Wed, Feb 20, 2019 08:42होमपेज › Kolhapur › दुधाच्या राजकारणाला उकळी

दुधाच्या राजकारणाला उकळी

Published On: Jul 14 2018 12:21AM | Last Updated: Jul 14 2018 12:00AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह कर्नाटक परिसरातून दुधाचा एकही थेंब मुंबईला जाऊ देणार नाही, असा  इशारा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत देण्यात आला. कितीही पोलिस फौजफाटा लावला, तरी गनिमी कावा पद्धतीने आम्ही दूध रोखून दाखवू, असेही या बैठकीत सांगण्यात आले.

‘स्वाभिमानी’चे राज्यसचिव राजेंद्र गड्ड्याण्णावर यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर शेतकर्‍यांची बैठक झाली. दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी  बैठकीला गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते उपस्थित होते.

‘गोकुळ’ मल्टिस्टेट करता येणार नाही : आ. मुश्रीफ

कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) हा जिल्हा कार्यक्षेत्र असलेला दूध संघ आहे, कायद्याने तो मल्टिस्टेट करता येणार नाही. संघाच्या नेत्यांनीही हा आत्मघाती निर्णय घेऊ नये, असे मी त्यांना ठामपणे सांगणार आहे. याशिवाय, उत्पादकांना याची जाणीव व्हावी म्हणून जिल्हाभर जनजागृती करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय झाला आहे, हे ऐकून आश्‍चर्य वाटले. जर या निर्णयावर दोन्ही नेते आणि संचालक ठाम राहिले, तर सर्वसाधारण सभेत तो मंजूर होणे केवळ अशक्य आहे. कारण, या निर्णयामुळे जिल्ह्यातील दूध संस्थांचे अस्तित्व संपणार आहे. त्यांच्या हक्कांवर बाधा येणार असून त्यांना दुय्यम स्थान मिळणार आहे. कर्नाटक राज्यातील  500-1000 संस्था सभासद केल्या तर निवडणुकीत जिल्ह्यातील संस्थांवर  त्यांना अवलंबूनच रहावे लागणार नाही. जिल्ह्यातील संस्थांना आज जी किंमत आहे ती मिळणार नाही. कर्नाटकात ज्या पध्दतीने कमी दराने दूध खरेदी केले जाते तशीच परिस्थिती जिल्ह्यातील दूध संस्थांची होणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.  या निर्णयामुळे होणारे उत्पादकांचे नुकसान त्यांना लक्षात आणून देण्यासाठी जिल्हाभर शेतकरी व उत्पादकांचे मेळावे घेऊन त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली जाईल. यासाठी पडेल ती किंमत मोजायला लागली तरी हरकत नाही, आम्ही ते करू, असेही मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे. 

सत्तेच्या लालसेपोटी  निर्णय 

उद्याच्या काळात जिल्हा बँकही मल्टीस्टेट करण्याची चर्चा कोण करणार असेल तर ती अयोग्यच आहे. सत्तेच्या लालसेसाठी हा निर्णय असेल तर त्यांनी तो मागे घ्यावा, अशीच नेत्यांना माझी सुचना आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याचे अस्तित्त्व संपणार आहे. जिल्ह्याची स्वाभिमानी जनता हे कदापि सहन करणार नाही, असेही या पत्रकात म्हटले आहे.