Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Kolhapur › डॉ. जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपली : कोळसे-पाटील(व्हिडिओ)

डॉ. जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपली : कोळसे-पाटील(व्हिडिओ)

Published On: Mar 09 2018 6:44PM | Last Updated: Mar 09 2018 6:44PMकोल्हापूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जीवापाड जपली. त्यामुळेच संत गाडगे महाराज अध्यासनातर्फे समाजभूषण हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे, असे गौरवोद्गार उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी आज (शुक्रवारी) काढले. यावेळी सत्काराला उत्तर देताना, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी, देशाला समाजाभिमुख शिक्षणाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. संत गाडगे महाराज अध्यासनाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते.

संत गाडगे महाराज अध्यासनाच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या हस्ते संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, मानचिन्ह, संत गाडगे महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन श्याम कुरळे यांनी केले.

डॉ. जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपली : कोळसे-पाटील
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, ‘पुढारी’कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांना मिळालेल्या पुरस्कार वितरण समारंभात मला संधी मिळाली, याबद्दल मी भाग्यवान समजतो. ‘पुढारी’कार ग. गो. जाधव यांचा वैचारिक आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपण्याचे काम  डॉ. प्रतापसिंह जाधव करीत आहेत. संत गाडगे महाराज यांनी केलेल्या कामाने भारावून, मी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. एक  अशिक्षित माणूस एवढे काम करीत असताना, मी शिक्षित म्हणून काहीच करू शकत नाही का, असा माझ्या मनाला प्रश्‍न पडल्याने मी सेवामुक्त झालो. फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील  या प्रत्येकाने स्वतंत्र विचार करा, असा सल्ला दिला. मात्र, आम्ही कोणाचे काहीच घ्यायला तयार नाही. संत गाडगे महाराज यांनी केवळ हातातील झाडूने गावे स्वच्छ केली नाहीत, तर आपल्या कीर्तनाने माणसांचा अंधश्रद्धेेने सडलेला मेंदू स्वच्छ करण्याचे काम केले. 

कोळसे-पाटील म्हणाले, या देशाला अस्थिर ठेवणारी एक जमात कार्यरत आहे. ही जमात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीतील कोल्हापूरकरही याला बळी पडत आहेत, याचे वाईट वाटते. महापुरुषांनी दिलेले विचार आत्मसात करून प्रत्येकाने स्वतंत्र विचार करून नवसमाजनिर्मितीचे काम केले पाहिजे.

समाजाभिमुख शिक्षणाची गरज : डॉ. प्रतापसिंह जाधव
संत गाडगे महाराज यांनी शिक्षणाचा प्रसार अत्यंत नेटाने केल्याचे सांगून डॉ. जाधव म्हणाले की, त्यांनी शिक्षण प्रसाराच्या घेतलेल्या ध्यासातून उतराई होणे आपल्या पिढीला शक्य नाही. म्हणूनच गाडगे महाराजांच्या समाजाभिमुख शिक्षण आणि स्वच्छतेसह अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती या विचारांच्या आचरणाची आज समाजाला नितांत गरज आहे. प्रत्येक गोष्ट शासनानेच केली पाहिजे हा समज चुकीचा असून, स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासूनच करण्याची गरज आहे. घरात स्वच्छता ठेवतो, त्याप्रमाणे रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

संत गाडगे महाराजांच्या शिकवणीची गरज
गाडगे महाराज हे अलीकडच्या काळातील संत आहेत. त्यांची विचारधारा आणि कर्तव्याच्या शिकवणीची वाटचाल आज गरजेची आहे. प्रवचन आणि कीर्तनातून गाडगे महाराजांनी समाज सुधारणेचे मोठे काम केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठीच ते जगले. त्यांच्या या थोर कार्याचे कौतुक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते आचार्य अत्रे यांच्यापर्यंत सर्वांनीच केले. संत परंपरेत ‘ज्ञानेदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’, असे म्हटले जाते. संत गाडगे महाराजांच्या कार्यामुळे त्यांनी या कळसावर पताका फडकावली. मी कोणाचा गुरू नाही आणि माझा कोणी शिष्य नाही, असे म्हणत त्यांनी कोणत्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. अशा थोर संताच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळणे हे भाग्याचे आहे. हा पुरस्कार आपला नसून कोल्हापूरकरांना मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

समाजसेवेची पोहोचपावती
शिक्षणाच्या निमित्ताने देश-परदेशांत गेलो, तरी आपली कोल्हापूरशी नाळ कधीच तुटली नाही, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले, समाजकार्याची आवड आपल्याला नेहमीच राहिली. त्याचाच हा पुरस्कार आहे. जाधव कुटुंबीय आणि दै. ‘पुढारी’ने जोपासलेल्या समाजसेवेच्या कार्याचा गाडगे महाराज अध्यासनाने गौरव करून या कामाची पोहोचपावती दिली आहे. कोल्हापूरकरांच्या सहकार्यानेच दै.‘पुढारी’ने आजवर सामाजिक कार्य केले. म्हणूनच हा पुरस्कार कोल्हापूरकरांचाच आहे, असे आपण मानतो.

‘पुढारी’ समाजाचा अविभाज्य भाग : कुलगुरू
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, कुलगुरू म्हणून कोल्हापुरात आल्यानंतर पहिल्यांदा डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी फेटा बांधून सत्कार केला. तो  कायम स्मरणात राहणारा अनुभव आहे. दै.‘पुढारी’ हा गेली 75 वर्षे समाजजीवनाच्या विकासाचा साक्षीदार, भागीदार राहिला आहे. समाजाचा अविभाज्य भाग बनला आहे. डॉ. ग. गो. जाधव यांचे समाजभान व विद्यापीठाबद्दलची असणारी आत्मीयता पदोपदी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यात जाणवते. ते त्यांच्या विचारांचा वारसा प्रभावशाली पद्धतीने चालवीत आहेत. डॉ. जाधव हे व्यापक समाजहिताची भूमिका घेऊन लढा देत आहेत. त्यांनी लोकसंपादक अशी प्रतिमा जपली आहे.

करवीरकरांचा अभिमान
ऊस, दूध, तंबाखू उत्पादकांसह शहर व ग्रामीण भागाच्या प्रश्‍नांबाबत डॉ. जाधव यांनी ठाम भूमिका मांडली आहे. कोल्हापूरबाबतचा शासनस्तरावर महत्त्वाचा कोणता निर्णय झाल्यानंतर संपादकांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी रांगा लागतात, हा करवीरकरांचा अभिमान आहे. ‘पुढारी’ने सियाचीन युद्धभूमीवर रुग्णालय उभारून लाखो जवानांचे प्राण वाचविण्याचे काम केले आहे. हा देशसेवेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचा विचार डॉ. ग. गो. जाधव यांनी मांडला. विद्यापीठासंदर्भातील वृत्तांचा साठा दै. ‘पुढारी’कडे आहे. विद्यापीठाबाबतचे इतिहास लेखन करताना हा महत्त्वाचा वस्तूजन्य पुरावा ठरणार आहे.

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी दै.‘पुढारी’चे रोपटे लावले. मात्र, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दै. ‘पुढारी’चा महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यापर्यंत विस्तार केला. काळाची पावले ओळखून नवतंत्रज्ञानाची कास धरून दै.‘पुढारी’ला नवीन रूप दिले. त्यामुळे ग्रामीण भागच नव्हे, तर मुंबईसारख्या शहरातही विश्‍वसनीय बातम्या देणारे वृत्तपत्र म्हणून दै. ‘पुढारी’कडे आदराने पाहिले जाते, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ‘सिंहायन’ या गौरवग्रंथाचे मुखपृष्ठ बोलके आहे. पुस्तकातील त्यांच्या हाताच्या बोटावर मतदानाची शाई दिसते. लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सजग असणारा ‘पुढारी’ अशी डॉ. जाधव यांची प्रतिमा आपणास भावली, असे उद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले.

यावेळी प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांचा शाल, श्रीफळ, आणि ‘स्वच्छता-संत गाडगे महाराज’ हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला, तर न्यायमूर्ती कोळसे-पाटील आणि कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते डॉ. भारत खराटे, मीरासाहेब मगदूम, सचिन पाटील, प्रा. किसन कुराडे, डॉ. जे. बी. शिंदे, श्रीराम पचिंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. ‘पाच बोटे चंदनाची’ या पुस्तकाचे प्रकाशन कोळसे-पाटील यांच्या हस्ते,  ‘गाडगेबाबा बोलतोय’ या पुस्तकाचे डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते आणि ‘मुलांचे गाडगेबाबा’ या पुस्तकाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा हा वैचारिक भावनिकतेचा समारंभ आहे. समाजप्रबोधन व लोकजागृतीसाठी झटणार्‍या व्यक्ती आज व्यासपीठावर एकत्र आल्या आहेत. दै. ‘पुढारी’चे संस्थापक डॉ. ग. गो. जाधव यांच्यातील मायाळूपणामुळे प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडून वेगळी प्रेरणा घेऊन जात असे. डॉ. प्रतापसिंह जाधव हेदेखील राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवीत, सामाजिक प्रश्‍न सोडविण्याचे काम करीत आहेत.

संत गाडगे महाराज अध्यासनाचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी प्रास्ताविकात अध्यासनाचा आढावा घेतला. संत गाडगे महाराज यांनी पिंडदान कार्यक्रमात केलेले प्रबोधन प्रा. भगत यांनी संत गाडगे महाराज यांच्या आवाजात ‘दहा कोसावरील पिकांना जर ओंजळीने पाणी जाणार नाही, तर स्वर्गात लाडू कसे जाणार’, अशी विचारणा करून गाडगे महाराज यांनी केलेले प्रबोधनाचे काम दाखवून दिले. न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांच्या हस्ते सचिन पाटील, एम. डी. देसाई यांचा सत्कार करण्यात आला. एम. डी. देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

विविध संघटनांतर्फे सत्कार
संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनांचे पदाधिकारी व शिवसेनेचे दुर्गेश लिंग्रस, बाबा पार्टे यांच्यासह शहरातील विविध पक्ष, संघटना पदाधिकार्‍यांनी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा यावेळी सत्कार केला.

डॉ. ग. गो. जाधव अध्यासन पत्रकारितेचे पहिले अध्यासन
शिवाजी विद्यापीठाने पत्रकार डॉ. ग. गो. जाधव यांच्या नावाने अध्यासन सुरू केले आहे. हे पत्रकारितेचे देशातील पहिले अध्यासन असून लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे. अध्यासन पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूरचे भाग्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी दै. ‘पुढारी’च्या अमृतमहोत्सव समारंभास कोल्हापुरात आले. त्यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी भाषणात स्वत:साठी काहीच न मागता कोल्हापूरसाठी मागितले. पंतप्रधान मोदी यांनीही त्यांच्या भाषणात ‘निर्भीड’ असा डॉ. जाधव यांचा उल्लेख केला. अशी व्यक्ती लाभणे हे कोल्हापूरचे भाग्य आहे, असे कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले.