Mon, Mar 25, 2019 02:56
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › ‘खाकी’ची प्रतिमा पुन्हा डागाळली!

‘खाकी’ची प्रतिमा पुन्हा डागाळली!

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 8:47AMकोल्हापूर : दिलीप भिसे

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ सज्जनाचं रक्षण अन् दुर्जनांचा विनाश... हे ब्रिद घेऊन कायद्याला आव्हान देत समाजात अस्थिरता माजविणार्‍यावर जरब निर्माण करून कायदा-सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी झटणार्‍या पोलिस दलाच्या लौकिकाला किंबहुना विश्‍वासार्हतेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न ‘खाकी’ वर्दीत दडलेल्या काही गुन्हेगारांकडून सुरू झाला आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतील अधिकार्‍यानीच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर...?  नेमका मनाला चीड आणणारा संतापजनक प्रकार पोलिस दलात अनुभवाला येतो आहे.

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील कोट्यवधीच्या चोरीप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्‍वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवेसह सात पोलिसांचा निष्पन्‍न झालेला सहभाग, करमाळा (जि. सोलापूर) येथील सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव मृत्यूप्रकरणी कराड येथील निलंबित पोलिस निरीक्षक विकास धस व बारा पोलिसांवरील कारवाईनंतर सांगलीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे या तरुणाच्या अमानुष खुनाच्या घटनेमुळे पश्‍चिम महाराष्ट्रच काय पण राज्यभरात पोलिस दलाच्या प्रतिमेबाबत साशंकता निर्माण झाली होती.

महाराष्ट्र पोलिस दलाला एका पाठोपाठ एक धक्क्यांना सामोरे जावे लागत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील बेपत्ता महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांची हत्या झाल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीत अखेर उघड झाले आहे. ठाणे ग्रामीण पोलिस आयुक्‍तालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याने चालक कुंदन भंडारी व बालपणीचा मित्र महेश फळणीकरच्या मदतीने अमानुष कृत्य केल्याचे उघड झाल्याने राज्य पोलिस दलाला आणखी एका मोठ्या धक्क्याला तोंड द्यावे लागत आहे.

बेपत्ता सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या खुनाची घटना नवी मुंबईत घडली असली तरी दुर्दैवी महिला अधिकारी व संशयित आरोपी अभय कुरूंदकर या दोघांचे वास्तव्य कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. कुरूंदकर मूळचा हिंगोली जिल्ह्यातील असला तरी त्याचे संपूर्ण बालपण आजरा येथे गेले आहे. त्यामुळे महिला पोलिस अधिकारी बेपत्ता प्रकरणाकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

‘एटीएम’ घोटाळा चौकशीत जमले सूत !

राजकीय आश्रय, वरिष्ठांशी लागेबाधेमुळे सतत मोक्याच्या आणि कमाईच्या पोलिस ठाण्यांवर कब्जा करणारा अभय कुरूंदकर 2007  ते 2010 या काळात सांगली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणचा वरिष्ठ निरीक्षक पदावर कार्यरत होता. याच काळात कोट्यवधीच्या एटीएमच्या  तपासाची सूत्रे  कुरुंदकर याच्याकडे होती. नेमके याच काळात पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांची सांगली पोलिस दलात नियुक्‍ती झाली होती. ‘एलसीबी’कडे त्यांची बदली झाली. कुरुंदकर यांनी ‘एटीएम’ घोटाळा चौकशी पथकात बिंद्रे-गोरे यांना सामावून घेतले. नेमके याच काळात त्यांचे सूत जमले. नाजूक संबंधाची त्यावेळी दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र कुरुंदकरच्या दहशतीमुळे ‘ब्र’ काढण्याची कोणाची हिंमत होत नव्हती.

कुरुंदकरने स्वत:च मृतदेहाचे कटरने तुकडे तुकडे केले  

बेपत्ता पोलिस अधिकारी अश्‍विनी बिंद्रे यांचा निश्‍चित घातपात झाल्याचा संशय पती राजू गोरेसह भाऊ आनंद बिंद्रे यांनी व्यक्‍त केला होता. 2016 पासून बेपत्ता असलेल्या अश्‍विनीच्या शोधासाठी कुटुंबीयांनी पायाला भिंगरी बाधून वरिष्ठांचे उंबरे झिजविले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे चौकशीला गती मिळाली. अश्‍विनीचा खून करून कटरने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. दि.11 एप्रिल 2016 मध्ये शिर, दोन्ही हात व पाय मीरा भाईंदरजवळील खाडीत फेकून देण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे दि.12 एप्रिल 2016 रोजी सायंकाळच्या सुमाराला पोटाचा भाग (धड) खाडीत फेकून देण्यात आल्याचा प्रकारही चौकशीत उघडकीला आला आहे.

मृतदेहाचे अवयव दोन दिवस फ्रिजमध्ये...

अश्‍विनीचा खून केल्यानंतर संशयितांनी मृतदेहाचे तुकडे केले. उग्र दर्प येऊ नये म्हणून संशयितांनी मृतदेहाचे तुकडे दोन दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत उघडकीला आला आहे.असे वरिष्ठ सुत्राकडून सांगण्यात आले.

‘हम करेसो कायदा’ या नीतीने पोलिस अधिकार्‍यांची दंडेलशाही

सांगलीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणामुळे  पोलिस यंत्रणेला मोठ्या नामुष्कीला तोंड द्यावे लागले. एकेकाळी गुन्हेगारी जगतावर प्रचंड दबदबा निर्माण केलेल्या सांगली पोलिस यंत्रणेची काही अधिकार्‍यांच्या ‘दंडेलशाही’मुळे पुरती नाचक्की झाली. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अनिकेतला निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह ‘डीबी’ पथकातील पोलिसांनी अमानुष मारहाण केली. त्यातच तरुणाचा शेवटच झाला. ‘हम करेसो कायदा’ या नीतीचा वापर करून ‘खाकी’ वर्दीच्या धाकावर सोकावलेल्या टोळीने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा धक्‍कादायक प्रकार चव्हाट्यावर आला होता. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती.

खुनाचा ठपका : कराड येथील वरिष्ठासह 12 पोलिस जेरबंद

सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव (रा. करमाळा, जि. सोलापूर) मृत्यूप्रकरणी कराड पोलिस ठाण्यातील निलंबित पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक निरीक्षक हणमंत काकंडकीसह 12 पोलिसांना  सीआयडीने अटक केली होती. जून 2017 मध्येे ही घटना घडली होती. चोरीप्रकरणी चौकशीसाठी संशयिताला ताब्यात घेण्यात आले. ‘थर्ड डिग्री’चा वापर झाल्यामुळेच जाधव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकारी, पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.‘सीआयडी’ने संशयित व निलंबित पोलिस अधिकारी धस, काकंडकी, दिलीप क्षीरसागर, सुधीर जाधव, राजकुमार कोळी, अतुल देशमुख, सुमित मोहिते, शरद माने, संजय काटे, अमोल पवार, नितीन कदम,खाडेसह 12 जणांवर कारवाईचा बडगा उगारला. 

ठाणे अंमलदारासह सात  पोलिसांच्या नोकरीवर गदा

कोथळे खूनप्रकरणी ठाणे अंमलदारासह सात पोलिसांना मोठी झळ सोसावी लागली आहे. चौकशीत दोषी ठरलेले ठाणे अंमलदार मिलिंद शिंदे, गजानन व्हावळ, प्रदीप जाधव, स्वरूपा पाटील, ज्योती वाजे, श्रीकांत बुलबुले, सुभद्रा साबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

फौजदार कामटेसह 5 पोलिस कळंबा कारागृहात...

अनिकेतच्या अमानुष खुनाचा ठपका ठेवून ‘सीआयडी’ने सांगली पोलिस दलातील निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना अटक केली आहे. त्यात‘डीबी’च्या प्रमुखासह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसिरूद्दीन मुल्ला, झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले याना कोठडीत बंद करण्यात आले आहे. सर्व संशयित चार भिंतीआडच्या कारागृहात दिवस कंठत आहेत.