होमपेज › Kolhapur › राजकीय वादातून चाकूहल्ला एक ठार, तिघे जण जखमी

राजकीय वादातून चाकूहल्ला एक ठार, तिघे जण जखमी

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

असळजपैकी नारळेवाडी (ता. गगनबावडा) येथे स्थानिक राजकीय वादातून सखाराम सोनबा गावकर (वय 40, रा. असळजपैकी रूपणीवाडी) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी पूर्वीच्या भांडणाचा वाद मिटविताना हा प्रकार घडला. यावेळी झालेल्या तलवार हल्ल्यात लक्ष्मण महादेव बांडागळे (40), सचिन विष्णू खेडेकर (18) व प्रदीप कृष्णा खेडेकर (22) तिघे जखमी झाले.

जखमींकडून मिळालेली माहिती अशी, नारळेवाडीत स्थानिक राजकारणातून खेडेकर आणि म्हेतर गटात वाद सुरू होता. शिवजयंती साजरी करण्याच्या कारणातून या दोन गटांत वादावादी झाली होती. यातून प्रदीप खेडेकर याला मारहाण करण्यात आली. या दोन गटांतील वाद मिटविण्यासाठी प्रदीप खेडेकरचे मामा सखाराम गावकर आणि नातेवाईक लक्ष्मण बांडागळे प्रयत्न करीत होते.

वाद मिटविण्याचा प्रयत्न
गावकर आणि बांडागळे शुक्रवारी नारळेवाडी गावात आले. गावातील ज्येष्ठांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्याचे ठरले. सायंकाळी पाचच्या सुमारास खेडेकर आणि म्हेतर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी दोन्ही गटातील मंडळी जमली होती. बैठकीतच दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची होऊन प्रकाश म्हेतर याने चाकूने सखाराम गावकर यांना भोसकले. हाणामारीत तलवारीचा वार हातावर लागल्याने खेडेकर यांच्या गटातील लक्ष्मण बांडागळे गंभीर जखमी झाले. सचिन व प्रदीप यांनाही चाकू लागल्याने तत्काळ उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले.

छातीत चाकूचा वार वर्मी लागल्याने प्रचंड रक्‍तस्राव होऊन सखाराम गावकर यांचा सीपीआरमध्ये आणताना वाटेतच मृत्यू झाला. तर लक्ष्मण बांडागळे यांच्या डाव्या हातावर तलवारीचा वार बसल्याने त्यांची प्रकृतीही गंभीर बनली आहे.

स्थानिक राजकीय वाद
प्रदीप खेडेकर याने अपक्ष म्हणून नारळेवाडी ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. तेव्हापासूनच खेडेकर आणि म्हेतर गटात वाद सुरू होता. शिवजयंतीची मिरवणूक काढण्यावरून पुन्हा वाद उफाळून आला होता. हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेणारे सखाराम गावकर यांचाच यामध्ये बळी गेल्याची चर्चा सीपीआरमध्ये सुरू होती.