Mon, Apr 22, 2019 23:41होमपेज › Kolhapur › वैयक्तिक मनभेद न बाळगणे डॉ. बाबासाहेबांचे वैशिष्ट्य : प्रा. हरी नरके

वैयक्तिक मनभेद न बाळगणे डॉ. बाबासाहेबांचे वैशिष्ट्य : प्रा. हरी नरके

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 07 2018 12:50AMकोल्हापूर  : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांच्या समकालीनांसमवेत वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद कधीही बाळगले नाहीत, हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी मंगळवारी  येथे केले.

शिवाजी विद्यापीठ इतिहास अधिविभाग व सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र यांच्या वतीने ‘डॉ. आंबेडकर आणि त्यांचे समकालीन’ (समानता आणि मतभिन्नता-एक अभ्यास) या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून  प्रा. नरके  बोलत होते. इतिहास अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. भारती पाटील होत्या.

प्रा. नरके यांनी डॉ. आंबेडकर आणि त्यांचे समकालीन असणारे समतुल्य नेते यांच्यातील सहसंबंधांचा अत्यंत व्यापक परिप्रेक्ष्यातून वेध घेतला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे महान नेते होते व आहेत. परंतुु, अलीकडील काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर या इतिहास पुरुषांचे इतक्या मोठ्या प्रमाणात दैवतीकरण करण्यात येत आहे की त्यांची चिकित्सा करता येणेही मुश्कील होऊ लागले आहे.  

प्रा. नरके पुढे म्हणाले, बाबासाहेब आणि त्यांचे समकालीन असे म्हटले की, सर्वप्रथम त्यांचे आणि महात्मा गांधी यांच्या संबंधांचा विचार पुढे येतो. या दोन्ही व्यक्ती आपापल्या ठिकाणी मोठ्या होत्या. त्या काळावर त्यांनी स्वत:ची नाममुद्रा उमटविलेली आहेच; पण या दोघांच्याही मोठेपणात, दोघांच्याही विकासात त्यांचा परस्परांचा अत्यंत मोलाचा वाटा होता, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तीच बाब काँग्रेस अर्थात तत्कालीन काँग्रेसचे नेते जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद आणि मौलाना आझाद यांच्या आंबेडकरांशी असलेल्या संबंधाच्या बाबतीतही होते. घटना समितीमध्ये बाबासाहेबांना आणण्यासाठी बॅ. जयकरांच्या रिक्त जागेवर त्यांना निवडून आणण्यास गांधींनी सांगितले आणि काँग्रेसने बाबासाहेबांना बिनविरोध निवडून दिले. बाबासाहेबांच्या समकालीन संदर्भांचा अभ्यास करीत असताना स्त्री-पुरुष समता, सृजनशील ज्ञाननिर्मिती व कौशल्य विकास, कृतिशील जातीनिर्मूलन, चिकित्सा आणि लोकशाही मूल्यांची जोपासना या पंचसूत्रीचा आधार अभ्यासकांनी घेण्याची आवश्यकता प्रा. नरके यांनी प्रतिपादन केली. यावेळी  अधिविभाग प्रमुख डॉ. नंदा पारेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. अवनिश पाटील यांनी परिचय करून दिला.   डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. डॉ. नीलांबरी जगताप यांनी सूत्रसंचालन केले.