Thu, Aug 22, 2019 04:23होमपेज › Kolhapur › १४७ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आज होणार गॅझेट

१४७ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आज होणार गॅझेट

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 05 2018 12:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात चार वर्षांचा कार्यकाळ झालेल्या 147  पोलिस अधिकार्‍यांच्या कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत प्रशासकीय बदल्यांचे गॅझेट मंगळवारी होत आहे. त्यात कोल्हापूर पोलिस दलातील 47 पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

 कोल्हापूर परिक्षेत्राशिवाय पोलिस ठाण्यांतर्गत दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या  अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या 147 अधिकार्‍यांच्या मंगळवारी प्रशासकीय बदल्या होत आहेत, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. त्यात कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीणमधील अधिकार्‍यांचा समावेश आहे.

प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जिल्ह्यात महत्त्वाच्या पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने बहुसंख्य अधिकार्‍यांच्या बदल्या होत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते यांची पुणे शहर येथे बदली झाल्याने या जागेसाठी अधिकार्‍यांत  रस्सीखेच सुरू आहे.
‘एसीबी’साठी कोण बाजी मारणार?

 ‘एलसीबी’साठी ‘लक्ष्मीपुरी’चे निरीक्षक तानाजी सावंत, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक शशीराज पाटोळे यांची नावे चर्चेत आहेत. जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या शाखेवर कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागले आहे. याशिवाय अनिल गाडे (शाहूवाडी), निशिकांत भुजबळ (विमानतळ), सतीश पवार (शिवाजीनगर), अशोक धुमाळ ( शहर वाहतूक नियंत्रण शाखा), शौकत जमादार (पासपोर्ट), अरविंद चौधरी (भुदरगड), धनंजय जाधव (मानव संशोधन), दत्तात्रय कदम (जयसिंगपूर), अर्जुन पवार (इस्पुर्ली), विकास जाधव (कोडोली) यांच्या प्रामुख्याने बदल्या होत आहेत.