Fri, Jul 19, 2019 01:44होमपेज › Kolhapur › ‘चिरीमिरी’मुळे महामार्गावर तस्करी टोळ्यांचीच हुकूमत : कुंटणखानेही फार्मात

‘चिरीमिरी’मुळे महामार्गावर तस्करी टोळ्यांचीच हुकूमत : कुंटणखानेही फार्मात

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 11:49PM 

कोल्हापूर : दिलीप भिसे

 जिल्ह्यातील महामार्गावरील सुरक्षा यंत्रणा रामभरोसे ठरली आहे. ‘चिरीमिरी’च्या बळावर समाजकंटकासह तस्करी टोळ्यांची इथं हुकूमत चालते. पुणे-बंगळूर महामार्गावर तर आंतरराज्य तस्करी टोळ्यांनी स्वत:चे साम्राज्य निर्माण केले आहे. नशिल्या पदार्थासह गुटखा, भेसळ दारू, चंदनासह ‘लाखमोल’ वनस्पतींची बेधडक तस्करी फोफावली आहे. मात्र, ‘अर्थ’पूर्ण घडामोडींमुळे सुरक्षा यंत्रणांनी  साखळीला जिल्ह्यात खुले आंदण दिल्याचे चित्र आहे.

 मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूरला संलग्‍न आहे. कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यांतील भाविक, पर्यटकांची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या कोल्हापुरात मोठी वर्दळ असते. शिवाय, कोकणपट्टीही लगत असल्याने अंबाबाई दर्शन, पर्यटनाच्या निमित्ताने कोकणवासीयांचे लोंढेच्या लोंढे कोल्हापूरच्या दिशेने येत असतात. परिणामी जिल्ह्यांतर्गत महामार्गावर रात्रंदिवस वाहनांची रेलचेल सुरू असते. महामार्गावरील सततच्या वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत सराईत टोळ्यांचे कनेक्शन वाढू लागले आहे.

महामार्गावरील कुंटणखाने; 25 युवतींची सुटका 

कोल्हापूर पोलिसांनी वर्षभरात महामार्गावरील सात हॉटेल, लॉजवर छापे टाकून महिला एजंटासह 25 युवतींची सुटका केली आहे. शिरोली, गोकुळ शिरगाव परिसरासह कोल्हापूर-सांगली रोड, चिपरी फाट्यावरील निर्जन बंगला, हॉटेलवर छापा टाकून कुंटणखाने उद्ध्वस्त केले आहेत. काही दिवसांपूर्वी महामार्गापासून काही अंतरावर उचगाव येथील कुंटणखान्यावर छापा टाकून जयसिंगपूर (ता.शिरोळ) येथील सराईत एजंटासह काही युवतींना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

अमली पदार्थाच्या तस्करीचे अड्डे...

महामार्गावर विशेषकरून ठिकठिकाणी असणार्‍या विविध फाट्यालगत काळ्या धंद्यांचे प्रचंड साम्राज्य पसरल्याचे वास्तव्य आहे. भेसळयुक्‍त दारूसह अमली पदार्थाच्या तस्करीचे अड्डेच तयार झाले आहेत. काही ठिकाणी तर बेधडक कुंटणखाने सुरू झाल्याचे चित्र आहे.

अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्यांचे गूढ कायम

पुणे-बंगळूर महामार्गापासून हाकेच्या अंतरावरील पेठवडगाव पोलिस ठाण्याचा कारभार अधिकारी, पोलिसांच्या बेफिकिरीमुळे नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. सोने घोटाळ्यासह गुटखा तस्करी कारवाईत पडद्याआड झालेल्या ‘अर्थ’पूर्ण घडामोडींमुळे पोलिस यंत्रणेला नामुष्कीला तोंड द्यावे लागले. घटनांवर उलटसुलट चर्चा असतानाच पोलिस निरीक्षक अशोक पवार, सहायक निरीक्षक  सचिन पाटील, सहायक फौजदार नंदकुमार पाटील यांच्या तडकाफडकी मुख्यालयाकडे बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बदल्याचे गूढ कायम आहे. तीन वर्षांत पेठवडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहा निरीक्षकांसह 14 पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या झाल्या आहेत. याला काय म्हणावे?

अगा काहीशे घडलेच नाही... पोलिस अधिकार्‍यांचा थाट !

कोल्हापूर-हातकणंगले मार्गावर एका बहुचर्चित हॉटेलमध्ये चालणारा अनैतिक मानवी व्यापार चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी छाप्यात काही प्रेमीयुगुल संशयास्पद स्थितीत आढळून आले. तथापि कारवाईची माध्यमांना खबर लागू नये, याची हॉटेल मालकापेक्षा अधिकार्‍यांनीच दक्षता घेतल्याची सार्वत्रिक चर्चा होती. ‘अगा काहीशे घडलेच नाही’ असाच त्यांचा थाट होता. पोलिस अधिकार्‍यांचे वर्तन संशयास्पद ठरले असतानाही वरिष्ठ स्तरावरून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. काळे धंदेवाल्याचे कर्दनकाळ अशी प्रतिमा असलेले पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांनीच बहुचर्चित प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी सामान्यांचीही अपेक्षा आहे.

महामार्ग सुरक्षा पथक करते काय?

वास्तविक, महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पोलिस यंत्रणेशिवाय महामार्ग सुरक्षा पथकांची यंत्रणा कार्यरत आहे. तीन वरिष्ठ अधिकार्‍यांसह 35-40 जवानांचा फौजफाटा दिमतीला असतानाही गेल्या काही वर्षांत तस्करी टोळ्यांनी महामार्गावर चालणार्‍या गैरकृत्यावर जरब निर्माण केल्याचे चित्र येते.

महामार्गावर मुबलक दारू, झिंग आणणारा गुटखा

कोल्हापूर येथील उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात एक कोटीहून अधिक किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा हस्तगत करून दारू तस्करांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तर अन्‍न औषध प्रशासनाने कोट्यवधीचा गुटखा जप्त करून तस्करीला लगाम घालण्याचा  प्रयत्न केला आहे.