Mon, Sep 24, 2018 03:23होमपेज › Kolhapur › युतीपुढे कोणीच टिकणार नाही

युतीपुढे कोणीच टिकणार नाही

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 30 2018 1:08AMकोल्हापूर: प्रतिनिधी

विधान परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध लढले. परंतु, वेगवेगळे लढूनही दोघांच्या मतांची बेरीज ही विरोधकांच्या (काँग्रेस-राष्ट्रवादी) मनात धडकी भरवणारी आहे. परिणामी, भाजप-शिवसेना एकत्र राहिल्यास त्यांच्यापुढे कोणीच टिकणार नाही. राज्यातील जनतेच्या विकासासाठी युती आवश्यक आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. 
दरम्यान, बँकांकडून शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.   

पाटील म्हणाले, राज्यातील जिल्हा परिषदेंतर्गत 50 हजार किलो मीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावेत, अशी मागणी केली जात आहे. परंतु, मुळातच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 89 हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. पुन्हा हे रस्ते वर्ग करायचे झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे बजेट चार ते पाच हजार कोटींनी वाढवावे लागेल. मुंबई-गोवा रस्त्याविषयीच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून, तो राज्य शासनाने केंद्र शासनाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे राज्य शासन त्यावर निधी खर्च करू शकत नाही. या रस्त्याच्या कामाच्या वर्कऑर्डर काढण्यात आल्या असून, कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधितांना कडक नोटिसा दिल्या आहेत. 

राज्यात रस्ते दुरूस्तीसाठी  एकेका किलोमीटरसाठी तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे 10 ते 12 वर्षे खड्डे पडणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.