Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Kolhapur › बंदिजनांनी बनविल्या अनमोल राख्या

बंदिजनांनी बनविल्या अनमोल राख्या

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 11:03PM
कोल्हापूर : शेखर दुग्गी

रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन! रक्षाबंधनाला बाजारात नानाविध राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत; पण कळंबा कारागृहातील बंदिजनांनी बनविलेल्या अनमोल राख्या सर्वांच्याच नजरा वेधून घेत आहेत. बाजारात आलेल्या या राख्यांना प्रचंड मागणी आहे. कळंबा कारागृह प्रशासनाने यावर्षीपासूनच हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्याला भरभरून प्रतिसादही मिळत 
आहे.

कळत न कळत हातातून घडलेल्या एका चुकीमुळे अनेक कैदी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. या बंदिजनांच्या हाताला काम मिळावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, तसेच त्यांच्यातील उद्यमशीलतेला सकारात्मक ऊर्जा मिळावी, या उद्देशाने कळंबा कारागृह प्रशासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. कारागृहातील 40 पुरुष व महिला बंदिजनांनी गेल्या आठ दिवसांत जवळपास 2 ते अडीच हजार राख्या बनविला आहेत. 

या राख्या जीएसटीमुक्त असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील, परवडतील अशा दरांत आहेत. मणीची, गोंड्याची, फुलांची आणि रेशीम धाग्यांची राखी 10 रुपयांपासून पुढे विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यासाठी कळंबा कारागृह आवारात भव्य स्टॉलही उभारण्यात आला आहे. या राख्या खूपच आकर्षक व अनोख्या असून, त्या खरेदीसाठी नागरिकांची दररोज गर्दी होेते. कारागृहातील कारखाना व्यवस्थापक एस. सी. आडे आणि व तांत्रिक कर्मचार्‍यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत. 

भावाला ‘स्वीट’ अन् बहिणीला ‘गिफ्ट’

बहीण भावाला राखी बांधते. त्यानंतर मिठाई भरविते. यासाठी बंदिजनांनी मिठाई म्हणून बुंदीचा लाडूही बनविला आहे. हा लाडूदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. राखी बांधल्यानंतर बहिणीचे गिफ्टही आलंच. बहिणीला गिफ्ट देण्यासाठी टॉप्स तसेच इतर शोभेच्या वस्तूही बंदिजनांनी बनविल्या आहेत.