Mon, Nov 18, 2019 22:21होमपेज › Kolhapur › विठ्ठलनामाने दुमदुमले प्रतिपंढरपूर नंदवाळ

विठ्ठलनामाने दुमदुमले प्रतिपंढरपूर नंदवाळ

Published On: Jul 12 2019 5:56PM | Last Updated: Jul 12 2019 5:39PM
देवाळे (कोल्हापूर) : वार्ताहर 

अवघा रंग एक झाला रंगी रंगला पांडुरंग अशा विठ्ठलमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर नंदवाळ (ता. करवीर) येथील आषाढी एकादशी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागातून चारशेहून अधिक दिंड्या नंदवाळ येथे आल्या होत्या. विठ्ठल नामाच्या गजराने दिवसभर परिसर दुमदुमून गेला. पहाटे तीन वाजता करवीरचे तहसीलदार सचिन गिरी यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्वस्त विश्वास फाटक, शंकरराव शेळके उपस्थित होते. 

विठ्ठलाची पूजा आकर्षक पद्धतीने बांधण्यात आली होती. विठ्ठल पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. आज (ता.१२) दिवसभरात खांद्यावर पताका घेतलेले भाविक,तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, टाळ, मृदंगचा गजर,आणि मुखी संतांचे अभंग गात येणारे वैष्णव भक्त नंदवाळकडे पहाटेपासून येत होते.

दिंड्यातील भाविक वाटेत टाळ मृदंगच्या साथीने नाचत गात होते. महिला भाविक फुगड्या घालत होत्या. अधूनमधून कोसळनाऱ्या पावसाच्या हलक्या सरींची पर्वा न करता भाविक विठ्ठल नामाचा अखंड जयघोष करत होते. मंदिर परिसरात आणि गावात अनेक घरात दिंड्या विसवल्याने अभंग आणि टिपेला पोहचणारा आवाज यामुळे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. नंदवाळ मार्गावर अनेक सेवाभावी संस्थानी भाविकांना चहा व उपवासाचे फराळ वाटप केले .कांडगाव येथे लोकराजा प्रतिष्ठानने फराळ वाटप केले.

दिवसभर सडोली खालसा,देवाळे, हळदी, कांडगाव,कुरुकली, बेले,कोथळी, हिरवडे ,हुपरी,परिते,मांडरे,पाडळी, बालिंगा, नागदेववाडी,राशिवडेसह अनेक गावातील दिंड्या दर्शनासाठी आल्या होत्या. बाचणी ता.करवीर येथील दिंडीचा रिंगण सोहळा भोगावती खत कारखान्याच्या आवारात संपन्न झाला. अश्वाचे पूजन आ चंद्रदीप नरके यांच्या हस्ते व अजित नरके, बाबासाहेब देवकर यांच्या उपस्थितीत झाला. जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, पंचायत समिती सदस्य अश्विमी धोत्रे यांच्या वतीने भाविकांना फराळ वाटप करण्यात आले.

मंदिर परिसरात दर्शन रागांची सोय केल्याने भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले.दर्शनासाठी साडेचार तासांचा वेळ लागत होता.रांगेतही भाविक विठ्ठल नामाचा गजर करत होते.वाशी फाटा व जैताळ मार्गावर वाहन बंदी केल्याने भाविकांचे चालणे सुखकर झाले.या मार्गावरील अवजड वाहतूक अन्यत्र वळवल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत होती.करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

कणेरी आरोग्य केंद्राचे पथक रुग्णवाहिकेसह सज्ज होते.सीसीटीव्ही मुळे मुख दर्शनाची सोय केली होती.काही भाविकांनी गर्दी पाहून कळसाचे दर्शन घेतले.दुपारी तीन वाजता कोल्हापूर हुन आलेल्या दिंडी सोहळ्याने गर्दी वाढली. दिंडीचे स्वागत सरपंच अस्मिता कांबळे, उपसरपंच भारती पाटील,ग्रामसेवक अमिता नीळकंठ यांनी केले. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी रीघ सुरूच होती.मंदिर सभागृहात अखंड भजन गायन सुरू होते.