Wed, Mar 27, 2019 03:59होमपेज › Kolhapur › विधानसभेसाठी कागलमध्ये जोर-बैठका

विधानसभेसाठी कागलमध्ये जोर-बैठका

Published On: Feb 02 2018 4:55PM | Last Updated: Feb 02 2018 4:58PM 

कागल : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून कागल तालुक्यातील राजकीय गटांच्या आतापासूनच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. राजकीय सभा आणि कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीबरोबरच बोगस मतदारांचा शोध घेऊन नव्याने मतदार नोंदणीच्या कामालादेखील गती देण्यात येत आहे. त्यासाठी शहरात आणि ग्रामीण भागात गावनिहाय कामे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी खास कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका घेतल्या जात आहेत.

विधानसभा निवडणुका अद्याप दृष्टिक्षेपात आलेल्या नसताना देखील राजकीय गटांची भविष्यातील निवडणुकीसाठीची तयारी कागल विधानसभा मतदार संघात गेल्या काही दिवसापासुन सुरु झाली आहे. काही सभा तर निवडणुकांच्या प्रचार सुरु असल्यासारख्या घेतल्या जात आहेत. रोज नवीन उपक्रम, कार्यक्रम दिवसांपासून सुरू आहे आणि रोज नवीन योजना राबविण्यात येत आहेत.

वाचा : समरजितसिंह यशस्वी भव! : महाडिक

या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांना निवडणुकीचे फारच लवकर वेध लागून राहिले आहे. सर्व राजकीय गटांकडून सर्वच पातळीवर जय्यत तयारी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. निवडणुकीच्या तयारी पैकी गेल्या काही दिवसांपासुन राजकीय गटांकडून मतदार याद्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नवीन मतदारांची नोंदणी आणि बोगस मतदार यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी गाववार आणि प्रभाग निहाय मतदार याद्या मिळविण्यात आल्या आहेत या यादीनुसार कोणाचे दुबार नाव आहे काय? आणखी कोणाचे नाव राहिले आहे काय? याचा शोध घेतला जात आहे. या कामासाठी खास कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. कामासाठी बरेच दिवस येऊन राहिलेल्या लोकांचा- मतदारांचा शोध घेऊन त्यांच्या गावाकडील मतदार यादीतील नाव कमी करुन कागल मतदार संघात नाव कसे घालता येईल; यासाठी देखील प्रयत्न केला जात आहेत.

मतदार यादी अद्ययावत करण्यात आली आहे. मतदार यादीचे काम ऑनलाईन सुरू आहे. सॉफ्टवेअरमुळे कोणाचेही नाव दुबार येत नाही. दुबार नावे नोंदविताच येत नाहीत. त्यामुळे मतदार यादीत बदल करावा झाल्यास अनेक संकटांचा सामना संबंधीतांना करावा लागणार आहे. एरव्ही कोणाच्या कार्यक्रमाला कुणी जायचे, हे ठरविणारे नेते आता गावोगावी साध्या कार्यक्रमालाही हजेरी लावताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघत आहे.