्याचे आवाहन केले आहे. ‘खासगी कंपन्यांना शाळा चालविण्यास देण्याच्या धोरणाला कडाडून विरोध करण्याची हीच खरी वेळ आहे. यानंतर काळ माफ करणार नाही..!’, ‘महामोर्चाला यायला लागतंय..!, ‘स्वत: या अन् इतरांनाही घेऊन या, आम्ही वाट पाहत आहोत’, असे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.

Tags : Kolhapur, Kolhapur News, protest for save education in Kolhapur