Sun, May 26, 2019 13:07होमपेज › Kolhapur › पन्हाळागडावर ठिकठिकाणी संरक्षक कठडे कोसळले

पन्हाळागडावर ठिकठिकाणी संरक्षक कठडे कोसळले

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:03AM

बुकमार्क करा

पन्हाळा  : प्रतिनिधी

पन्हाळा गडावरून तीन दरवाजामार्गे सोमवार पेठ, गुडे, इंजोळे आदी गावांकडे जाणारा रस्ता धोकादायक बनला असून या रस्त्यावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता वाहतुकीला बंद करावा अथवा या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे . 

 पन्हाळा येथील ऐतिहासिक तीन दरवाजा येथून पश्‍चिम  बाजूस असणार्‍या वाड्या-वस्तींवर जाण्यासाठी पूर्वीपासून वाट आहे. मात्र, या वाटेवर जिल्हा परिषद, व पन्हाळा नगरपालिका  यांनी डांबरी रस्ता केला असून  या रस्त्याची अनेक वर्षे डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे, या रस्त्याला पन्हाळगडावरून जात असताना तीन दरवाजाखाली पहिलेच वळण धोकादायक बनले आहे, या वळणाचा संरक्षक कठडा तुटला असून पूर्णत: हा कठडा जमीनदोस्त झाल्याने वाहनाचालकाचा अंदाज चुकला तर वाहनासह सरळ दोनशे फूट खोल दरीतच वाहन चालकास शोधावे लागेल, अशी अवस्था झाली आहे.   

अनेकवेळा येथे अपघात घडतात, सोमवार पेठ  येथे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.  त्यामुळे मोटार सायकलधारक विद्यार्थी नेहमी या रस्त्यावरूनच ये-जा करतात. विद्यार्थी  वाहतूक देखील या रस्त्यानेच होते, भरधाव येणारी वाहने दिसत नाहीत, त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडतोच, हा रस्ता फारच अरूंद आहे. 

ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. पावसाने  या रस्त्याला भेगा पडल्या आहेत, या रस्त्यावरून दूरध्वनी केबलसाठी रस्ता उकरल्याने व हे काम व केबल खड्डे व्यवस्थित न मुजवल्याने पाणी मुरून रस्ता तुटत चालला आहे. हा रस्ता तुटल्याने वाहनासाठी सुरक्षित नाही; पण पन्हाळागडावर येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून याच रस्त्याचा जास्त वापर होतो. मोटारसायकल व लहान चारचाकी वाहनांची वर्दळ वाढल्याने तीन दरवाजा ही ऐतिहासिक वास्तू देखील धोकादायक बनत आहे.  या वास्तूला तडे जात आहेत.