Sun, May 26, 2019 09:48होमपेज › Kolhapur › जि. प. शाळांच्या ठिकाणी कंपनीची शाळा नाही : तावडे

जि. प. शाळांच्या ठिकाणी कंपनीची शाळा नाही : तावडे

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

खासगी कंपनीच्या शाळा आल्यावर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेची शाळा असेल, त्या ठिकाणी कंपनी शाळेला परवानगी दिली जाणार नाही. शासन व समाजाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा वेगळा कोल्हापुरी पॅटर्न राबविणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापुरात जनआंदोलन सुरू आहे. आंदोलनातील मागण्यांसंदर्भात कृती समितीने ई-मेल करून चर्चेस बोलाविले होते. मात्र, कार्यालयीन कामकाजाच्या व्यापामुळे वेळ देऊ शकलो नाही. जिल्ह्यातील बंद करण्यात येणार्‍या 34 शाळांपैकी 13 शाळांचे समायोजन करण्यात आले आहे. 13 शाळांना शिक्षण विभागातील अधिकारी व कृती समिती सदस्य असे एकत्रित भेट देऊन वास्तवदर्शी अहवाल शिक्षण विभागाला सादर करतील. त्या अहवालावर कृती समिती सदस्य व आपण एकत्र बसून निर्णय घेणार आहे. 

ज्या गावातील शाळांची पटसंख्या 25 च्या खाली आहे, त्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर पॅटर्न राबविणार आहे. तो कौशल्यावर आधारित असेल. पटसंख्या कमी असणार्‍या जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल. खासगी शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढले आहे. पटसंख्या कमी असणार्‍या शाळा सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. खासगी कंपनीच्या शाळांचा निधी हा सीएसआर नाही. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर असणार आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्याचे धोरण सरकारने ठरविले आहे. यासाठी विशेष कोल्हापूर पॅटर्नचा विचार केला जाईल. शासनाकडून शिक्षणावर 2.5 टक्के खर्च होत आहे. कोठारी कमिशनच्या शिफारशीनुसार शिक्षणावरील खर्च सहा टक्के करावा, असे अपेक्षित आहे. शिक्षणावरील खर्च टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा शासन प्रयत्न करेल, असेही तावडे यांनी सांगितले.