Fri, Jul 19, 2019 15:50होमपेज › Kolhapur › ‘पुढारीच्या उपक्रमाने मुलींचा आत्मविश्‍वास वाढेल’ (Video)

‘पुढारीच्या उपक्रमाने मुलींचा आत्मविश्‍वास वाढेल’ (Video)

Published On: Jan 11 2018 1:06AM | Last Updated: Jan 11 2018 2:42PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

मुलींच्या आत्मसंरक्षणाठी दैनिक ‘पुढारी’ने पुढाकार घेतला आहे, ही आनंददायी बाब आहे. ‘पुढारी’च्या उपक्रमाने मुलींचा आत्मविश्‍वास वाढणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍वास शाहू महाराज यांनी व्यक्‍त केला. दैनिक ‘पुढारी’ संचलित ‘प्रयोग’ फाऊंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या ‘ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण’ उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते व  महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. महिला सक्षमीकरणाची ही नवी चळवळच सुरू होत असल्याचे दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी सांगितले. प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे हा सोहळा झाला.

शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूरला मोठी परंपरा आहे. महाराणी ताराराणीपासून आतापर्यंत विविध क्षेत्रांत महिलांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे. आता काळ बदलत चालला आहे. त्यानुसार मुली, महिलांना स्वसरंक्षणाची गरज निर्माण झाली आहे. ‘पुढारी’ने सुरू केलेला हा उपक्रम मुली, महिलांना प्रोत्साहन देणाराच आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढणार आहे. त्याद्वारे त्यांचा सर्वांगीण विकासही होणार आहे. ‘पुढारी’ने नेहमीच सामाजिक द‍ृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविले आहेत. समाजाच्या प्रश्‍नासाठी लढणारा ‘पुढारी’ नेहमीच समाजासाठी ‘पुढाकार’ घेत असतो. यापुढेही ‘पुढारी’चे समाजहिताचे कार्य असेच चालू राहील, अशा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

डॉ. चौधरी म्हणाले, प्रत्येकात प्रचंड ऊर्जा असते. तिला दिशा देण्याची गरज असते. त्याकरिता हा उपक्रम उपयुक्‍त ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत. त्यांचा सार्वजनिक वावर वाढला आहे.  त्यामुळे स्वत:चे संरक्षण करणे त्यांनी शिकले पाहिजे. ‘पुढारी’चा हा उपक्रम त्यासाठी उपयुक्‍त आहे. स्वत:च्या सक्षमीकरणासाठी त्याचा मुली, महिलांनी लाभ घ्यावा, असे सांगत ‘पुढारी’च्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. महापालिकांच्या सर्वच शाळांत हा उपक्रम राबवावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

 

 

 

 

दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया म्हणाले, सर्वाधिक मुलींची संख्या असलेली पद्माराजे ही शहरातील एकमेव शाळा आहे.  मुलींनी स्वावलंबी व्हावे, त्यांना संरक्षणाचे धडे मिळावेत, असा सातत्याने विचार सुरू होता. मात्र, आमची ही चिंता ‘पुढारी’ने दूर केली. संस्था सदैव ‘पुढारी’च्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

डॉ. योगेश जाधव यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘पुढारी’ आणि सामाजिक बांधीलकी हे समीकरणच तयार झाले आहे. ‘पुढारी’ हा जनतेचा आवाज बनला आहे. ‘पुढारी’ने हाक दिली आणि जनतेने त्याला साथ दिली. त्यातून जगातील सर्वात उंच रणभूमीवर सियाचीन हॉस्पिटल उभे राहिले. आजवर या हॉस्पिटलमध्ये एक लाखापेक्षा अधिक लोकांंवर उपचार करण्यात आले आहेत. ‘पुढारी’ची स्थापनाच स्वातंत्र्य चळवळीत झाली आहे. ‘संयुक्‍त महाराष्ट्र’, ‘गोवा मुक्‍ती’ ते अगदी स्थानिक पातळीवरील कोल्हापूरचे टोल आंदोलन, अशा सर्वात ‘पुढारी’ जनतेबरोबर रस्त्यावर उतरून जनतेच्या खांद्याला खांद्या लावून लढला.

महिला सक्षमीकरण, सबलीकरण असे शब्द कानांवर पडत असतात. मात्र, त्याबाबत काही घडताना दिसत नाही, याची सर्वांनाच खंत आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, या उपक्रमाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाची नवी चळवळ सुरू करत आहोत. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आहे. काही ठिकाणी ती पुरुषाच्याही पुढे आहे. असे असले तरी स्त्रीबाबत दुजाभाव, भेदभाव सुरूच आहे. या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. ‘पुढारी’ने स्त्री सबलीकरणाचे काम हाती घेतले आहे. या उपक्रमांतर्गत शाळकरी मुली, महिलांसाठी स्वसंरक्षणाच्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. दर शनिवारी दोन तास असे दोन महिन्यांचे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. यात सहभागी होणार्‍यांना प्रमाणपत्रेही दिली जाणार आहेत. यासह महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अन्य उपक्रमही राबविले जात असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

मर्दानी राजा सुहासराजे ठोंबरे आखाड्याच्या वतीने शिवकालीन युद्धकलेची, तसेच कोल्हापूर जिल्हा कुराश असोसिएशन व न्यू ज्युदो प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ज्युदो-कराटेची प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या वतीने ‘अटल टिकरिंग लॅब’ उपक्रमात शाळेचा समावेश झाला आहे. त्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर, मुख्याध्यापिका राधिका मुंद्रुपकर, सौ. एस. एस. धर्माधिकारी, पर्यवेक्षक सौ. एस. आर.चौगुले, व्ही. बी. पाटील, सौ. मनीषा वाडीकर, लालासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.