Fri, Jul 19, 2019 01:08होमपेज › Kolhapur › काळ्या पाण्याची नदी

काळ्या पाण्याची नदी

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 11:50PMकोल्हापूर : विजय पाटील 

शहराला वेढा घालून पंचगंगेचा प्रवाह बापट कँप परिसरातून पुढे वाहतो. या परिसरातून वाहणार्‍या नाल्याचे पाणी अतिप्रदूषित आणि रंगाने जळक्या ऑईलसारखे आहे. हे जळके ऑईल ऊर्फ काळे पाणी पंचगंगा नदीच्या शांतपणे वाहणार्‍या प्रवाहात शिरून त्याचा रंग बदलत आहे. या दूषित पाण्यामुळे आता येथील नदीपात्रात केंदाळ तयार होऊन ते वाढू लागले आहे. एकूणच येथील नदीचा प्रवाह काळ्या पाण्याच्या मिश्रणाने काळसर होऊ लागला आहे. याकडे तत्काळ लक्ष दिले नाही, तर येत्या काही दिवसांत पंचगंगेचा हा प्रवाह काळ्या पाण्याची नदी म्हणून ओळखला जाईल, हे स्पष्ट आहे. 

शहरातील सांडपाण्याचे बारा नाले पंचगंगा नदीत मिसळतात. हे नाले पंचगंगेत मिसळत नाहीत, अशा प्रकारचा भुलभूलैया महापालिका प्रशासनाने कागदोपत्री तयार केला आहे. नाल्यांवर बांध घालून पाणी अडवले. अडवलेले पाण्याचे शुद्धीकरण केले, असे वारंवार नागरिकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न सुरू असतो. तसेच बापट कँपसारख्या ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधून नाल्यांचे पाणी उपसा करण्यासाठी जॅकवेलही बांधण्यात आले असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे. प्रत्यक्षात महापालिका प्रशासन पंचगंगेच्या प्रदूषणमुक्‍तीबाबत सपशेल अपयशी ठरत असल्याचे वास्तव दिसते. 

कारण, राजहंस प्रिंटिंग प्रेसच्या समोरील नाला, रमणमळा आणि कसबा बावड्यातून वाहणारा सांडपाण्याचा नाला थेट नदीतच विसावतो. हे नाले शेतवडीतील रासायनिक खतांचे घटक सोबत घेऊन नदीचा प्रवाह अधिक विषारी बनवण्यास कारणीभूत ठरतात. यावर कडी म्हणून बापट कँप परिसरातून वाहणार्‍या नाल्याचे भीषण चित्र सांगता येईल. टेंबलाई, विक्रमनगर, रुईकर कॉलनी, मुक्‍त सैनिक असा प्रवास करत बापट कँपमार्गे वाहणार्‍या नाल्याबाबतही महापालिका प्रशासनाला काहीच उपाययोजना करता आलेल्या नाहीत. या नाल्यातील सांडपाणी जळक्या ऑईलसारखे बनले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा या सांडपाण्यात दिसून येतो. हा नाल्याचा प्रवाह काळ्या पाण्यासारखा बनला आहे. हा प्रवाह थेट नदीत मिसळतो. साहजिकच, ज्या ठिकाणी हा नाला नदीत मिसळतो, त्या ठिकाणचे पाणी काळसर रंगाचे बनले आहे. तसेच या नदीपात्रात केंदाळ वाढू लागले आहे. हे पाणी म्हणजे विषाची परीक्षा दिल्यासारखा प्रकार आहे. इतकी भीषण स्थिती असतानाही प्रशासनाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष दिसते. कुठे गेली महापालिका आणि कुठे झोपलेय प्रदूषण नियंत्रण मंडळ, अशी चर्चा स्थानिक शेतकर्‍यांकडून ऐकायला मिळते.