Mon, Mar 25, 2019 05:26
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › जोतिबा यात्रेची जय्यत तयारी

जोतिबा यात्रेची जय्यत तयारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ अशा जयघोषात आणि हालगी, घुमक्याच्या गजरात महाराष्ट्रासह कर्नाटकातून सासनकाठीसह पायी दिंडी, बैलगाडीने भाविक दख्खनचा राजा श्री जोतिबा यात्रेसाठी कोल्हापुरात दाखल होऊ लागले आहेत. 29, 30 आणि 31 मार्च अशी तीन दिवस यात्रा चालणार आहे. या यात्रेसाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने तीन दिवसांचे प्रवासी वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यासाठी 175 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसांमध्ये मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन बसस्थानक आणि पंचगंगा घाट या ठिकाणावरून बसेस सोडण्यात येणार आहेत. 

टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने यात्रेसाठी मोफत वाहन दुरुस्ती सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच या असोसिएशनच्या वतीने यावर्षी प्रथमच ‘फायर बाईक’चाही समावेश करण्यात आला आहे. तसेच रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यांतील भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री जोतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस शनिवार, दि. 31 मार्च असा आहे. यात्रेसाठी तीन राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. जोतिबाच्या यात्रेसाठी पायी दिंडीने आणि बैलगाडीतून येण्याची परंपरा आहे. बैलगाडीला सवारी बांधून त्यावर गवत, पिंजर घालून त्यावर प्लास्टिकच्या कागदाने बांधून, भाविक येऊ लागले आहेत. पुढे सासनकाठी घेतलेले भाविक आणि मागे बैलगाडीचा तांडा असे चित्र दिसत होते. 

 सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील भाविक पायी दिंडीनेही दाखल होऊ लागले आहेत. सोमवारी सकाळी बैलगाड्यांसह भाविकांनी येऊन पंचगंगा नदीघाटावर दाखल झाले होते. पंचगंगा नदीत अंघोळ करून देवीचे दर्शन घेऊन हे भाविक सायंकाळी जोतिबा डोंगराकडे रवाना झाले. 

या भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदीघाटावर पाण्याची सोय केली असून, परिसराची स्वच्छता तसेच दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे.
एस.टी.च्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक, जोतिबा डोंगर व पंचगंगा घाट याठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे शेड उभारण्यात येत आहेत. प्रवाशांची गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून तिन्ही बसस्थानकांवर क्यु रेलिंग उभारण्यात आले आहे. तसेच एस.टी.च्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात येणार आहे. मार्गस्थ झालेल्या बसेसमध्ये बिघाड झाल्यास तत्काळ त्या दुरुस्त करण्यासाठी यांत्रिक कर्मचारी, ब्रेक डाऊन अटेंड वाहने दुरुस्तीच्या अत्यावश्यक साहित्यासह उपलब्ध करण्यात येणार आहेत. शहरातील तिन्ही ठिकाणाहून दर 5 मिनिटांनी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

दुचाकी वाहनांची मोफत दुरुस्ती 

कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने यात्रेच्या कालावधीत 30 व 31 मार्च या दोन दिवस मोफत दुचाकी वाहन दुरुस्ती व पंक्‍चर काढून देण्याची उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंडळाचे नियोजन प्रमुख संजय पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, असोसिएशनच्या वतीने गेली 18 वर्षे हा उपक्रम राबवला जातो. यात्रीनिवास येथील पार्किंग हे उपक्रमाचे मुख्य केंद्र राहणार आहे. दुचाकीवरून आलेल्या भाविकांच्या वाहनात बिघाड झाल्यास अगर गाडी पंक्‍चर झाल्यास असोसिएशनचे पदाधिकारी तेथे जाऊन दुरुस्त करणार आहेत. त्यासाठी जोतिबा डोंगर घाटामध्ये प्रत्येक 1 किलोमीटर अंतरावर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांचे संपर्क नंबर दिले आहेत. त्या नंबर वाहन दुरुस्तीसाठी भाविकांनी संपर्क साधावा. यावेळी शरद पाटील, धनंजय अस्वले, संतोष हराळे, माधव सावंत, नाना गवळी आदी उपस्थित होते.  

रोटरीच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार शिबिर

रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सनराईज, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने 29 ते 31 मार्च हे तीन दिवस जोतिबा डोंगरावर मंदिर परिसरात हत्तीची ओरी या ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गेली 22 वर्षे हा उपक्रम राबवला जात आहे. दि.29 मार्च रोजी स.10 वा. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थान आ. सतेज पाटील हे भूषविणार आहेत. डिस्ट्रीक 3170 चे प्रांतपाल रो. आनंद कुलकर्णी, वाडी रत्नागिरीच्या सरपंच डॉ. सौ. रिया सांगळे, राज्य केमिस्ट असो.चे सेक्रेटरी मदन पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणार्‍या या शिबिरात 24 डॉक्टर सेवा देणार आहेत, असे क्‍लबचे अध्यक्ष गौरव शहा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. इंद्रजित चव्हाण, विक्रांत केसकर, अतुल पाटील, सचिन झंवर आदी उपस्थित होते. 

शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने अन्‍नछत्र

शिवाजी चौक तरुण मंडळाच्यावतीने पंचगंगा नदी घाटावर सलग तीन दिवस (दि.30, 31 मार्च व 1 एप्रिल) मोफत अन्‍नछत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. अन्‍नछत्रासाठी मंडप उभारण्याचे काम पंचगंगा घाटावर सुरू करण्यात आले आहे. चार हजार चौरस फुटांचा मंडप घालण्यात येणार आहे. तीन दिवसांसाठी शंभर स्वयंपाकी अन्‍न तयार करण्याचे काम करणार आहेत.  यावर्षी 1 लाखापेक्षा जास्त यात्रेकरूना मोफत अन्‍न देण्याचे नियोजन आहे, असे मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सुहास भेंडे, चंद्रकांत स्वामी, पपू भेंडे आदी उपस्थित होते. 

Tags : 


  •