Tue, Jul 23, 2019 01:57होमपेज › Kolhapur › भाजपला ओहोटी : आ. पृथ्वीराज चव्हाण 

भाजपला ओहोटी : आ. पृथ्वीराज चव्हाण 

Published On: Jun 03 2018 1:14AM | Last Updated: Jun 03 2018 12:01AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

पंतप्रधानांनी केवळ एकाधिकारशाही चालवून देशाचा कारभार सुरू केला आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नसल्याने जनता भाजपवर प्रचंड नाराज आहे. भाजपची लाट आता विरली असून, त्यांच्या ओहोटीची सुरुवात झाली आहे. याचा नमुना कालच्या पोटनिवडणुकांतून दिसून आला असून, येत्या निवडणुकांत भाजपा केंद्रात व राज्यात सत्तेत दिसणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमानिमित्त ते आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर  टीका केली.

आ. चव्हाण म्हणाले, भाजपच्या ओहोटीची सुरुवात गुजरातमधूनच झाली होती. मात्र, त्या कालावधीपासूनच भाजपने पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे नवे तंत्र सुरू केले आहे. मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात विरोधकांची एकजूट झाली असून, संविधान बचावासाठी आता सारे एकत्र आले आहेत. 2014 च्या निवडणुकीत 31 टक्के मते भाजपला होती. तर 61 टक्के विरोधात होती. मात्र, ही मते विभागली गेल्यानेच भाजप सत्तेत राहिला.

साखर उद्योगाबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मोदींना देशातील 3 टक्के शेतकर्‍यांशीही देणेघेणे नसून, उर्वरित जनतेला स्वस्ताई करून देण्यासाठी शेतकर्‍यांवर कुर्‍हाड चालविली जात आहे. शेतकरी संघटित नसल्याने त्यांची शेतकर्‍यांवर मनमानी सुरू आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रच लढणार असून, भाजपविरोधात आणखी कोणी सोबत येणार असेल तर त्यांनाही सोबत घेऊन भाजपला सत्तेबाहेर करणार आहे.