Sun, May 19, 2019 14:26
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › ...पण अनुचित घटनांचे उदात्तीकरण नकोच

...पण अनुचित घटनांचे उदात्तीकरण नकोच

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:21AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

युवा खेळाडूंच्या कर्तृत्वाला निश्‍चित साथ द्या, सामाजिक पाठबळ उभे करा, पण किरकोळ कारणातून उद्भवणार्‍या अनुचित घटनांचे समर्थन करू नका. गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाने  कोणाचेही भले होणार नाही. अशा घटनातून काही साध्यही होणार नाही. असा सूर तालीम मंडळ पदाधिकारी, ज्येष्ठ खेळाडू व पोलिस अधिकार्‍यांच्या सलोखा बैठकीत गुरुवारी व्यक्‍त झाला.

कोल्हापूर पोलिस दलाच्या पुढाकाराने तालीम मंडळांचे पदाधिकारी, ज्येष्ठ खेळाडूंची सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यालयात झालेल्या बैठकीला विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपअधीक्षक सतीश माने, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह 27 तालीम मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक मोहिते म्हणाले, एकमेकाला खुन्‍नस देण्यावरून गणेश बिंद या कोवळ्या मुलाचा खून झाला. वास्तविक कला, क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा आहे. किरकोळ कारणातून घडलेल्या घटनेमुळे मनाला वेदना झाल्या. अशा घटनांमुळे शहराच्या वैभवाला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे.

शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. फुटबॉल स्पर्धेचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच घटना घडल्याने सर्वत्र चुकीचा संदेश जाईल, अशीही त्यांनी चिंता व्यक्‍त केली.
नांगरे-पाटील म्हणाले, पोलिस दलाने कला, क्रिडा, सांस्कृतिक चळवळीचा नेहमीच आदर केला आहे. खेळांडूच्या कतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही समाजकंटकाकडून कायद्याला आव्हान देण्याचा झालेला प्रयत्न निषेधार्ह आहे. 

अशा घटनांची पुनर्रावृत्ती होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगारीचा टक्का वाढू लागला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी सर्व तालिम मंडळासाठी विशेष सुरक्षा नियुक्त करण्यात येईल. खेळांडूंच्या कतृत्वाला संधी द्या. सामाजिक पाठबळ उभे करा. पण गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होणार नाही, याची दक्षता सर्वांनीच घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी झालेल्या चर्चेत निवासराव साळोखे, चंद्रकांत सांळोखे, लालासाहेब गायकवाड, सुशिल भांदिगरे, अमित चव्हाण, धनंजय सावंत, सुजित चव्हाण, मनजित माने, सुनिल शिंदे,बाबा पार्टे,दिलीप सुर्यवंशी, संभाजी मांगोरे,रणजित शिंदे आदींनी सहभाग घेतला.