Sat, Jul 20, 2019 21:30होमपेज › Kolhapur › पेठ वडगावचा हवालदार निलंबित

पेठ वडगावचा हवालदार निलंबित

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 1:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

खबर्‍याच्या मदतीने 17 लाख 34 हजार रुपये किमतीचे अर्धा किलोहून अधिक सोने लंपास करणार्‍या पेठ वडगाव पोलिस ठाण्यातील हवालदार संदीप शाबा मगदूम (वय 35, रा. कसबा बावडा) याला गुरुवारी निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ही कारवाई केली.

निलंबित हवालदाराच्या खातेनिहाय चौकशीचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांना आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी आढळणार्‍या अन्य दोषींवरही तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

दागिने विकण्यासाठी आलेल्या सराफाला चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन त्याच्याजवळील 55 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी हवालदारासह खबर्‍या अनिल डोईफोडे, उदय भानुसेविरुद्ध पेठ वडगाव पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.7) गुन्हा दाखल झाला होता. संशयितांना लागलीच अटक करण्यात आली होती. खबर्‍याच्या मदतीने पोलिस हवालदारानेच सराफाकडील दागिने लंपास करण्याचा प्रयत्न केल्याने समाजातील सर्वच घटकातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

संशयितांना पोलिस कोठडी
संशयावरून जप्त केलेल्या तीन किलो सोन्यातील अर्धा किलो सोने संगनमताने लंपास केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी अटक केलेल्या संशयित पोलिस हवालदार संदीप मगदूम (रा. कसबा बावडा, कोल्हापूर) याच्यासह त्याचा साथीदार उदय आनुसे (रा. बुवाचे वाठार, ता. हातकणंगले) या दोघांना वडगाव न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणातील आणखी ए

 संशयित अनिल रामराव डोईफोडे (रा. घुणकी, ता. हातकणंगले) याची प्रकृती अस्वस्थ असल्याने कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
पोलिसमित्र अनिल डोईफोडे याने दिलेल्या माहितीनुसार पेठ वडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून आष्ट्याकडे जाणार्‍या साकेत सुनील शहा (रा. इस्लामपूर) यांना संशयावरून हवालदार संदीप मगदूम पोलिस ठाण्यात घेऊन गेला होता. पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या पोलिस निवासी खोलीत शहा यांची झडती घेण्यात आली. त्यावेळी शहा यांच्याजवळ असलेल्या सॅकमध्ये तीन किलो सोन्याचे विविध नमुन्यांचे दागिने असल्याचे निदर्शनास आले होते. या दागिन्यांबाबत विचारणा केल्यानंतर हे दागिने वडगाव येथील सराफी व्यापार्‍यांना नमुने दाखविण्यासाठी आणले असल्याचे शहा यांनी सांगितले. दागिन्यांच्या कागदपत्रांची खातरजमा केल्याने पोलिसांनी हे दागिने शहा यांना परत दिले होते.

दरम्यान, तीन किलो सोन्यापैकी अर्धा किलो सोने गायब झाले असल्याने शहा यांना मोठा धक्का बसला. याबाबतची माहिती तातडीने शहा यांनी पोलिस निरीक्षक गवारी यांना दिली. गवारी यांनी मगदूम व पोलिसमित्र अनिल डोईफोडे, त्याचा चालक उदय आनुसे याला बोलावून घेतले व विचारणा केली. सोने परत देण्याच्या शहा यांच्या मागणीला पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शहा व सराफ असोसिएशनने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महासंचालक विश्‍वास नांगरे-पाटील यांना याची माहिती दिली. नांगरे-पाटील यांनी जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते यांना या घटनेचा तपास करून तत्काळ कारवाई आदेश दिले. दरम्यान, डोईफोडे याचा चालक आनुसे याने सोने परत करून चोरीची कबुली दिली.

जिल्हा पोलिसप्रमुख मोहिते यांनी जयसिंगपूर विभागीय पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना या प्रकरणाची सूत्रे दिली. त्यानंतर पोलिस हवालदार संदीप मगदूमसह पोलिसमित्र अनिल डोईफोडे, चालक उदय आनुसे यांच्याविरोधात संगनमताने सुमारे 17 लाख 34 हजार रुपये किमतीचा राणीहार, लक्ष्मीहार, राजकोट रिंगा, मुदी, लक्ष्मीहार, बास्केट रिंगा, बाली, रिंगा, गंठण असा 559 ग्रॅम 390 मिली वजनाचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.