Tue, May 21, 2019 18:37होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर सीबीएसमधील पोलिस चौकी गायब

कोल्‍हापूर सीबीएसमधील पोलिस चौकी गायब

Published On: Jun 18 2018 1:16AM | Last Updated: Jun 17 2018 11:49PMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

चोवीस तास प्रवाशांनी गजबजलेल्या मध्यवर्ती बस स्थानकातील पोलिस चौकी गायब झाली आहे. त्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांना प्रवाशांच्या बाकड्यावर बसून ड्युटी करावी लागत असून, प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. याला एसटीतील जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी जबाबदार असून, त्यांच्यामुळे पोलिस चौकी उभारण्याचा प्रश्‍न रखडला आहे. 

येथील मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजरो प्रवासी ये-जा करीत असतात. अशा प्रवाशांना सुरक्षा मिळावी, चोरीच्या प्रकाराला आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून मध्यवर्ती बसस्थानावर पोलिस चौकी मंजूर आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत ही पोलिस चौकी येते. या पोलिस चौकीसाठी एक हवालदार, दोन पोलिस कर्मचारी व महिला पोलिस कर्मचारी अशा चार कर्मचार्‍यांची नेमणूक या चौकीत केली आहे. प्रवाशांना पोलिस कर्मचारी कोठूनही दिसावा, यासाठी मध्यवर्ती बस स्थानकात कंट्रोल रुमच्या डाव्या बाजूला पोलिस मदत केंद्र होते. इथे थोडासा उंचवटा करून त्यावर तीन बाक टाकून पोलिसांना बसण्याची व्यवस्था केली होती.  दोन वर्षांपूर्वी ही पोलिस चौकी तेथून काढली आहे. येथे प्रवासासाठी आलेल्या लहान बालकांच्या मातांना बसण्यासाठी खोली बांधली आहे.

आता पोलिस चौकी नसल्याने पोलिसांना प्रवाशांच्या बाकड्यावर किंवा परिसरात कोठे जागा मिळेल  तिथे बसावे लागत आहे. स्थानकावर पोलिस कर्मचारी असल्यास भुरट्या चोरावर आळा बसू शकतो. त्यामुळे राज्यातील प्रमुख बसस्थानकावर पोलिस चौक्या स्थापन केल्या आहेत. पण एसटीतील अधिकार्‍यांच्या सुंदोपसुंदीच्या प्रकारामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकावर पोलिस चौकी नाही. 

याबाबत शाहुपुरी पोलिस ठाण्याच्या वतीने अनेकवेळा स्थानक प्रमुखांकडे पोलिस चौकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. करु या, बघू या यापुढे एसटीतील अधिकारी गेलेले नाहीत. त्यामुळे बस स्थानकात भुरट्या चोरांना रान मोकळे झाले आहे. परिणामी महिलांची पर्स लांबविणे, प्रवाशांच्या बॅगा चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. त्यामुळे पोलिस चौकी उभारण्यासाठी एसटी प्रशासनाचे डोळे उघडणार तरी कधी असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. 

लवकरच पोलिस चौकी उभारणार : पाटील

मध्यवर्ती बसस्थानकात पोलिस चौकी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ही चौकी उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. लवकरात लवकर पोलिस चौकी उभारुन प्रवाशांना सुरक्षा दिली जाईल, असे मध्यवर्ती बसस्थानकाचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी सांगितले.